सचिन दिवाण

रणगाडय़ांनी युद्धाला जशी गती प्राप्त करून दिली तसेच युद्धतंत्रात अनेक बदलही घडवले. दुसऱ्या महायुद्धात रणगाडय़ांचा वापर बराच वाढला होता.आता सैन्याच्या हालचाली पायदळाच्या सैनिकांच्या किंवा घोडदळाच्या वेगाने होत नव्हत्या, तर रणगाडय़ांच्या वेगाने होत होत्या. त्यामुळे पायदळ आणि तोफखान्यासारख्या अन्य दलांनाही रणगाडय़ांच्या गतीशी जुळवून घेणे गरजेचे बनले.

त्यातून सेल्फ-प्रोपेल्ड आर्टिलरीचा किंवा तोफगाडय़ांचा उगम झाला. या तोफा अन्य वाहनांनी ओढून न्याव्या लागत नव्हत्या. त्या चिलखती वाहने किंवा रणगाडय़ांच्या चॅसिसवर बसवललेल्या होत्या. त्यामुळे त्या वेगाने रणभूमीवर मार्गक्रमणा करू शकत.  १९३९ पर्यंत त्यांचे अस्तित्व नाममात्र होते. पण १९४३ पर्यंत युद्धातील सर्वच देशांनी त्यांचा वापर सुरू केला होता. या तोफा रणगाडय़ांसारख्या दिसत असल्या तरी त्या रणगाडे नव्हेत.

जर्मनीने गेशुट्झवॅगन नावाने सुरुवातीची सेल्फ-प्रोपेल्ड तोफ बनवली होती. त्यानंतर जर्मनीची वास्प नावाची स्वयंचलित तोफ बनवली. पँझर २ रणगाडय़ाच्या चॅसिसवर १०५ मिमीची हॉवित्झर तोफ बसवून वास्प बनवली होती. जर्मनीने १९४० ते १९४४ दरम्यान अशा ७०० तोफा बनवल्या. याशिवाय बायसन नावाची तोफही प्रचारात होती. श्टुर्मगेशुट्झ ३ हा जर्मनीचा सर्वात ओळखला जाणारा तोफगाडा होता. पँझर ३ च्या चॅसिसवर ७५ मिमीची तोफ बसवून तो बनवला होता. तो रणगाडाविरोधी भूमिकेपेक्षा सैन्याविरुद्ध अधिक प्रभावी ठरला. नंतर १०५ मिमीची तोफ वापरून श्टुर्मगेशुट्झ ४ हा तोफगाडा बनवला गेला. याशिवाय हमिंगबर्ड (हमेल)  हा १५० मिमीचा तोफगाडाही होता. जर्मनीने कार्ल नावाचा सर्वात मोठा तोफगाडाही बनवला होता. त्याच्या ५४०  मिमी आणि ६०० मिमी व्यासाच्या मॉर्टर बसवलेल्या दोन आवृत्ती होत्या. जर्मनीचे  श्टुर्मटिगर किंवा श्टुर्मपँझर आणि वाफेनट्रेगर हे तोफगाडेही वाखाणण्याजोगे होते.

ब्रिटिश कॉमनवेल्थ देशांत सेक्स्टन आणि बिशप हे दोन महत्त्वाचे तोफगाडे वापरात होते. रॅम रणगाडय़ाच्या चॅसिसवर २५ पौंडी तोफ बसवून सेक्स्टन बनवला होता. तर व्हॅलेंटाइन रणगाडय़ाच्या चॅसिसवर २५ पौंडी तोफ बसवून बिशप हा तोफगाडा बनवला होता. त्याने उत्तर आफ्रिकेतील आणि इटलीतील लढायांत चांगली कामगिरी बजावली. पुढे अमेरिकी एम ७ प्रिस्ट या तोफगाडय़ांनी त्यांची जागा घेतली. एम ३ मध्यम रणगाडय़ाच्या चॅसिसवर १०५ मिमीची तोफ बसवून प्रिस्ट तोफगाडा बनवला होता. प्रिस्टचा वापर अमेरिकी सैन्याने प्रशांत महासागरातील बेटांवरील लढायांत केला. तसेच ब्रिटिश लष्कराने आफ्रिकेतील अल-अलामिनच्या लढाईतही त्याचा वापर केला. अमेरिकेने १५५ मिमी एम ४० हा तोफगाडाही बनवला होता. त्यासाठी शेरमन रणगाडय़ाचे चॅसिस वापरले होते.

सोव्हिएत युनियनने आयएसयू-१५२ आणि आयएसयू- १२२ हे तोफगाडे वापरले. केव्ही-२ रणगाडय़ावर १५२ मिमी आणि १२२ मिमीच्या तोफा बसवून हे तोफगाडे बनवले होते. टी-७० रणगाडय़ाच्या चॅसिसवर ७६.२ मिमी तोफ बसवून रशियाने एसयू-७६ हा तोफगाडा बनवला होता.

दुसऱ्या महायुद्धात जपानची शस्त्रे फारशी उत्कृष्ट नसली तरी त्यांनी टाइप-४ हो-रो नावाचा तोफगाडा बनवला होता.

sachin.diwan@ expressindia.com