जमिनीवरील लढायांबरोबरच सागरी युद्धतंत्रही विकसित होत होते आणि त्याने मानवी इतिहासाला कलाटणीही मिळत होती. अशा सागरी लढायांमध्ये सलामिस, लिपँटो, स्पॅनिश अर्माडाचा पराभव आणि ट्राफल्गारची लढाई आदी मोहिमांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. आधुनिक काळातील दोन महायुद्धांमध्ये जटलँड आणि मिडवे येथील सागरी युद्धांनी अशीच महत्त्वाची भूमिका पार पाडली. यातून नौदलाच्या बदलत्या स्वरूपाचे आणि भूमिकेचे दर्शन होत गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्रिस्तपूर्व ४८० मध्ये सलामिस येथील युद्धात जर ग्रीकांनी पर्शियनांचा पराभव केला नसता तर कदाचित युरोपच्या संस्कृतीचे पालक म्हणून ग्रीक राज्यांनी जी भूमिका निभावली ती त्यांना निभावता आली नसती. युरोपीय संस्कृतीवर पर्शियन प्रभाव दिसला असता. ऑटोमन तुर्क साम्राज्याने इ.स. १४५३ साली काँस्टँटिनोपोल जिंकून घेतले आणि बायझंटाइन साम्राज्याला उतरती कळा लागली. त्या युद्धात तुर्क सेनानी सुलतान मेहमेद याच्या जमिनीवरील तोफखान्याने जशी काँस्टँटिनोपोलची तटबंदी फोडण्यात महत्त्वाची कामगिरी निभावली तशीच त्यांच्या नौदलाने अचाट कारवाया करत भूदलाला साथ दिली. त्याने पेरा येथील इटलीच्या वस्तीला वळसा घालून जमिनीवरून काही नौका लाकडी ओंडक्यांवरून घरंगळत नेऊन पलीकडे गोल्डन हॉर्नजवळील खाडीत उतरवल्या आणि काँस्टँटिनोपोलचा वेढा भक्कम केला.

सर फ्रान्सिस ड्रेक आणि होवार्ड यांच्या ब्रिटिश नौदलाने १५८८ साली स्पॅनिश अर्माडाचा पराभव केला नसता तर ब्रिटिश साम्राज्याचा उदयच झाला नसता. सन १५७१ साली एकत्रित ख्रिश्चन सेनेने लिपँटो येथे तुर्काच्या नौदलाचा पराभव करून तुर्क विस्तार रोखला. त्या वेळीही तुर्कापेक्षा प्रभावी सागरी तोफखान्याने ख्रिश्चनांच्या विजयाला हातभार लावला. ब्रिटिश अ‍ॅडमिरल होरॅशियो नेल्सन याने १८०५ साली ट्राफल्गार येथे फ्रान्स आणि स्पेनच्या संयुक्त नौदलाचा पराभव केला. त्याने ब्रिटनच्या भूमीवर फ्रान्सच्या आक्रमणाचा धोका टळला आणि त्यापुढील १०० वर्षे ब्रिटनचे सागरी वर्चस्व अबाधित राहिले.

या युद्धांमध्ये सेनानींच्या कल्पक नेतृत्वाचा जसा वाटा होता, तसाच युद्धनौकांच्या रचनेचा आणि बदलत्या क्षमतांचाही वाटा होता. ख्रिस्तपूर्व ४८० मध्ये पर्शियन सम्राट झेझ्रेस याने जमीन आणि सागरी मार्गाने अथेन्स आणि स्पार्टा या नगरराज्यांविरुद्ध मोठा फौजफाटा गोळा केला होता. थर्मोपिलीच्या लढाईत केवळ ३०० स्पार्टन योद्धय़ांनी जिवाची बाजी लावून त्यांच्या सैन्याला थोडी उसंत मिळवून दिली होती. सलामिसजवळ समुद्रात सुमारे ३०० ग्रीक ट्रायरिम जहाजे आणि ४०० पर्शियन ट्रायरिम जहाजे एकमेकांना भिडली. ग्रीकांनी पर्शियनांच्या तुलनेने खोल नौकांना भुलवून उथळ समुद्रात आणले आणि आपल्या नौकांच्या पुढील टोकदार रॅम-रॉड्सनी धडकून त्यांचा धुव्वा उडवला.

स्पॅनिश अर्माडाच्या पराभवात ब्रिटिश युद्धनौकांच्या रचनेने महत्त्वाची भूमिका निभावली. त्या स्पॅनिश नौकांपेक्षा आकाराने लहान आणि वेगवान होत्या. स्पॅनिश गॅलिऑन आणि कॅरॅक प्रामुख्याने सैन्य जमिनीवर किंवा नौकांवर उतरवण्यासाठी (लँडिंग ऑपरेशन्स) डिझाइन केल्या होत्या. ब्रिटिशांनी त्यांच्या नौकांवरील तुलनेने लांब पल्ल्याच्या तोफांनी अर्माडाचा पराभव केला. १६५३ साली गॅबार्ड येथील सागरी लढाईत लाइन-ऑफ-बॅटल युद्धतंत्रांचा उदय झाला होता. त्यावर मात करत १८०५ साली अ‍ॅडमिरल नेल्सनने दोन ओळींत शत्रूच्या नौकांच्या रेषेवर काटकोनात, मोठय़ा तोफा असलेल्या नौका पुढे ठेवून हल्ला केला. त्याने लढाईचे पारडे फिरले.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

ब्रिटनने जतन केलेली नेल्सन यांची युद्धनौका व्हिक्टरी

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of weapons part
First published on: 19-06-2018 at 01:18 IST