अमेरिकी सैन्यदलात १९७० च्या दशकात दाखल झालेली एफ-१४ टॉमकॅट आणि एफ-१५ ईगल ही लढाऊ विमाने अनेक अर्थानी क्रांतिकारी होती. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा, संगणकावर आधारित नियंत्रण प्रणाली, रडार, संवेदक (सेन्सर), कॅमेरे, शत्रूची रडार जॅम करण्याची यंत्रणा आणि क्षेपणास्त्रांनी नजरेच्या टप्प्यापलीकडे हल्ला करण्याची क्षमता (बियाँड व्हिज्युअल रेंज कॉम्बॅट- बीव्हीआर) या सगळ्या बाबींमुळे ही विमाने त्या काळातील सर्वोत्तम लढाऊ विमाने (एअर सुपिरिऑरिटी फायटर) बनली होती. त्यात मुख्य पंख मागे वळवता येणारे स्विंग-विंग किंवा व्हेरिएबल जिऑमेट्री तंत्रज्ञान वापरले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र ती अत्यंत महाग विमाने होती. एफ-१४ टॉमकॅट हे विमानवाहू नौकांवरून तैनात केले जाणारे विमान होते. १९७०-१९८० च्या दशकात एका एफ-१४ विमानाची किंमत १७ दशलक्ष डॉलर इतकी होती, तर त्यावरील एका फिनिक्स क्षेपणास्त्राची किंमत ५ लाख डॉलर होती. टॉम क्रुझ या अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेल्या आणि १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘टॉप गन’ या इंग्रजी चित्रपटामुळे एफ-१४ विमाने सामान्य नागरिकांमध्येही प्रसिद्ध झाली.

अमेरिकेतील ग्रुमान आणि जनरल डायनॅमिक्स या कंपन्या मिळून १९६० च्या दशकात एफ-१११ बी हे विमानवाहू नौकांवरून वापरण्याचे विमान विकसित करत होत्या. मात्र तो प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. त्यानंतर ग्रुमान कंपनीने स्वतंत्रपणे एफ-१४ टॉमकॅटची निर्मिती केली. त्याचे पहिले उड्डाण १९७० मध्ये झाले आणि १९७२ ते १९७४ दरम्यान ते अमेरिकी सैन्यदलात सामील झाले. त्या वेळी ते विमानवाहू नौकांवरून वापरले जाणारे स्विंग-विंग प्रकारचे एकमेव विमान होते. त्याचे पंख मागे वळून मागील पंखांना जुळत. ही कृती संगणकांकडून नियंत्रित होत असे. त्यामुळे उड्डाणादरम्यान योग्य प्रमाणात ‘लिफ्ट’ मिळत असे. त्याने एफ-१४ कमी आणि अधिक अशा दोन्ही उंचीवरील कारवायांसाठी उपयुक्त होते. त्याची दोन प्रॅट अँड व्हिटनी जेट इंजिने त्याला ताशी २४८६ किमी इतका वेग प्रदान करत असत.

एफ-१४ वरील रडार एका वेळी २०० किमीवरील, हवेतील २४ लक्ष्ये शोधू शकत असे. त्यापैकी ६ लक्ष्यांवर फिनिक्स क्षेपणास्त्रे डागून ती १६० किमी अंतरावर नष्ट करता येत. याशिवाय कमी अंतरावरील माऱ्यासाठी स्पॅरो आणि साइडवाइंडर क्षेपणास्त्रे आणि एका मिनिटात ७२०० गोळ्या झाडणारी कॅनन होती. एफ-१४ विमानांनी लिबिया, इराण, इराक, सीरिया, बोस्निया आदी युद्धांत भाग घेतला.

sachin.diwan@ expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American f 14 tomcat
First published on: 22-08-2018 at 00:09 IST