सचिन दिवाण

इराकचा तत्कालीन सर्वेसर्वा सद्दाम हुसेनच्या ताब्यातील कुवेतची मुक्तता करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय फौजांनी १९९१ साली केलेल्या डेझर्ट स्टॉर्म नावाच्या लष्करी कारवाईत स्कड आणि पॅट्रियट क्षेपणास्त्रे प्रसिद्ध झाली. यातील स्कड हे जगातील क्षेपणास्त्र प्रसाराला बरेचसे कारणीभूत आहे.

सोव्हिएत रशियाने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस नाझी जर्मनीतून हस्तगत केलेल्या व्ही-२ क्षेपणास्त्रांच्या आधारावर सुरुवातीची काही क्षेपणास्त्रे तयार केली. त्यात आर-१ किंवा एसएस-१ स्कूनर हे क्षेपणास्त्र होते. त्यानंतर १९५० च्या दशकात मूळ व्ही-२ तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मात्र त्यात बरेच बदल करून आर-११ झेमल्या हे क्षेपणास्त्र तयार केले. त्याला नाटो संघटनेने स्कड असे नाव दिले. स्कड क्षेपणास्त्राची रचना व्ही-२ पेक्षा बरीच वेगळी आणि सुधारित होती. त्याचे इंजिन व्ही-२ पेक्षा खूप सुटसुटीत होते. हा सोव्हिएत युनियनच्या अन्य क्षेपणास्त्रांसाठीचा पाया ठरला. स्कडची रचना सर्गेई कोरोलेव डिझाइन ब्युरोने केली होती. त्याच्या स्कड-ए, बी, सी, डी अशा आवृत्ती विकसित झाल्या. त्यांचा पल्ला १८० ते ७०० किमीपर्यंत होता आणि त्यांच्यावर पारंपरिक स्फोटके, अण्वस्त्रे किंवा रासायनिक अस्त्रे बसवता येत. स्कड क्षेपणास्त्रे १९५७ ते १९८९ या काळात सोव्हिएत सेनादलांत कार्यरत होती.

सोव्हिएत युनियनने साधारण ७००० स्कड क्षेपणास्त्रांचे उत्पादन केले आणि मध्यपूर्व, पूर्व आशिया तसेच पूर्व युरोपातील २१ मित्रराष्ट्रांना स्कड विकली. त्यातून त्यांचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला. इजिप्तने १९७३ सालच्या योम किप्पूर युद्धात इस्रायलविरुद्ध स्कड वापरली. इराणने लिबियाकडून मिळवलेली स्कड १९८५ साली इराकविरुद्ध युद्धात वापरली.

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमालाही स्कड क्षेपणास्त्रांचा बराच फायदा झाला आहे. उत्तर कोरियाची सुरुवातीची ह्वासाँग-५ ही क्षेपणास्त्रे स्कडवर आधारित आहेत. उत्तर कोरियाची ह्वासाँग-६ आणि ७ ही क्षेपणास्त्रे स्कड-सी आणि डी क्षेपणास्त्रांवर बेतलेली आहेत. तसेच सीरिया, इराण, लिबिया, सुदान असा प्रवास करत काही स्कड व्हिएतनामलाही मिळाली आहेत. उत्तर कोरियाने ह्वासाँगनंतर नो-डाँग-२ नावाच्या क्षेपणास्त्रांचा विकास केला. त्याचा आधार घेऊन इराणने शहाब-३ आणि पाकिस्ताननने घौरी-१ किंवा हत्फ-५ क्षेपणास्त्रे विकसित केली. येमेन आणि अफगाणिस्तानमधील युद्धांतही स्कड क्षेपणास्त्रांचा वापर झाला.

सोव्हिएत युनियनने १९५५ साली आर-११ एफएम ही स्कडची पाणबुडीवरून डागता येणारी आवृत्ती बनवली. त्यावरून नवी शस्त्रस्पर्धा सुरू होऊन अमेरिकेने पोलॅरिस, पॉसिडॉन, ट्रायडेंट ही पाणबुडीतून डागण्याची क्षेपणास्त्रे (एसएलबीएम) बनवली. त्यावर सोव्हिएत युनियनने आर-१३ (एसएस-एन-४), आर-२१ (एसएस-एन-५ सार्क), आर-२७ झिब (एसएस-एन-६ सर्ब), आर-२९ (एसएस-एन-८ सॉफ्लाय), स्नाइप, स्टिंगरे, स्टर्जन, श्टिल, सिनेवा, लेनर, बुलावा आदी एसएलबीएम तयार केली. तसेच ब्रिटनने शेवलाइन, फ्रान्सने एम-१, एम-२, एम-४, एम-४५, एम-५१, तर चीनने ज्युलांग नावाची एसएलबीएम तयार केली.

sachin.diwan@ expressindia.com