Ganesh Utsav 2018 : गेल्या अनेक काळापासून प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी महत्वाचा असणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाच वातावरण पसरलं आहे. प्रत्येक घराघरामध्ये गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असून अनेक महिला या काळामध्ये होणाऱ्या हरितालिकेच्या व्रताचीही तयारी करताना दिसत आहेत. हरितालिकेचं हे व्रत आपल्या पतीसाठी केलं जात असल्यामुळे या व्रताचं महत्व अनन्यसाधारण आहे.

हरितालिका हे व्रत भाद्रपद शुल्क तृतीयेला केले जाते. भगवान शंकर आपल्याला पती रुपाने मिळावा यासाठी पार्वती देवीने हे व्रत केलं होतं. तेव्हापासून हे व्रत कुमारिकेपासून लग्न झालेल्या महिलांपर्यंत केलं जातं. विशेष म्हणजे हे व्रत दरवर्षी न चुकता केलं जातं. सौभाग्यप्राप्तीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अनेकजणी हे व्रत निर्जळी किंवा उपाशी राहून करताना दिसतात.

हरितालिकेच्या व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे. तसंच महाराष्ट्रात ‘हरतालिका’ तृतीयेच्या दिवशी पूजण्याची प्रथा असली तरी दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीनं हरतालिकेचं व्रत केलं जातं. हरतालिकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते. यात गौरीचा केवळ मुखवट्याची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात अनेक गावात समुद्रावरील वाळू किंवा शेतातली माती आणून सखी, पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.

‘हरितालिका’ नावाशी जुळणारे पण वेगळ्या पद्धतीने विधी करण्यात येणारे ‘हरिकाली’ व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केलं जातं. या हरिकाली देवीमागे एक कथा आहे, असं म्हणतात. दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला शंकराने सर्वादेखत ‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’ असे म्हटले. त्यामुळे कालीने चिडून हिरवळीवर स्वत:ची हरित सावली फेकली आणि अग्निप्रवेश करून ती हिमालयाची कन्या गौरी म्हणून जन्माला आली. तर सावलीतून ‘कात्यायनी’ देवी निर्माण झाली. पुढे युद्धात ‘कात्यायनी’ देवीने देवांना केली. ती नंतर ‘हरिकाली’ नावानं ओळखली जाऊ लागली.

त्यामुळे भाद्रपद शुक्ल तृतीयेला काही ठिकाणी हरिकालीचेही व्रत केलं जातं. फक्त स्त्रियाच नाही पुरुष देखील तिची पूजा करतात. यात सुपामध्ये सात धान्ये पेरून त्यांचे अंकुर आले की त्यावर देवीचे आवाहन करून पूजन केले जाते. त्यानंतर पहाट उजाडायच्या आत तिचं विसर्जन करण्याची देखील प्रथा आहे.

(हा लेख लोकप्रभा मासिकातील ‘चतुर्थी व्रताचा मागोवा’ लेखावर आधारित आहे.)