गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांची संख्या आणि पथकातील ढोलांच्या संख्येवर आलेली बंधने ध्यानात घेऊन ढोल-ताशा पथकांनी गणरायाच्या प्रतिष्ठापना मिरवणुकांमध्ये मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. जणू शहरातील सर्व ढोल रस्त्यांवर आले. सळसळत्या तरुणाईच्या उल्हासामध्ये ढोल-ताशांच्या गजराने सोमवारी शहर दणाणून गेले. दोन मंडळांपुढे वादन करणारी ढोल-ताशा पथके समोरासमोर आल्यानंतर ‘अरे आव्वाज कुणाचा’ हे चित्र गणेशभक्तांनी अनुभवले.
गेल्या वर्षीपर्यंत ७५ ते १०० पर्यंत मर्यादित असलेल्या ढोल-ताशा पथकांची संख्या यंदा अडीचशेच्या घरामघ्ये गेली आहे. या सर्व पथकांना विसर्जन मिरवणुकीमध्ये सामावून घेणे गणेश मंडळांना अवघड आहे. काही ढोल-ताशा पथकांना मंडळाकडून वादनाची सुपारी मिळते. तर, नव्याने स्थापन झालेली काही पथके ही गणरायाच्या चरणी सेवा म्हणून आपला आविष्कार साकारतात. ढोल-ताशा पथकामध्ये वादन करणे ही युवा पिढीची ‘पॅशन’ झाल्यामुळे अनेकांचा सहभाग वाढला आहे. शिवाय दोन महिने आधीपासून ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू असतो. त्यामुळे या कलाकारांच्या आविष्काराला संधी मिळण्याबरोबरच कलेच्या दैवतासमोर वादन करण्याचा आनंद मनापासून लुटणारे युवकही पथकांसाठी विधायक शक्ती झाली आहे.
गेल्या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाचे गणपती असलेल्या विविध मंडळांसमोर ढोल-ताशा वादन करण्यासाठी पथकांमध्ये स्पर्धा होती. काही पथकांनी लक्ष्मी रस्त्यावरच वादनाचा आग्रह धरल्यामुळे विसर्जन मिरवणुकीचा कालावधीदेखील वाढला होता. त्याचप्रमाणे पथकाबरोबर असलेले काही युवक दोरीने रस्ता अडवून नागरिकांना तेथून जाऊ देत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या कारणास्तव यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळासोबत दोनच पथके आणि एका पथकामध्ये केवळ ३५ ढोल ही बंधने पोलिसांनी आणली.
विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांच्या संख्येवर बंधने आल्यामुळे ही कसर यंदा गणेश प्रतिष्ठापना मिरवणुकांमध्ये भरून निघाली. या तरुणाईच्या ऊर्जेला वाट करून देण्यासाठी प्रतिष्ठापना मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळासमोर किमान तीन ढोल-ताशा पथकांनी आपल्या कलाविष्काराचा आनंद गणेशभक्तांसमवेत लुटला. मानाच्या गणपतींपुढे बहारदार वादन करीत पथकातील कलाकारांनी नागरिकांना खिळवून ठेवले. शहराच्या मध्य भागामध्ये दोन मंडळांच्या मिरवणुका समोरासमोर आल्यानंतर दोन्ही बाजूच्या पथकातील ढोल-ताशांच्या निनादाने शहर दणाणून गेल्याचे दृष्य सायंकाळपर्यंत दिसून आले. हलक्या पाऊससरींनी कलाकारांचा जोश वाढला आणि जो तो आपला ढोल बडवतच राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 250 dhol tasha teams in this ganeshotsav procession
First published on: 10-09-2013 at 02:40 IST