रणगाडय़ांच्या अनेक चाकांवर बसवलेल्या धातूच्या ट्रॅक्सची (चेन) रचना ओबडधोबड जमिनीवरून मार्गक्रमणा करण्यास अत्यंत उपयुक्त होती. त्यामुळे  रणगाडय़ांच्या मूळ चॅसीचा (बॉडीचा) वापर करून त्यावर आधारित अन्य वाहने विकसित करण्यात (डेरिव्हेटिव्ह) आली. विविध प्रकारची कामे करू शकणाऱ्या या रणगाडय़ाच्या सुधारित आवृत्ती होत्या.

रणगाडे जमिनीवरील उंचवटे, खड्डे, चर आदी अडथळे पार करू शकतात. तसेच त्यांना पाण्यातून जाताना अडचण भासू नये हीदेखील एक गरज होती. त्याने पाण्यातून प्रवास करू शकणारे रणगाडे विकसित झाले. ते उभयचर प्राण्यांप्रमाणे जमिनीवर व पाण्यातूनही प्रवास करतात. म्हणून त्यांना अ‍ॅम्फिबियस (उभयचर) रणगाडे म्हणतात. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात शेरमन रणगाडय़ांभोवती जाड मेणाच्या कापडाचा पडदा बसवून त्यांना तरंगण्याची सोय केली होती. हे रणगाडे शेरमन डय़ुप्लेक्स ड्राइव्ह (शेरमन डीडी) म्हणून ओळखले जात आणि ते इटलीजवळील सिसिली बेटावरील कारवाईत वापरले होते. त्यानंतर सोव्हिएत युनियनने १९५० च्या दशकात पीटी-७६ नावाचे पाण्यातून प्रवास करू शकणारे रणगाडे बनवले. त्यांचे चिलखत कमी जाडीचे आणि एकसंध होते. तसेच त्याला नौकेसारखा आकार दिला होता. रणगाडय़ाचे ट्रॅक पाण्यात वल्ह्य़ासारखे काम करत. भारताने १९७१ च्या बांगलादेशमुक्ती युद्धात पीटी-७६ रणगाडे वापरले होते.

याशिवाय रणगाडय़ाच्या चॅसीचा वापर करून आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल तयार केल्या गेल्या. ही वाहने युद्धक्षेत्रात नादुरुस्त झालेली वाहने दुरुस्तीसाठी परत आणण्यासाठी वापरली जातात. तसेच त्यांचा बुलडोझरसारखा वापरही होतो.

रणगाडय़ाचे जमिनीकडील तळाचे चिलखत कमी जाडीचे असते. त्यामुळे भूसुरुंग वापरून रणगाडे उडवता येतात. सुरुंगक्षेत्रातून (माइन फिल्ड) रणगाडय़ांना सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी माइन स्वीपर व्हेईकल बनवल्या जातात. शेरमन क्रॅबसारख्या वाहनात जमिनीत पुरलेले सुरुंग निकामी करण्यासाठी धातूच्या साखळीला पुढे जड धातूचे गोळे असलेली फिरणारी यंत्रणा बसवलेली असते. रणगाडय़ाच्या मुख्य अंगापासून थोडी पुढे धरलेली ही यंत्रणा चाकासारखी फिरते. त्याने त्याच्या साखळ्या गोफणीसारख्या फिरून जमिनीवर आघात करतात आणि सुरुंग निकामी करतात. मध्ययुगात मानवी चिलखताविरुद्ध फ्लेल नावाचे शस्त्र वापरले जायचे. त्याचाच हा सुधारित प्रकार.

sachin.diwan@ expressindia.com