या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्कशन लॉकमुळे बंदुकीच्या नळीतील गनपावडरला बत्ती देणे सुलभ झाले असले तरी बंदुकीत दारू आणि गोळी भरण्याची प्रक्रिया त्रासदायकच होती. बंदुकीच्या नळीच्या पुढच्या भागातून दारू आणि गोळी ठासून भरण्याच्या पद्धतीला मझल लोडिंग म्हटले जाते. मझल म्हणजे बंदुकीच्या नळीचा पुढील मोकळा भाग. ट्रिगर दाबल्यावर गन पावडरचा नळीत स्फोट होऊन गोळीला गती मिळते. मात्र या स्फोटात नळीतील गन पावडरचे संपूर्ण ज्वलन होत नसे. त्यामुळे बंदुकीच्या नळीत (बॅरल) आतील पृष्ठभागावर काजळी साठत असे. प्रत्येक वेळी नवी दारू ओतून आणि गोळी भरून ठासताना काजळीमुळे अधिक प्रयास पडत असत. त्याने एका मिनिटात गोळ्या झाडण्याची क्षमता (रेट ऑफ फायर) कमी होत असे.

यावर उपाय म्हणून धातूची गोळी, तिला स्फोटातून गती देणारी गनपावडर, ती पेटवणारा प्रायमर आणि प्रायमर ज्यात भरला जातो ती पर्कशन कॅप हे सगळे भाग एकत्र करून काडतूस (सेल्फ कन्टेन्ड मेटॅलिक काटिर्र्ज) बनवण्यात आले. सुरुवातीला ही काडतुसे जाड कागदाची (पेपर काटिर्र्ज) होती. त्यानंतर ‘मेली’ काटिर्र्ज नावाचे आताच्या काडतुसाच्या जवळपास जाणारे काडतूस वापरात आले. त्यात सुधारणा होऊन नवी प्रायमरवर आधारित काडतुसे आली. त्यात गोळीचा आकार पूर्वीसारखा घनगोल न राहता टोकाला निमुळता आणि पायाकडे दंडगोलाकार बनला. पर्कशन कॅपची जागा धातूच्या पुंगळीने (मेटल केसिंग) घेतली. हॅमरची जागा फायरिंग पिनने घेतली. आता ट्रिगर दाबल्यावर काडतुसाच्या मागील भागातील प्रायमरवर फायरिंग पिन येऊन आदळते. त्याने प्रायमरचा स्फोट होऊन त्यातून गन पावडर पेटते. हा प्रायमर काडतुसाच्या तळाला संपूर्ण चकतीच्या किंवा तळाच्या केवळ मध्यभागी भरलेला असतो. त्यावरून काडतुसांचे ‘रिम फायर’ किंवा ‘सेंटर फायर’ असे प्रकार पडतात.

आता काडतूस तयार झाल्याने बंदूक लोड करणे खूपच सुलभ झाले होते. मझल लोडिंगच्या ऐवजी ब्रिच लोडिंगची पद्धत आली होती. ‘ब्रिच’ म्हणजे बंदुकीच्या फायरिंग चेंबरजवळ असणारी मोकळी खाच. आता बंदुकीच्या पुढून काडतूस न भरता या खाचेतून (ब्रिचमधून) भरले जाऊ लागले होते. म्हणजेच मझल लोडिंगची जागा ब्रिच लोडिंगने घेतली होती.

सुरुवातीला बंदुकीच्या नळीचा आतील पृष्ठभाग गुळगुळीत होता. त्यांना ‘स्मूथ बोअर’ गन म्हटले जाते. मात्र त्याने गोळीची अचूकता कमी होत असे. सुरुवातीच्या बंदुका ५० यार्डाच्या पलीकडे अचूक गोळीबार करू शकत नसत. त्यावर उपाय म्हणून बंदुकीच्या नळीच्या आतील पृष्ठभागावर सर्पिलाकार आटे पाडले जाऊ लागले. त्याला ‘रायफलिंग’ असे म्हणतात. ज्या बंदुकीला असे रायफलिंग केलेले असते तिलाच रायफल म्हणतात. रायफलिंग केल्याने गोळी झाडल्यावर ती हवेत स्वत:भोवती फिरत जाते. त्यामुळे हवेतील प्रवासात गोळीला स्थैर्य मिळते आणि नेम अचूक लागण्यात मदत होते. त्यामुळे स्मूथ बोअर गनपेक्षा रायफलची अचूकता जास्त असते.

एक गोळी झाडल्यानंतर मोकळी पुंगळी (एम्प्टी केस) बाहेर टाकून फायरिंग चेंबरमध्ये नवी गोळी भरण्यासाठी बोल्ट अ‍ॅक्शन, ब्लो-बॅक अ‍ॅक्शन, गॅस ऑपरेटिंग स्टिस्टिम आदींचा शोध लागला होता. त्यात बंदुकीच्या धक्क्याचा (मझल) किंवा स्फोटाच्या वायूंचा पुढील गोळी फायरिंग चेंबरमध्ये आणण्यासाठी वापर होतो.  अनेक गोळ्या भरता येणारी ‘मॅगझिन’ तयार झाली. आता बंदूक वयात आली होती आणि रणभूमीवर धुमाकूळ घालण्यास तयार होती.

sachin.diwan@expressindia.com 

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cartridge rifling
First published on: 23-01-2018 at 04:25 IST