‘प्रहार’ हे स्वदेशी बनावटीचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा पल्ला १५० किमी असून ते २०० किलोग्रॅम वजनाची पारंपरिक स्फोटके वाहून नेऊ शकते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) यांनी त्याचा विकास आणि निर्मिती केली आहे. त्याची पहिली यशस्वी चाचणी जुलै २०११ मध्ये चंडिपूर येथून घेतली गेली. तर दुसरी चाचणी सप्टेंबर २०१८ मध्ये पार पडली. प्रहार क्षेपणास्त्राची ‘प्रगती’ नावाची निर्यातीसाठीची आवृत्ती तयार केली आहे. तिचा पल्ला १७० किमी आहे. प्रगती क्षेपणास्त्र २०१३ साली दक्षिण कोरियामध्ये सेऊल येथे पार पडलेल्या ‘अ‍ॅडेक्स’ नावाच्या संरक्षणविषयक प्रदर्शनात प्रथम प्रदर्शित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वी-१ हे १५० किमी पल्ला असलेले क्षेपणास्त्र सेनादलांकडे असताना तितक्याच पल्ल्याचे प्रहार विकसित करण्यात काही विशेष हेतू आहेत. पृथ्वी क्षेपणास्त्रे द्रवरूप इंधनावर आधारित आहेत. अशा क्षेपणास्त्रांना इंधन भरून हल्ल्यासाठी तयार करण्यात काही वेळ जातो. प्रहारमध्ये घनरूप इंधन वापरले आहे. त्यामुळे ते केवळ २ ते ३ मिनिटांत हल्ल्यासाठी तयार करता येते. प्रहारला प्रक्षेपणापासून लक्ष्यावर आघात करण्यास केवळ २५० सेकंद लागतात. पृथ्वी क्षेपणास्त्रांची नेम चुकण्याची शक्यता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) ५० मीटरच्या आसपास आहे. तर प्रहारची सीईपी १० मीटर इतकी कमी आहे. म्हणजेच प्रहार अधिक अचूक आहे. ते विशेष ट्रकवर बसवून त्याची सहजपणे वाहतूक करता येते.

पृथ्वी-१, २ आणि ३ ही क्षेपणास्त्र १५० ते ३५० किमीपर्यंत मारा करू शकतात आणि ५०० ते १००० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. प्रहारची बॉम्ब (वॉरहेड) वाहून नेण्याची क्षमता २०० किलो आहे. त्यामुळे त्यावर अण्वस्त्रे बसवणे कठीण आहे. पण पारंपरिक स्फोटकांचे अनेक प्रकार त्यावरून वाहून नेता येतात. तसेच हे वेगवेगळे बॉम्ब एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांवर टाकण्याची क्षमता (ऑम्निडायरेक्शनल वॉरहेड्स) प्रहारमध्ये आहे.

मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारतीय सेनादलांनी कोल्ड-स्टार्ट डॉक्ट्रिन नावाची नवी युद्धनीती तयार केली. त्यानुसार अण्वस्त्रयुद्धाचा भडका उडू न देता पाकिस्तानवर झंझावाती हल्ले करून त्याला त्याच्या आगळिकीबद्दल शिक्षा देण्याचे तंत्र अवलंबण्यात येईल. त्या वेळी भारतीय सेनादलांच्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्सना हल्ल्यासाठी प्रहारचा उपयोग होईल. भारताकडील तोफखाना आणि रशियन ग्राद बीएम-२१, स्मर्च आणि पिनाक या मल्टिबॅरल रॉकेट लाँचर प्रणाली यांचा पल्ला ३० ते ६० किमी आहे. ही शस्त्रे आणि २५० ते ३५० किमी पल्ला असलेले पृथ्वी क्षेपणास्त्र यांतील दरी प्रहार क्षेपणास्त्राने भरून निघणार आहे. तसेच सुरुवातीच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे तळ, रस्ते, रेल्वे, पूल, इंधनाचे आणि शस्त्रास्त्रांचे साठे आदी लक्ष्यांवर मारा करण्यासाठी प्रहारचा वापर करता येईल. त्यामुळे या कामासाठी वापरली जाणारी लढाऊ आणि बॉम्बर विमाने मोकळी होऊन ती अन्य कारवायांसाठी वापरता येतील.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike missile
First published on: 17-12-2018 at 00:35 IST