गणेशोत्सवाचे आगमन, विसर्जन असो की कुठलीही मिरवणूक, ढोल ताशांच्या आवाजाच्या तालावर धुंद होऊन नाचणारे गणेश मंडळांचे कार्यकर्ते.. असे चित्र दरवर्षीच बघायला मिळत असते. गेल्या पाच-सहा वर्षांत डीजेचे प्रमाण वाढले असले तरी ढोल ताशांना मात्र आजही पूर्वी इतकीच मागणी आहे.
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून येत्या सोमवारी गणेश विसर्जनानिमित्त विविध मंडळांच्या तयारीला सुरुवात झाली असून ढोल ताशे, बँड, गुलाल, गणपतीची मूर्ती नेण्यासाठी गाडी, गाडीची सजावट आदी व्यवस्था ठरविण्यासाठी मंडळांची धावपळ सुरू झाली आहे. शहरातील सक्करदरा, तुकडोजी पुतळा, बडकस चौक, मानेवाडा, रामनगर, इतवारी, मस्कासाथ, पाचपावली या भागात ढोल ताशे (संदल) वाजविणारे दिसून येतात. या शिवाय धामणगाव, भंडारा, पुलगाव या भागातील अनेक ढोल ताशे वादकांची चमू गणेश विसर्जनानिमित्ताने नागपुरात स्थायिक झाली आहे.
ढोल ताशांची संख्या विशेषत: ग्रामीण भागात राहत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत शहरात ढोल ताशे वाजवणारी पथके तयार होत असून त्यांना या निमित्ताने रोजगार मिळाला आहे.  मोठय़ा ढोलची पद्धत खरेतर पुण्याची, पण आता ती विदर्भात रूढ झाली असून गणेश विसर्जनाच्या वेळी ही पथके नागपुरात असतात. मिरवणुकीमध्ये वाजविली जाणारी वाद्ये साधारणत: पुणे, मुंबई आणि कोलकाता या भागात तयार केली जातात.
नागपुरातील जागनाथ बुधवारी भागातही काही वाद्ये तयार केली जात असून या वाद्यांची गेल्या काही वषार्ंत मागणी वाढली आहे.
धामनगावमधील चाळीसगाव बँड पार्टीचे मंगल अडागळे यांनी सांगितले, गणेशाच्या आगमनाच्या दोन दिवस आधी बँड पार्टी मंडळाच्या गाडीतून नागपुरात दाखल होते. सर्व वाद्ये तयार ठेवली जातात. सराव केला जातो. नागपूर आणि नागपूरच्या बाहेरील ऑर्डर्स मिळतात. पंधरा कलाकारांच्या संचासाठी पाच ते आठ हजार रुपये मिळतात. आजचा काळ डीजे, सीडी प्लेअरचा असला, तरी ढोल, ताशा वापरणे मंडळांनी बंद केलेले नाही. शहरात ७० ते ८० ढोलताशांची पथके असून त्यांना वर्षभर वेगवेगळ्या उत्सवात निमंत्रित केले जाते. गणेश उत्सवात डीजे बोलविला तर तीन ते चार हजार रुपये घेत असतात. बँड पार्टीसुद्धा दोन हजारापासून आठ हजार रुपयांपर्यत पैसे आकारतात. मात्र, ढोल ताशेवाले केवळ एक हजार ते दीड हजार रुपयात वाजवतात. विशेषत: गजाननाच्या आगमन आणि विसर्जनाच्यावेळी ढोल ताशे आवर्जून वापरले जातात. त्याचा नाद निराळाच असतो. प्रत्येकजण थिरकायला लागतो.  
ढोल ताशा वाजविणे हे रोजगाराचे साधन नाही, तर केवळ आवड म्हणून शहरातील चार युवकांनी गेल्या वर्षी शिवमुद्रा नावाची स्थापना करून ढोल पथक तयार केले असून आज त्यांच्या पथकामध्ये १३० युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. शिवमुद्राबाबत बोलताना पराग बागडे म्हणाले, गजानन जोशी, सुरज धुमारे, साकेत भोयर अजिंक्य समर्थ यांनी प्रारंभ केला आणि त्यानंतर एक एक करीत महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यवसायी व युवती सहभागी झाल्या. ८३ वषार्ंच्या तारे काकांपासून ते आठ वषार्ंचा शार्दुल या शिवमुद्रामध्ये आहे. सध्या आमच्याकडे ४० ढोल आणि १५ ताशे आहेत. पुण्याला असलेले गजानन जोशी नागपूरला आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेत ढोल आणि ताशे वाजविण्याचे प्रशिक्षण दिले. ज्यांना तालाचे ज्ञान नाही असेही काही युवक यात सहभागी झालेले आहेत. यात १५ युवती असून काही विवाह झालेल्या आहेत. घर आणि व्यवसाय सांभाळून केवळ छंद म्हणून ढोल वाजवायला येतात. महाराष्ट्रातील संस्कृती आणि सामाजिक दायित्व या भूमिकेतून ही संस्था निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी संस्थेला जो पैसा मिळतो त्यातील काही वाटा सामाजिक कार्यासाठी खर्च करीत असतो. अंध विद्यालयाला आर्थिक मदत केली आहे. शिवाय संस्थेतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले आहे. दररोज सायंकाळी अंध विद्यालयाच्या परिसरात ढोल ताशा पथकाचा सराव असतो. आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेले काही बेरोजगार युवक यात आहेत. गणेशोत्सवामध्ये दहाही दिवस वेगवेगळ्या मंडळात कार्यक्रम सादर करीत असतो.  सध्या आमच्या पथकाची मागणी वाढली असून अनेक लोक पथकामध्ये सहभागी होण्यासाठी विचारपूस करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhol tasha drums dance celebration on ganesh procession
First published on: 06-09-2014 at 02:15 IST