सध्या देशभरामध्ये गणेशोत्सवाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिक बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत. या साऱ्या धामधुमीमध्ये मराठमोठी अभिनेत्री स्मिता तांबेदेखील बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. स्मिताच्या घरी सात दिवस गणपती बाप्पा विराजमान असतात. विशेष म्हणजे स्मिता कधीही बाप्पाची मूर्ती बाहेरुन विकत आणत नाही. दरवर्षी स्मिता इको-फ्रेंडली मूर्ती तयार करत असून यंदाही तिने स्वत:च्या हाताने ट्री-गणेशा साकारला आहे.

स्मिता जेवढ्या तन्मयतेने आपल्या भूमिका साकारते, तेवढ्याच तन्मयतेने तिने तिच्या बाप्पाची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती स्मिताने शाडूपासून तयार केली असून ती घडवत असताना या मातीमध्ये बियाणे टाकले आहेत. सात दिवस झाल्यानंतर स्मिता या मूर्तीचं घरातील कुंडीत विसर्जन करते. त्यामुळे गणपती विसर्जनानंतरही झाडांच्या रुपामध्ये त्यांचा बाप्पा त्यांच्या जवळ राहतो.

“मी आणि माझे यजमान आम्ही गणेशोत्सवाच्या अगोदर आठ दिवसांपासून तयारीला सुरूवात करतो. ते गणेशाची मुर्ती घडवतात. त्याला रंगवतात आणि मुर्तीला आभुषणे-वस्त्र हे सर्व मी करते. आम्ही शाडूच्या मातीची मुर्ती घडवताना मुर्तीमध्ये बियाणं टाकतो. आम्ही मूर्ती घरीच कुंडीत विसर्जित करतो. त्यामुळे विसर्जनानंतरही बाप्पाचा आशीर्वाद त्या नव्या उगवलेल्या रोपाच्या रूपात आमच्यासोबत कायमचा राहतो,” असं स्मिताने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “आमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना जेव्हा आमची गणेशोत्सव साजरा करण्याची ही पध्दत समजली. तेव्हा त्यांनी आम्हांला त्यांच्या घरच्या गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार आग्रह धरला. त्यामुळे आता आम्ही आमच्या घरच्या गणपतीशिवाय गणेशोत्सवाच्या अगोदर जवळ-जवळ सात ते आठ गणेश मूर्ती तयार करतो.”

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळामध्ये स्मिता कोणत्याही चित्रपटाचं किंवा नाटकाचे प्रयोग करत नाही. कारण वर्षांतून एकदा बाप्पाचं घरी आगमन होतं. त्यामुळे घर स्वच्छ करण्यापासून, ते बाप्पाच्या आभूषणांपर्यंत सारं काही स्मिताला करायचं असतं.