महाराष्ट्रावरचे आणि देशावरचे विघ्न बाप्पाने दूर करावे असे साकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीला घातले. गणेशोत्सवा निमित्त त्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. पुण्यातील शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेता आले याचा आनंद होतो आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपला देश भ्रष्टाचार आणि दहशतवादमुक्त होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवभारत निर्माणाचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या मंदिरात महालाचा देखावा उभारण्यात आला आहे. या महालाला जी विद्युत रोषणाई करण्यात आली त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आरती देखील केली. तर मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक,खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ,महापालिकेतील पदाधिकारी आदी उपस्थित होते.