वेगळी वाट (४)
‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा सर्वपरिचित असली तरी त्याचे अनुकरण प्रत्यक्षात करणेही तितकेच महत्त्वाचे. या प्रतिज्ञेतील सर्वधर्मसमभाव दैनंदिन जीवनात कसा जपला जाऊ शकतो, याचा आदर्श मनमाडच्या युवक क्रांती गणेश मंडळाने घालून दिला आहे. साधारणत: ३६ वर्षांपूर्वी हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध अशी सर्व विद्यार्थी मंडळी एकत्र आली आणि या मंडळाची स्थापना झाली. आजतागायत मंडळाने भव्य दिव्य देखाव्यांसोबत सामाजिक उपक्रमांची कास सोडलेली नाही. रक्तदान शिबिरापासून समाजातील गरजूंना भक्कम आर्थिक आधार देण्याचे कार्य मंडळ करत आहे. मंडळाच्या सक्रिय मदतीमुळे काही गरजू विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या मनमाड शहराची ‘कॉस्मोपॉलिटन’ अशी ओळख बनली आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवाला युवक क्रांती गणेश मंडळाच्या कार्याने वेगळा आयाम लाभला. आधी आझाद सभागृहासमोर बसविला जाणारा मंडळाचा गणपती गेल्या काही वर्षांपासून मालेगाव रस्त्यावरील इंदिरा गांधी शॉपिंग सेंटरसमोर विराजमान होतो. १९७८ साली तत्कालीन महाविद्यालयीन सर्वधर्मीय विद्यार्थ्यांनी एकत्र येत युवक क्रांती गणेश मंडळाची स्थापना केली. त्यात मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध धर्मीयांसह हिंदू धर्मीय सभासद असलेले हे मंडळ आजही सर्वधर्मसमभाव जपत आहे.
मंडळाचे सभासद वेगवेगळ्या पक्षांत विविध पदांवर कार्यरत आहेत. मात्र राजकारण तसेच जातीयवादाचे ‘लेबल’ न मिरवता सर्व उपक्रम अन् उत्सवात ही मंडळी उत्साहात सहभागी होतात. मंडप टाकण्यापासून उभारणी, सजावटीपासून आरतीपर्यंत कुठलेच क्षेत्र त्यांना वज्र्य नसते. मंडळाचे वैशिष्टय़  म्हणजे, मंडळाच्या सभासदांव्यतिरिक्त इतर कोणाकडूनही वर्गणी घेतली जात नाही. मंडळात जे सदस्य आहेत ते आपल्या ऐपतीप्रमाणे १०१ पासून १० हजार रुपयांपर्यंत वर्गणी देतात. मंडळाकडे देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या निधीचा वापर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केला जातो. कारगिल युद्ध, गुजरात व किल्लारी येथील भूकंप अशा अनेक प्रसंगांत मंडळाने शक्य ती आर्थिक मदत केली आहे. मनमाड शहरातील वागदर्डी धरणातील गाळ काढण्याच्या कामात मंडळाने नेहमी पुढाकार घेतला आहे.
मंडळाचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर काही गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण शैक्षणिक साहित्य व इतर खर्च मंडळातर्फे केला जातो. मंडळाने सभासदांना अडचणींप्रसंगी आर्थिक आधार दिला आहे. मंडळाचे सदस्य जहूर खान यांची टायपिंग इन्स्टिटय़ूट काही वर्षांपूर्वी आगीत जळून खाक झाली. तेव्हा मंडळाने अवघ्या २५ दिवसांत तीन लाखांची मदत उभी करून इन्स्टिटय़ूट पुन्हा उभारून दिली. मंडळाचे रफिक खान, भैय्या शेख, सत्तार शेख, गफ्फार शेख, जहूर खान ३६ वर्षांपासून आजही मंडळात सक्रिय आहेत. काही कार्यकर्ते नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असली तरी गणेशोत्सवात मुद्दाम सुटी अथवा रजा टाकून मनमाडमध्ये हजर होतात. गणेशोत्सव ज्या उत्साहाने साजरा होतो, त्याच धर्तीवर सर्व धर्माचे सणोत्सव साजरे केले जातात.
मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच उद्योगपती इंदरचंद चोपडा आहेत. सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्यात पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्थापना व विसर्जनाची शिस्तबद्ध अशी आगळ्या थाटात मिरवणूक काढली जाते. सर्वधर्मसमभाव, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग, सामाजिक बांधीलकी जपणारे कार्यकर्ते हे युवक क्रांतीचे बलस्थान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh idol of nashik indira nagar
First published on: 05-09-2014 at 02:27 IST