सचिन दिवाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेलिकॉप्टर किंवा लढाऊ विमानांना युद्धक्षेत्रात पाठवताना त्यांच्या वैमानिकांचा आणि कर्मचाऱ्यांचा जीवही धोक्यात घातला जातो. लढाऊ वैमानिक हे कोणत्याही देशासाठी अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षित मनुष्यबळ असते. त्याची विनाकारण नासाडी होऊ देणे हितावह नसते. त्यामुळे धोकादायक परिस्थितीत वैमानिकांद्वारे चालवले जाणारे विमान किंवा हेलिकॉप्टर न पाठवता अन्य साधनांद्वारे तिचे काम होऊ शकल्यास ते फायद्याचेच ठरते.

याशिवाय वैमानिकांच्या आणि विमानांच्याही काही मर्यादा असतात. वैमानिक ठरावीक मर्यादेपलीकडे गुरुत्वाकर्षणाचा भार (जी-फोर्स) सहन करू शकत नाहीत. यंत्रांना ही मर्यादा फारशी सतावत नाही. या कारणांनी वैमानिकरहित विमाने विकसित केली जाऊ लागली. त्यांना पायलटलेस प्लेन, रिमोटली पायलटेड व्हेईकल (आरपीव्ही), अनमॅन्ड एरियल व्हेईकल (यूएव्ही) किंवा ड्रोन म्हणतात. वैमानिकरहित विमानांप्रमाणेच वैमानिकरहित हेलिकॉप्टरही तयार करण्यात आली आहेत. त्यांना हेलिकॉप्टर ड्रोन किंवा व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग (व्हीटीओएल) यूएव्ही म्हणतात.

वैमानिकरहित विमानांच्या तुलनेत हेलिकॉप्टर ड्रोनचे अनेक फायदे आहेत. त्यांना उड्डाणाला लांब धावपट्टी लागत नाही. विमानासारखे ड्रोन उतरवून घेण्यासाठी धावपट्टी किंवा त्यांना पकडण्यासाटी जाळी लागते. ही व्यवस्था हेलिकॉप्टर ड्रोनसाठी करावी लागत नाही. ते कोठूनही सरळ उभ्या रेषेत उड्डाण करू शकतात किंवा उतरू शकतात. ते लक्ष्यावर अधिक काळ घिरटय़ा घालू शकतात किंवा हवेत स्थिर राहून घोंघावू (हॉवर) शकतात. त्यामुळे विमानांच्या तुलनेत हेलिकॉप्टर ड्रोनच्या वापरात अधिक लवचीकता असते. सुरुवातीचे ड्रोन केवळ टेहळणी, हवाई छायाचित्रण, तोफखान्याला आणि युद्धनौकांना तोफांचा मारा अचूक करण्यासाठी मार्गदर्शन करणे आदी कामांसाठी वापरले जात होते. आता ड्रोनवर माफक प्रमाणात शस्त्रास्त्रे बसवून ते हवाई हल्ल्यांसाठीही वापरले जाऊ लागले आहेत.

अमेरिकेच्या नॉरथ्रॉप ग्रुमान या कंपनीने २००० साली एमक्यू-८ फायर स्काऊट हा हेलिकॉप्टर ड्रोन तयार केला. तो ताशी २०० किमी वेगाने २०० किमी परिघात आणि २०,००० फूट उंचीवर, सलग ८ तास टेहळणी करू शकतो. त्यावर हेलफायर क्षेपणास्त्र, लेझर गायडेड बॉम्ब आदी शस्त्रेही बसवता येतात.

sachin.diwan@expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mq 8 fire scout unmanned helicopter
First published on: 26-09-2018 at 01:24 IST