इराणमध्ये १९७९ साली झालेल्या इस्लामी क्रांतीत शहा मोहम्मद रेझा पहलवी यांची राजवट उलथवून टाकून अयातोल्ला रुहोल्ला खोमेनी यांची राजवट अस्तित्वात आली. पहलवी यांना अमेरिकी पाठिंबा होता आणि इस्लामी क्रांतीनंतर त्यांना अमेरिकेत कर्करोगवरील उपचारांसाठी आश्रय देण्यात आला. त्याने संतापलेल्या कट्टर इस्लामी विद्यार्थ्यांच्या गटाने ४ नोव्हेंबर १९७९ ते २० जानेवारी १९८१ या काळात ४४४ दिवस इराणची राजधानी तेहरानमधील अमेरिकी वकिलातीमधील ५२ राजनैतिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्या मुक्ततेसाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी २४ एप्रिल १९८० रोजी ऑपरेशन ईगल क्लॉ नावाने मोहीम राबवली. त्यात इराणजवळच्या समुद्रात तैनात यूएसएस निमिट्झ आणि कोरल सी या अमेरिकी विमानवाहू नौकांवरील होलिकॉप्टरनी वकिलातीत अडकलेल्या अमेरिकींना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ही मोहीम फसली. अमेरिकी आरएच-५३ डी सी स्टॅलियन हेलिकॉप्टर अपेक्षित क्षमतेने कामगिरी करू शकली नाहीत आणि निकामी झाली.

या घटनेनंतर अमेरिकेला नव्या हवाई वाहनाची गरज भासू लागती. त्यात विमानासारखा वेग, लांब पल्ल्यावर कारवाया करण्याची क्षमता तसेच हेलिकॉप्टरप्रमाणे हवेत सरळ उड्डाण करण्याची आणि हवेत स्थिर राहण्याची क्षमता असणे गरजेचे होते. त्यासाठी बेल हेलिकॉप्टर टेक्स्ट्रॉन आणि बोइंग हेलिकॉप्टर्स यांनी संयुक्त विद्यमाने एक प्रकल्प हाती घेतला. त्यातून बेल बोइंग व्ही-२२ ऑस्प्रे या टिल्टरोटर प्रकारच्या विमानाची निर्मिती झाली.

व्ही-२२ ला नेहमीच्या विमानासारखे मुख्य पंख असून त्याच्या टोकाला हेलिकॉप्टरसारखे गोलाकार फिरणारे पंखे (रोटर) आहेत. हे गोलाकार पंखे उड्डाणावेळी आकाशाच्या दिशेने वळवता येतात. त्याने विमान हेलिकॉप्टरप्रमाणे आहे त्या ठिकाणी सरळ हवेत उड्डाण करू शकते. उड्डाणानंतर हे पंखे ९० अंशात वळवून (टिल्ट करून) जमिनीला समांतर ठेवता येतात. त्याने विमानाला पुढील दिशेने गती मिळते. या वळवता येणाऱ्या पंख्यांमुळे व्ही-२२ विमानाला टिल्टरोटर म्हटले जाते.

टिल्टरोटर प्रणालीमुळे व्ही-२२ कमी जागेत उड्डाण करू शकते किंवा उतरू शकते. म्हणजे त्याला व्हर्टिकल/ शॉर्ट टेक-ऑफ, लँडिंग (व्हीएसटीओएल) क्षमता मिळाली आहे. त्यामुळे व्ही-२२ युद्धनौका, लहान धावपट्टय़ा, मैदाने आदी ठिकाणांवरून वापरता येते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of weapons part
First published on: 10-09-2018 at 00:56 IST