ब्रिटनने १९०६ साली एचएमएस ड्रेडनॉट नावाची पहिली मोठी युद्धनौका तयार केली आणि नव्या शस्त्रस्पर्धेला सुरुवात झाली. ब्रिटिश ड्रेडनॉटची लांबी १६३ मीटर आणि वजन (डिस्प्लेसमेंट) १८,११० टन होते. तिच्यावर साधारण ७०० कर्मचारी आणि नौसैनिक असत. त्यावर १२ इंच व्यासाच्या १० तोफा, १२ पौंडी गोळे डागणाऱ्या २४ तोफा, १८ इंच व्यासाचे टॉर्पेडो डागणाऱ्या पाच टय़ूब अशी शस्त्रास्त्रे होती आणि तिचे चिलखती आवरण ११ इंच (२८० मिमी) जाड होते. तरीही तिचा वेग ताशी २१ नॉट्स इतका होता. ती टर्बाइन इंजिनवर चालत असे. यानंतर ड्रेडनॉट हे केवळ एका नौकेचे नाव राहिले नाही तर ते युद्धनौकांच्या तशा प्रकारच्या वर्गासाठी (क्लास) समूहवाचक नाम म्हणून वापरले जाऊ लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर्मनीने ब्रिटनच्या ड्रेडनॉटना प्रत्त्युत्तर देण्यासाठी १९०७ साली प्रथम नासॉ वर्गातील नौकांची बांधणी केली. त्या वेळी जर्मनीकडे टर्बाइन इंजिन उपलब्ध नसल्याने त्यांनी या नौकांसाठी थोडी कमी प्रभावी असलेली ट्रिपल-एक्स्पान्शन इंजिन वापरली. मात्र जर्मन युद्धनौकांवर ब्रिटनपेक्षा जास्त म्हणजे १२ इंच जाड चिलखती आवरण होते. त्यांच्या तोफा १२ इंच (३०५ मिमी) व्यासाच्या होत्या. १९०८-०९ साली अशा चार युद्धनौकांची मागणी नोंदवण्यात आली. १९०९ ते १९११ सालापर्यंत टर्बाइन इंजिन उपलब्ध झाली. मग त्यावर आधारित आणखी पाच युद्धनौका तयार केल्या. १९११-१२ साली आणखी पाच युद्धनौकांची बांधणी केली.

त्यावर ब्रिटनने १९०९ साली ओरायन वर्गातील आणि १९१२ साली क्विन एलिझाबेथ वर्गातील आणखी मोठय़ा युद्धनौका बनवल्या. त्यांच्यावरील १५ इंच (३८१ मिमी) व्यासाच्या तोफा १९२० पौंड (८७० किलो) वजनाचा तोफगोळा २५ किलोमीटर (१६ मैल) अंतरावर डागू शकत असत. ३१,५०० टन वजनाच्या या युद्धनौका ताशी २३ नॉट्सच्या वेगाने प्रवास करू शकत. जर्मनीच्या १५ इंची तोफा असलेल्या बायर्न वर्गातील युद्धनौका १९१६-१७ पर्यंत तयार झाल्या. ऑगस्ट १९१४ पर्यंत ब्रिटनकडे २१ ड्रेडनॉट आणि नऊ बॅटलक्रूझर होत्या. तर जर्मनीकडे १५ ड्रेडनॉट आणि पाच बॅटलक्रूझर होत्या. जर्मन कैसर वर्गातील ड्रेडनॉटवर १२ इंची तोफा आणि १४ इंची चिलखत होते.

पहिल्या महायुद्धात डेन्मार्कच्या जटलॅण्ड द्वीपकल्पाजवळ ३१ मे १९१६ रोजी झालेली ब्रिटन आणि जर्मनीमधील लढाई आजवरची सर्वात मोठी सागरी  लढाई मानली जाते. ब्रिटिश अ‍ॅडमिरल जॉन जेलिको आणि अ‍ॅडमिरल डेव्हिड बिटी यांच्या नेतृत्वाखाली २८ ड्रेडनॉट, नऊ  बॅटलक्रूझर, ३२ क्रूझर, ७७ विनाशिका, एक विमानवाहू नौका आणि एक सुरुंग पेरणारी नौका असा ताफा होता. तर जर्मन अ‍ॅडमिरल राइनहार्ड शीर यांच्या नेतृत्वाखाली २२ बॅटलशिप, पाच बॅटलक्रूझर, ११ क्रूझर आणि ६१ टॉर्पेडो बोट होत्या. जटलॅण्डच्या युद्धात ब्रिटनने १४ तर जर्मनीने ११ युद्धनौका गमावल्या. ब्रिटिश नौदल तोपर्यंत अजेय मानले जात होते. जर्मनीने तो बुरखा फाडला.

सचिन दिवाण

sachin.diwan@ expressindia.com

 

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: German dreadnoughts battleships
First published on: 03-07-2018 at 03:13 IST