दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात युरोपच्या आकाशातील जर्मनीचे हवाई प्रभुत्व संपत चालले होते. अमेरिका, ब्रिटन, सोव्हिएत युनियन आदी देशांनी नवीन लढाऊ आणि बॉम्बफेकी विमाने वापरात आणून जर्मनीवर बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली होती; पण अद्याप मित्रराष्ट्रांची बॉम्बर विमाने लढाऊ विमानांच्या संरक्षणाविना कारवाया करू शकतील इतके जर्मन हवाईदल कमकुवत झाले नव्हते. तसेच मित्रराष्ट्रांच्या लढाऊ विमानांचा पल्ला ब्रिटनमधून उड्डाण करून जर्मनीवर बॉम्बफेक करणाऱ्या विमानांना संरक्षण पुरवून परतण्याइतका नव्हता.

या गरजा भागवू शकेल असे लढाऊ विमान विकसित करण्यासाठी ब्रिटनने अमेरिकेशी करार केला होता. त्यातून मस्टँग या उत्तम विमानाची निर्मिती झाली. पिस्टन इंजिनावर चालणाऱ्या लढाऊ विमानांच्या विकासातील हा सर्वोच्च बिंदू होता. त्याने युद्धाचा निर्णय अमेरिका-ब्रिटनच्या बाजूने वळवण्यात मोठी कामगिरी पार पाडली. सिंगल सीट फायटर, लाँग रेंज एस्कॉर्ट फायटर, फायटर-बॉम्बर, रेकोनेसन्स एअरक्राफ्ट अशा विविध भूमिकांत मस्टँगचा प्रभावी वापर करण्यात आला.

ब्रिटिश हवाईदलाने घालून दिलेल्या निकषांनुसार नॉर्थ अमेरिकन एव्हिएशन या कंपनीने १९४० साली एनए-७३ एक्स हे चाचणी विमान खूप कमी वेळात तयार केले. विविध ठिकाणे ते काम १०२ ते १७० दिवसांत केल्याचे उल्लेख सापडतात. ब्रिटिशांनी या विमानाचे मस्टँग असे अधिकृत नामकरण केले. त्याच्या सुरुवातीच्या आवृत्तीवर अ‍ॅलिसन व्ही-१७१० प्रकारचे इंजिन होते. या विमानाची एकंदर कामगिरी बरी असली तरी ते एका उत्तम फायटर विमानाच्या कसोटीवर पूर्ण उतरत नव्हते. कमी आणि मध्यम उंचीवर त्याची कामगिरी चांगली होती; पण अधिक उंचीवर (हाय अल्टिटय़ूड) त्याला पुरेसा वेग घेता येत नसे. त्यामुळे ते प्रथम लो-लेव्हल अ‍ॅटॅक, ग्राऊंड सपोर्ट, फायटर-बॉम्बर आणि रेकोनेसन्स (टेहळणी) विमान म्हणून वापरले गेले.

रोल्स रॉइसचे टेस्ट पायलट रॉन हार्कर यांनी मस्टँगवरील अ‍ॅलिसन इंजिन बदलून रोल्स रॉइसचे मर्लिन इंजिन बसवण्याची सूचना केली. ती स्वीकारण्यात येऊन हा बदल केल्यानंतर सुधारित मस्टँग एक परिपूर्ण फायटर विमान बनले. त्याचा वेग आणि उंचावर काम करण्याची क्षमता वाढली. आता ते ‘कॅडिलॅक ऑफ द स्काइज’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

रोल्स रॉइसच्या परवानगीने अमेरिकेत पॅकार्ड कंपनीने तयार केलेली मर्लिन इंजिने बसवलेली मस्टँग पी ५१ डी ही आवृत्ती ताशी ७०३ किमी इतका वेग गाठू शकत असे. त्याचे रहस्य पंखांच्या विशिष्ट रचनेत (एरोफॉइल सेक्शन) होते. ही विमाने १२,७७१ मीटर (४१,९०० फूट) उंचीपर्यंत काम करू शकत. एका मिनिटाला १०६० मीटर या वेगाने मस्टँग हवेत उंची गाठत असे. तसेच इंधनाच्या अधिक टाक्या (एक्स्टर्नल ड्रॉप टँक्स) बसवून मस्टँग सलग ३३४७ किमी प्रवास करू शकत असे. त्यावर सहा मशिनगन आणि ४५० किलो बॉम्ब किंवा रॉकेट बसवता येत.

जर्मनीत बर्लिनवर हल्ला करून परतण्यासाठी विमानांना १६०० किमीच्या पल्ल्याची गरज होती. मस्टँगची क्षमता त्यापेक्षा बरीच जास्त होती. आता जर्मनीवर बॉम्बफेक करणाऱ्या विमानांचे वैमानिक निर्धोक असत, कारण त्यांना खात्री होती की, मस्टँगमधील त्यांचे ‘लिटल बडी’ संपूर्ण प्रवासात त्यांची साथसोबत करणार आहेत.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com