या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षीपेक्षा १,८१८ने वाढ; बंदोबस्तासाठी १६६० पोलिसांचा ताफा

यंदा वसई-विरारमधील गणरायांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. वसईत यंदा २५ हजार गणपती आणि तीन हजार गौरींचे आगमन होत आहे. गणेशोत्सव काळात पोलिसांनी दीड हजार पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवला आहे.

सोमवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी वसईकर सज्ज झाले असून भक्तिपूर्ण वातावरणात गणरायांचे आगमन होणार आहे. यंदा वसई-विरारमधील गणपतींच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा वसईत २५ हजार गणपतींची स्थापना होणार आहे. गेल्या वर्षी वसई-विरारमध्ये २३ हजार २६० गणपतींची स्थापना करण्यात आली होती. यंदा त्यात १,८१८ने वाढ झालेली आहे. या वर्षी वसईत ८१८ सार्वजनिक आणि २४ हजार १६० गणपतींची स्थापना होत आहे. त्याचबरोबर ५५ सार्वजनिक आणि २ हजार ९६३ गौरींचे आगमन होत आहे. वसईतली वाढती लोकसंख्या, लोकांनी केलेले नवस यामुळे गणपतींच्या संख्येत वाढ होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जागोजागी मंडप उभारले असून सजावटीच्या कामावर अखेरचा हात फिरवला जात आहे.

दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. वसईत दीड हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यात ७१ पोलीस अधिकारी, ७८७ पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. बंदोबस्तासाठी ५५ कायम नाके (फिक्स पॉइंट) ठरविण्यात आले असून १०७ ठिकाणी विशेष गस्त घालण्यात येणार आहे. पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा, दंगल नियंत्रण पथक तैनात असणार आहे. वसई-विरारमध्ये ७१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी टेहळणी मनोरे उभारण्यात येणार आहेत. छेडछाड आणि विनयभंगाच्या घटना टाळण्यासाठी गर्दीत साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गणेशोत्सवापूर्वी वसई-विरारमधील सर्व सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी गणेशोत्सव आयोजकांच्या बैठका घेऊन विविध सूचना दिल्या.

  • सार्वजनिक गणपती : ८१८
  • घरगुती : २४ हजार १६०
  • सार्वजनिक गौरी : ५५
  • घरगुती गौरी : २ हजार ९६३
  • विसर्जन स्थळे : ७१
  • पोलीस बंदोबस्त : १६६०
  • अधिकारी : ७१
  • कर्मचारी : ७८७
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१६ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 thousand ganpati idol arrival in vasai
First published on: 03-09-2016 at 02:00 IST