सोळाव्या शतकापर्यंत नौकानयन, जहाजबांधणी आणि युद्धतंत्रात अनेक बदल झाले होते. अद्याप जहाजे वारा आणि शिडावरच अवलंबून असली तरी जहाजांवरील एकाच डोलकाठीवरील (मास्ट) शिडांऐवजी (सेल) एका जहाजावर तीन ते चार डोलकाठय़ा उभारण्याची पद्धत अस्तित्वात आली होती. एकाच डोलकाठीच्या जहाजात वाऱ्याचा सगळा भार एकाच बिंदूवर एकवटून जहाजाच्या बांधणीला बाधा पोहोचत असे. त्याऐवजी तीन ते चार डोलकाठय़ा वापरल्यामुळे वाऱ्याचा दाब विभागला जाऊन जहाज अधिक टिकाऊ आणि स्थिर बनले. त्यामुळे खोल समुद्रातील सफरींना मदत झाली.

याच्यात आसपासच्या काळात नौकानयनासाठी कंपास, सेक्स्टंट, होकायंत्र, रडर (रडार नव्हे), सुकाणू आदी उपकरणांचा शोध लागला होता. त्याने दिशादर्शन सोयीचे झाले होते. युरोपमधील अनेक राजवटींनी नवनवीन प्रदेश शोधण्यासाठी धाडसी संशोधकांना चालना देण्यास सुरुवात केली होती. त्यातूनच कोलंबस, मॅगेलान, अमेरिगो, वास्को-द-गामा, कॅप्टन कुक आदी दर्यावर्दीनी नवे प्रदेश शोधून काढले. त्यातून व्यापार तर वाढलाच, पण युरोपीय देशांनी अन्य प्रदेशांत वसाहती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यापूर्वी जमिनीवरील युद्धाला साहाय्य करणे, लुटालूट किंवा ख्रिश्चन आणि मुस्लीम यांच्यातील क्रुसेड्ससारख्या युद्धांत मदत अशी प्रामुख्याने सागरी युद्धांची कारणे होती. सोळाव्या शतकात धार्मिक कारणे मागे पडून वसाहती आणि व्यापारी मार्गाचे संरक्षण या कारणांसाठी सागरी युद्धे होऊ लागली.

सतराव्या शतकापर्यंत गनपावडरचा वापर वाढून बंदुका आणि तोफा तयार झाल्या होत्या. त्यांची परिणामकारकता अद्याप फारशी चांगली नसली तरी जमिनीसह समुद्रावरील लढायांमध्येही त्यांचा वापर होऊ लागला होता. सागरी युद्धांत भाले, तलवारी, धनुष्य-बाण यांचा वापर होत असे तेव्हा लढण्याची पद्धत वेगळी होती. दोन नौका जवळ आणून एका नौकेवरून दुसरीवर सैन्य उतरवून हल्ला करणे अशी पद्धत अस्तित्वात होती. तोफांनी सागरी युद्धाचे तंत्र बदलले. सुरुवातीला जहाजाच्या मागच्या आणि पुढच्या भागात सर्व दिशांना वळतील अशा तोफा होत्या. पण त्यांनी जहाजांच्या स्थैर्यावर विपरीत परिणाम होत असे. मग नव्या प्रकारच्या जहाजांमध्ये दोन्ही बाजूंना एकावर एक, दोन ते तीन मजल्यांवर ओळीने तोफा बसवल्या जाऊ लागल्या. तोफ बाहेर काढण्यासाठी खिडकीसारखी ‘गन पोर्ट’ तयार झाली. या प्रकारच्या युद्धनौकांना ‘मॅन ऑफ वॉर’ किंवा ‘शिप ऑफ द लाइन’ म्हटले जाऊ लागले. आता सागरी युद्धात दोन्ही पक्षांच्या नौका दोन सरळ ओळींत एकमेकांसमोर येऊन तोफा डागत. या युद्धप्रकाराला ‘लाइन-ऑफ-बॅटल’ टॅक्स्टिक्स म्हटले जात असे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com