अरब देश आणि इस्रायल यांच्यातील १९६७ सालच्या ‘सिक्स डे वॉर’पर्यंत फ्रान्स हा इस्रायलचा प्रमुख शस्त्रपुरवठादार देश होता. युद्धानंतर फ्रान्सने इस्रायलचा शस्त्रपुरवठा थांबवला. त्यानंतर इस्रायलने ब्रिटनच्या चिफ्टन रणगाडय़ाच्या विकास प्रकल्पात भागीदारी केली. पण अरब देशांच्या दबावापोटी ब्रिटनने इस्रायलला या प्रकल्पातून माघार घेण्यास सांगितले. पुढे १९७३ साली झालेल्या योम किप्पूर युद्धात इजिप्त आणि सीरियाने रशियन सॅगर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि आरपीजी-७ या शस्त्रांच्या मदतीने इस्रायलचे अनेक रणगाडे उडवले. ऐन वेळी अमेरिकेने एम-६० पॅटन रणगाडे पुरवल्याने इस्रायलला थोडी मदत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता मात्र इस्रायलने स्वदेशी रणगाडा विकसित करण्याचे ठरवले. त्यातून इस्रायलचा मर्कावा हा अद्ययावत रणगाडा साकारला. मर्कावा म्हणजे किंग सॉलोमनच्या काळातील रथ किंवा देवाचा रथ. त्याचे पहिले प्रारूप १९७४ साली तयार झाले आणि १९७९ साली मर्कावा इस्रायली सैन्यात दाखल झाला. इस्रायली सेनादलाचे मेजर जनरल इस्रायल ताल यांच्या खास देखरेखीत मर्कावा तयार झाला होता. त्यांनी आजवरचा अनुभव लक्षात घेऊन मर्कावाची रचना करताना सैनिकांच्या संरक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यामुळे मर्कावाचे डिझाइन अन्य रणगाडय़ांपेक्षा वेगळे आहे. त्याचे इंजिन पुढील भागात आणि कर्मचाऱ्यांचा कक्ष मागील भागात आहे. त्याने रणगाडय़ावर सामान्यत: समोरून होणाऱ्या हल्ल्यापासून सैनिक वाचण्याची शक्यता वाढते. त्याचे मुख्य दार मागील बाजूस आहे.

त्याच्या चिलखताच्या संरचनेची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण ते कॉम्पोझिट आणि मोडय़ूलर प्रकारचे आहे. मोडय़ूलर चिलखत सलग नसून वेगवेगळ्या मोडय़ूल्स किंवा भागात असते. त्याने रणगाडय़ावर आघात झाल्यास संपूर्ण चिलखत खराब होत नाही. जेवढा भाग खराब झाला असेल तेवढाच बदलता येतो. त्याच्यावर १२० मिमीची मुख्य तोफ आणि मशिनगन आहेत. संरक्षण आणि संहारकतेला अधिक महत्त्व दिल्याने त्याचे वजन जास्त म्हणजे ६१ टन आणि त्याचा वेग काहीसा कमी म्हणजे ताशी ५५ किमी आहे आणि तो एका दमात ५०० किमी अंतर पार करू शकतो.

त्याची रचना तिरपी आणि समोर निमुळती आहे. त्यामुळे शत्रूच्या माऱ्यापासून अधिक संरक्षण मिळते. आजवर त्याच्या मर्कावा-१,२,३ आणि ४ अशा सुधारित आवृत्ती तयार झाल्या आहेत. त्यात त्याची परिणामकारकता वाढली आहे. इस्रायलने मर्कावा सर्वप्रथम १९८२ साली लेबॅननमधील संघर्षांत वापरला. त्यानंतर २००६ आणि २०१४ सालच्या संघर्षांत त्याचा वापर झाला. पण त्या वेळी हिजबुल्ला गनिमी योद्धय़ांनी रशियन कॉर्नेट क्षेपणास्त्रे वापरून मर्कावा रणगाडे फोडले.

sachin.diwan@ expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel main battle tank
First published on: 22-05-2018 at 00:14 IST