गणपतीबाप्पाची आरास अधिकाधिक आकर्षक व्हावी यासाठी विदर्भातील बाजारपेठा नानाविध वस्तूंनी सज्ज झाल्या आहेत. नागरिकही तितक्याच उत्साहाने सजावटीचे साहित्य खरेदी करताना दिसतात. प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बाबतीत सगळीकडे जनजागृती केली जात असली तरी बाजारपेठेत प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंचे प्रमाण अधिक असून पर्यावरणपूरक वस्तू अभावानेच आढळून येत आहेत.
शुक्रवारी गणरायाची प्रतिष्ठापना असल्यामुळे बाजारात रंगीबेरंगी फुले, फळे, पताका, थर्माकोलने तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रसिद्ध देवस्थानच्या प्रतिकृतींची मंदिरे, चमचमणारी तोरणे, पडदे व गणपतींची आकर्षक मूर्ती खरेदी करण्यासाठी सध्या बाजारपेठेमध्ये लोकांची लगबग वाढली आहे. यावर्षी बाजारात थर्माकोलच्या विविध आकाराच्या मंदिराच्या प्रतिकृती खरेदीसाठी आल्या असून गणेशभक्तांची त्यांना मोठी मागणी आहे. मोगरा, झेंडू, गुलाब आदी कापडी आणि प्लास्टिक फुलांचे हार व प्लास्टिकचे द्राक्षे, आंबा, संत्री, सफरचंद अशी विविध फळे गणरायाची शोभा वाढवण्यासाठी बाजारपेठेत दाखल झाली आहे. गणपतींच्या मूर्तीला लागणारे आभूषण व सजावटीसाठी लागणाऱ्या सामानाची विक्री जोमात सुरू आहे. प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या विविध शोभेच्या वस्तू बाजारात विक्रीला असताना गणेश उत्सवानंतर त्याचा उपयोग काहीच होत नसल्यामुळे ते विसर्जनाच्यावेळी तलावात टाकले जाते. इकोफ्रेंडली गणेशोत्वसाबाबत जनजागृती केली जात असली तरी त्याचा उपयोग फारसा होताना दिसत नाही. सजावटीसाठी सुद्धा पर्यावरणाला घातक अशा अनेक शोभेच्या वस्तू बाजारात विक्रीला आहेत.
विक्रेते बंडू ऐपतवार म्हणाले, आमच्याकडे थर्माकोलपासून बनविलेले गोवा मंदिर, महादेव मंदिर, कमलचक्र मंदिरांसह जाळ्या आहेत, तसेच गणरायासाठी विविध प्रकारची आसनेही तयार करण्यात आली आहेत. गणेश उत्सव काही तासांवर आल्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. मोठय़ा दुकानदारांबरोबरच रस्त्यावरील छोटे विक्रेत्यांजवळील झुंबर, विविध रंगांचे हार, फुले, मुकुटमणी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे घातक असले तरी याशिवाय पर्याय नाही. गणेशोत्सवानंतर थर्माकोलचा उपयोग घरात सजावटीसाठी होऊ शकतो. मात्र, अनेक लोक खराब झाले की फेकून देतात. गणरायाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाल्याचे दिसत आहे. महालक्ष्मी व दहा दिवस गणपतींच्या पूजेसाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सजावटीच्या सामानांची प्रदर्शनेही शहरात सुरू आहेत. कलाकार मंडळी  मूर्तीना रंगरूप देण्यात गढून गेली आहेत. विविध वाद्यवृंद, मनोरंजनाचे कार्यक्रम करणाऱ्यांना गणेश मंडळे आमंत्रित करून तारखा ठरवित आहे. मंडळांचा हा उत्साह असताना घरगुती गणेशोत्सवाची तयारीही जोरात सुरू आहे. एकूणच शहरातील घराघरामध्ये, बाजारपेठेत, गल्लीत, मंडळांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह जाणवायला लागला आहे.