सन १८५३ ते १८५६ या काळात काळ्या समुद्राजवळच्या क्रिमियाच्या द्वीपकल्पात रशिया विरुद्ध ब्रिटन, फ्रान्स, तुर्कस्तान आणि सार्डिनिया असे जे युद्ध झाले ते क्रिमियन युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. (आता हाच क्रिमिया रशियाने युक्रेनकडून हिसकावून घेतला आहे.) क्रिमियन युद्ध पहिले आधुनिक युद्ध मानले जाते. औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीचा युद्धावरील परिणाम प्रथमच ठळकपणे युद्धभूमीवर झालेला पाहायला मिळत होता. अनेक तंत्रांचा प्रथमच वापर केला जात होता.

या युद्धात प्रथमच ब्रिच-लोडिंगची सोय असलेल्या आणि रायफलिंग केलेल्या तोफा वापरल्या गेल्या. तोफखान्याने प्रथमच ब्लाइंड किंवा इनडायरेक्ट फायरिंग केले. म्हणजे त्या वेळपर्यंत तोफांचा पल्ला नजरेच्या थेट पल्ल्यातील असायचा. या वेळी प्रथमच नजरेच्या टप्प्यापलीकडील लक्ष्यांवर तोफा मारा करत होत्या. तसेच बंदुकांमध्येही मिनी बॉलच्या रूपाने प्रथमच एकत्रित काडतूस वापरले जात होते. क्रिमियन युद्धात इलेक्ट्रिक तारायंत्र, भूसुरुंग, रसद पुरवठय़ासाठी रेल्वे यांचा प्रथमच वापर झाला. तसेच प्लोरेन्स नायटिंगल यांच्या परिचारिकांच्या पथकाने युद्धातील जखमींच्या उपचारांसाठी क्लोरोफॉर्मचा सर्वप्रथम वापर केला. इतकेच नव्हे तर युद्धाचे छायाचित्रण आणि वार्ताकनही बहुधा प्रथमच झाले. ‘लंडन टाइम्स’ने विल्यम रसेल नावाचा प्रतिनिधी युद्धाच्या वार्ताकनासाठी पाठवला होता.

Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
Russia-Ukraine war tanks become obsolete in modern warfare
Russia-Ukraine War: आधुनिक युद्धात रणगाडे निकाली निघालेत का?
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
चिप-चरित्र: व्हिएतनाम युद्धाचा असाही लाभ..

या सर्व बदललेल्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत सैन्याचे नेतृत्व करणारे बरेचसे अधिकारी  मात्र काळाच्या मागेच होते. ते जुन्याच पद्धतीने व्यूहरचना करत होते. याचे उदाहरण २५ ऑक्टोबर १८५४ रोजी झालेल्या बॅलाक्लावाच्या लढाईत पाहायला मिळाले. लॉर्ड कार्डिगन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश लाइट ब्रिगेडला रशियन तोफाखान्याच्या फळीवर हल्ला करण्याचे आदेश मिळाले. वास्तविक लाइट ब्रिगेड ही घोडदळाची तुकडी. घोडदळाने तोफांवर थेट हल्ला करणे सयुक्तिक नव्हते. तरीही हल्ला झाला. त्यात लाइट ब्रिगेडच्या साधारण ६०० सैनिकांपैकी ११८ सैनिक मारले गेले आणि १२७ सैनिक जखमी झाले. लाइट ब्रिगेडचे ३३५ घोडे मारले गेले. क्रिमियन युद्धामधील बॅलाक्लावाच्या लढाईमध्ये ब्रिटिश लाइट ब्रिगेडच्या पराक्रमाचे गोडवे गाणारी ‘चार्ज ऑफ द लाइट ब्रिगेड’ ही लॉर्ड आल्फ्रेड टेनिसन यांची कविताही बरीच गाजली.

ब्रिटिश तंत्रज्ञ सर विल्यम आर्मस्ट्राँग यांनी तयार केलेल्या, रायफलिंग असलेल्या तोफा क्रिमियन युद्धात प्रथमच वापरल्या गेल्या. त्यात १२ पौंडांची आर्मस्ट्राँग तोफ विशेष गाजली. तिच्या बॅरलचा आतील व्यास ७.६ सेंटीमीटर (३ इंच) होता. तिचा पल्ला ८.४ किलोमीटर (५.२ मैल) होता.

जर्मनीतील क्रुप या औद्योगिक कुटुंबाने ब्रिच-लोडिंग तोफा बनवल्या होत्या. ब्रिटिशांनीही क्रिमियन युद्धात तशा तोफा वापरल्या. या सुधारणांमुळे तोफखान्याचा पल्ला आणि अचूकता वाढली होती. दृश्यमर्यादेच्या पलीकडील लक्ष्यांवर मारा करताना काही अडचणीही येत होत्या. लक्ष्य डोळ्यांना थेट दिसत नसल्याने तोफेचे गोळे नेमके कोठे पडत आहेत याचा अंदाज लावणे अवघड होते. यावर मात करण्यासाठी धोका पत्करून लक्ष्याच्या जवळ आपला सैनिक पाठवणे गरजेचे होते. अशा सैनिकांना फॉरवर्ड ऑब्झर्वेशन ऑफिसर म्हणतात. त्यांच्या सूचनांनुसार तोफांचा मारा सुधारण्यात येतो. सुरुवातीला या कामासाठी गरम हवेच्या फुग्यांचा (हॉट एअर बलून) वापर झाला. दूरसंवाद तंत्राच्या प्रगतीनंतर हे काम आणखी सुलभ झाले. आता हे काम बरेचसे हेलिकॉप्टर आणि विमानांच्या मदतीने होते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com