युद्धात सर्वप्रथम विमानांचा उपयोग टेहळणी, संदेशांची देवाणघेवाण आणि तोफखान्याला अचूक मारा करण्यासाठी मदत म्हणून झाला. इटली आणि तुर्कस्तान यांच्यात १९११ साली सध्याच्या लिबिया या प्रदेशावरून युद्ध झाले. त्या वेळी लिबिया तुर्क साम्राज्याचा भाग होता. या युद्धात भाग घेणाऱ्या सैन्याबरोबर इटलीने अन्य देशांकडून घेतलेली ब्लेरियट, फारमन, न्यूपोर्ट आणि टॉब या प्रकारची ९ विमाने आणि ११ वैमानिकही धाडले. त्यांनी देर्ना येथील लढाईत भाग घेतला. १ नोव्हेंबर रोजी इटलीचे लेफ्टनंट ग्युलिओ गॅवोटी यांनी त्यांच्या ब्लेरियट विमानातून चार हातबॉम्ब तग्विरा ओअ‍ॅसिस येथील तुर्की तळावर टाकले. हा पहिला हवाई हल्ला मानला जातो. वास्तविक १८९९ सालच्या ‘हेग कन्व्हेन्शन’नुसार बलूनमधून बॉम्बफेकीला बंदी होती. पण हा नियम विमानांना लावता येणार नाही असे म्हणत इटलीने पळवाट काढली.

विमानांचा हवाई टेहळणीसाठी उपयोग होऊ लागताच शत्रूची टेहळणी विमाने कशी पाडायची याचा विचार सुरू झाला आणि त्यातून पहिली लढाऊ (फायटर) विमाने तयार झाली. पहिल्या महायुद्धापर्यंत जुजबी स्वरूपाची लढाऊ विमाने तयार झाली होती. हवाई चकमकींचे स्वरूप प्रथम अगदीच साधे होते. शत्रूची विमाने समोरासमोर आली की शेजारच्या विमानावर वैमानिक कॉकपिटमधूनच पिस्तुलाने किंवा बंदुकीने गोळ्या झाडत असे. नंतर त्यात सुधारणा करून विमानांवर मशिनगन बसवण्यात आल्या. मशिनगन बसवण्यासाठी विमानाच्या पुढील जागा सर्वात योग्य होती. पण तेथे मशिनगनच्या गोळ्यांच्या वाटेत आपल्याच विमानाचा प्रोपेलर येत असे. यावर उपाय म्हणून ब्रिटिशांनी व्हिकर्स गनबस या विमानात पुशर प्रोपेलरचा वापर केला. म्हणजे प्रोपेलर विमानाच्या पुढच्या भागाऐवजी मागे बसवला आणि पुढे मशिनगनसाठी जागा मोकळी करून दिली. ब्रिटनच्या एफई-२ आणि डीएच-२ या विमानांमध्येही हीच पद्धत वापरली.

याउलट फ्रान्सच्या मोरान-सॉनियर विमानाचे डिझायनर रेमंड सॉनियर यांनी फिरत्या प्रोपेलरच्या दोन पात्यांमधून मशिनगनच्या गोळ्या झाडण्याची पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याला पूर्ण यश आले नाही. त्यांनी गोळ्या बाजूला ढकलण्यासाठी प्रोपेलरवर पोलादी डिफ्लेक्टर बसवला. जर्मनीने हे तंत्र पुढे विकसित केले. डच डिझायनर अँथनी फॉकर यांच्या मदतीने जर्मनीने ‘इंटरप्टर गिअर’ किंवा ‘गन सिन्क्रोनायझर’चा शोध लावला. नव्या फॉकर आइनडेकर आणि अन्य विमानांमध्ये त्याचा वापर केला. त्याने प्रोपेलरच्या फिरत्या पात्यांच्या मधून मशिनगनच्या गोळ्या झाडणे शक्य झाले.

व्हिकर्स गनबसच्या पुशर प्रोपेलरपेक्षा फॉकर  विमानांचे गन सिन्क्रोनायझर बसवलेले ट्रॅक्टर प्रोपेलर (विमानाच्या पुढील) अधिक प्रभावी होते. त्यामुळे पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडीवर जर्मनीला ब्रिटन, फ्रान्सवर काही काळ हवाई प्रभुत्व (एअर सुपिरिऑरिटी) मिळवणे शक्य झाले.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com