माणूस जसजसा टोळ्यांकडून समाजाकडे विकसित होऊ लागला तशी सैन्याची रचनाही अधिक सुसंघटित होऊ लागली. सामुदायिक प्रयत्न कामी येऊ लागल्याने संरक्षक प्रणालीही विकसित होत गेल्या. गावे, शहरे यांच्या सुरक्षेसाठी भिंती, वेशी बांधल्या गेल्या. मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधले गेले. साम्राज्यालाही तटबंदी बांधल्या गेल्या. मग या सगळ्यांवर मात करणारी शस्त्रे आणि आयुधे (siege weapons) विकसित होऊ लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यातील अगदी साधे आयुध म्हणजे लाकडाचा मोठा ओंडका. तो अनेक सैनिक उचलून किल्ल्याच्या दरवाजावर किंवा भिंतीवर वारंवार आदळत. ओंडक्याच्या बाजूला अन्य वजनदार वस्तू लावून त्याला चाकांच्या गाडय़ावर बसवूनही वापरत असत. त्यांना ‘बॅटरिंग रॅम्स’ म्हटले जात असे. भारतीय उपखंडात हत्तींचाही या कामी वापर केला जात असे. हत्तींना दारावर टकरा देण्यास मज्जाव करण्यासाठी दारांवर मोठे खिळे लावले जात. वेढा घातलेल्या गावाभोवती ‘कॅलट्रॉप्स’ नावाने ओळखले जाणारे खिळे मोठय़ा संख्येने पसरले जात. त्यांची चार टोके चार बाजूंना असत आणि जमिनीवर कसेही पडले तरी त्यांची किमान एक टोकदार बाजू वर राहत असे.

या काळात अद्याप बंदुकीच्या दारूचा (गनपावडर) शोध लागला नव्हता. तेव्हा तोफा वापरणे शक्य नव्हते. त्याच्याऐवजी मोठे दगड तटबंदीवर किंवा तटावरून किल्ल्यात किंवा नगरात भिरकावणारी मोठी यंत्रे विकसित केली होती. त्यात कॅटापुल्ट (catapult), बॅलिस्टा (ballista), मँगोनेल (mangonel), ओनेगर (onager), ट्रेब्युशे (trebuchet) अशा यंत्रांचा समावेश होता. या प्रकारच्या आयुधांमध्ये लोकडी चौकटीवर दोर आणि खांब बसवलेले असत. दोरांना खेचून, पीळ देऊन खांबाला अडकवलेले दगड गलोलीने सोडल्याप्रमाणे हवेत भिरकावले जात. त्यासाठी दगड ठेवण्याच्या चमच्यासारख्या खांबाला दुसरीकडे मोठे वजन बांधलेले असे. अशा प्रकारे मोठय़ा दगडांचा तटबंदीवर मारा करून ती फोडली जात असे. काही वेळा या यंत्रांनी पेटते गोळेही किल्ल्यात डागले जात. एकाच वेळी अनेक बाण किंवा भाले डागणारी यंत्रेही उपलब्ध होती.

या साधनांनी शत्रूची मोर्चेबंदी खिळखिळी करून त्याला जेरीस आणल्यानंतर सैन्य तटावरून किल्ल्यात उतरवण्यासाठी लाकडी फळ्या वापरून बांधलेले उंच मनोरे (siege tower) वापरले जात. या उंच मनोऱ्यांच्या मचाण्यासारख्या वरच्या मजल्यावर सैनिक बसवले जात. मनोऱ्यांना खाली चाके असत. त्या आधारे ते अन्य सैनिक तटापर्यंत ढकलत आणि नंतर वरील सैनिक तटावरून चढून किल्ल्यात उतरत. त्यानंतर हातघाईची लढाई होऊन निर्णय होत असे.

वेढा घातलेल्या गावाच्या किंवा नगराच्या भोवती नवी तटबंदी बांधून त्याचा संपर्क तोडणे हादेखील एक उपाय केला जात असे. त्याला ‘सर्कमव्हॅलेशन’ असे म्हणत. याशिवाय गावात किंवा किल्ल्यात कॅटापुल्टसारख्या आयुधांनी जनावरांची मृत शरीरे फेकली जात. ती बहुधा विविध रोगांनी ग्रस्त असत. प्लेगने बाधित उंदीर किल्ल्यात किंवा गावात सोडले जात. गावात विंचू किंवा विषारी सापही सोडले जात. गावाच्या पाणीपुरवठय़ाच्या किंवा अन्नपुरवठय़ाच्या साधनांमध्ये विषारी द्रव्ये मिसळली जात. तसेच गावाभोवती मानवी किंवा जनावरांची विष्ठा टाकून दरुगधी पसरवली जात असे. एक प्रकारे ही अगदी प्राथमिक स्वरूपाची जैविक किंवा रासायनिक शस्त्रे होती. काहीही करून शत्रूचे मनोबल खच्ची करून त्याची लढण्याची इच्छा संपवण्याचे प्रयत्न केले जात.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of weapons part
First published on: 12-01-2018 at 01:05 IST