सचिन दिवाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा स्वत:चा मेन बॅटल टँक (एमबीटी) असावा अशी कल्पना १९६० च्या दशकात पुढे येऊ लागली. ब्रिटिश आणि जर्मन रणगाडय़ांची चाचपणी करून ऑगस्ट १९६१ मध्ये ब्रिटिश व्हिकर्स लिमिटेड (नवे नाव व्हिकर्स डिफेन्स सिस्टिम्स) या कंपनीशी भारतासाठी रणगाडा विकसित करण्याचा करार करण्यात आला. त्यानुसार सुरुवातीला भारतासाठी रणगाडय़ाचे प्राथमिक प्रारूप (प्रोटोटाइप) बनवून ९० रणगाडे ब्रिटनमध्ये तयार करून भारताला देण्याचे ठरले. तसेच तामिळनाडूतील चेन्नईजवळील आवडी येथे स्वदेशी रणगाडा निर्मितीचा कारखाना उभारून ‘विजयंता’चे उत्पादन होऊ लागले. ब्रिटनमध्ये विजयंताची पहिली प्रारूपे १९६३ साली तयार झाली. त्यात सुधारणा करून जानेवारी १९६५ पासून आवडी येथील ‘हेवी व्हेईकल फॅक्टरी’मधून स्वदेशी विजयंता रणगाडय़ांचे उत्पादन होऊ लागले. तेव्हापासून १९८३ पर्यंत १२०० ते २२०० विजयंता रणगाडय़ांचे उत्पादन झाले. १९६५ पासून २००८ पर्यंत विजयंताने भारतीय चिलखती दलांना बळ पुरवले. बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात ते प्रत्यक्ष वापरले गेले. विजयंता रणगाडय़ाच्या मूळ संरचनेत थोडे बदल करून ‘कॅटापुल्ट सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी’ (स्वयंचलित तोफ), ‘कार्तिक आर्मर्ड व्हेईकल-लाँच्ड ब्रिज’ (पूल उभे करण्याचे यंत्र) आणि ‘विजयंता आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल’ अशी चिलखती वाहने बनवण्यात आली. डिझेल इंजिनवर चालणारा ४३ टनी विजयंता ताशी ५० किलोमीटरच्या वेगाने ५३० किलोमीटपर्यंत मजल मारू शकत असे. त्याचे चिलखती आवरण ८० मिलीमीटरचे होते आणि त्यावर १०५ मिलीमीटर व्यासाची मुख्य तोफ आणि मशीनगन्स बसवल्या होत्या.

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijayanta and arjun tanks
First published on: 03-12-2018 at 02:28 IST