पर्यावरणाविषयीची कळवळ व आत्मियता व्यक्त करून पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, तर प्रात्यक्षिकातून ती व्यक्त केली तरच पर्यावरणाचे संवर्धन करता येईल. युवा पिढीकडून या प्रात्यक्षिकाची अपेक्षा बाळगावी का, यासारखे अनेक प्रश्न ज्येष्ठांनी उपस्थित केलेले असताना हीच युवा पिढी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्षात काम करत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मातीच्या पर्यावरणपुरक गणेशमूर्ती तयार करून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडवून पर्यावरण ऱ्हासात भर घालणाऱ्यांना चपराक दिली आहे.
शासकीय चित्रकला महाविद्यालयात प्रशिक्षण घेणारा राकेश पाथराबे या विद्यार्थ्यांने पाच-सहा वर्षांपूर्वी ही सुरुवात केली. कुटुंबीयांच्या अर्थार्जनाला हातभार हे एक कारण असले तरीही गणेशमूर्ती तयार करण्याची लहानपणापासूनची आवड त्याला या क्षेत्रात घेऊन आली. त्यांच्या या मूर्ती म्हणजे केवळ मूर्ती नाही, तर त्यातून समाजाला एक संदेशही दिला जातो. शिवाय, आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, जे केवळ अ‍ॅनिमेशन चित्रपटातून पाहायला मिळते, ते विविध विषयांवर आधारित गणेशमूर्तीमधून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. चालू घडामोडींवर आधारित गणेशमूर्ती तयार केल्या जातात. त्याचे सहकारी विद्यार्थीच नव्हे, तर दोन भाऊसुद्धा अशी सुमारे दहा जणांची चमू यात काम करत आहे. महाविद्यालयाकडूनही त्यांना या काळात विशेष सूट दिली जाते. कारण, गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिने आधीपासून त्यांच्या कामाची सुरुवात होते. पहिल्या वर्षी त्यांनी केवळ पाचच गणेशमूर्ती बनवल्या. नंतर जसजसे सहकार्य मिळत गेले, तसतशी त्यांच्या कार्याला गती येत गेली. तीन फुटांपासून तर ११-१२ फु टापर्यंत मंडळाच्या ऑर्डरनुसार मूर्ती तयार केल्या जातात. त्यांचा कुठे स्टॉल लागत नाही किंवा कोणत्या दुकानात मूर्ती विकण्यासाठी ठेवल्या जात नाही. आदिवासी कॉलनीतील राणी दुर्गावती चौकात ही मित्रमंडळी जमतात आणि रात्रंदिवस त्यांचे काम सुरू राहते. कोमल भालदरे, केशव पाथराबे, धरमराज पाथराबे, हर्षल पाथराबे, नीरज पाथराबे, रोहीत पाथराबे, कृणाल बोंद्रे, मनोज रहांगडाले या चमूचा गणेशोत्सवातील अ‍ॅनिमेशनचा प्रयोग, पण त्याचवेळी पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम नागपूरकरांसाठी लक्ष्यवेधक ठरला आहे.

मूर्तीची विटंबनाही होणार नाही
राकेश आणि त्याच्या चमूच्या गणेशमूर्ती सुमारे ९९ टक्के पर्यावरणपुरक असतात. हेल्मेट जनजागृतीच्या दृष्टीने तयार केलेली लोखंडी दुचाकीवरील शंकर-पार्वतीसह गणेशमूर्ती तयार होण्यापासूनच नागपूरकरांचे आकर्षण ठरतेय. लोखंडी बाईक असताना हे पर्यावरणपुरक कसे, असा प्रश्न अनेकांना पडला असला तरी त्यातही त्याने मार्ग शोधला आहे. या मूर्ती त्याने नटबोल्टच्या सहाय्याने दुचाकीवर बसवल्या आहेत, त्यामुळे विसर्जनाच्या वेळी ही चमू स्वत: तेथे जाणार असून नटबोल्ट काढून केवळ मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाईल आणि बाईक परत आणली जाईल. अशाच काही एक टक्का वस्तू अन्यही गणेशमूर्तीमध्ये वापरण्यात आल्या आहेत, पण विसर्जनाआधी त्या वेगळ्या काढता येतील आणि मूर्तीची विटंबनाही होणार नाही, अशी व्यवस्थाही केली आहे.

या मूर्ती तयार करताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, याची खबरदारी घेण्याची सुरुवातच मातीच्या मूर्ती तयार करण्यापासून होते. सावरगाव, आंधळगाव, वाठोडा येथून माती आणून त्यापासून मूर्ती तयार केल्या जातात. काकांना असलेली आवड माझ्यातही रुजली आणि तेव्हा नाही, पण आता मी ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण हेडाऊ यांच्याकडे तीन-चार वर्षे काम करून मूर्तीकलेचे धडे गिरवले. आता आवडही जोपासली जात आहे आणि अर्थार्जनही होत आहे.
– राकेश पाथराबे, विद्यार्थी