महागडय़ा थर्माकोल मखरांना चांगला पर्याय

अवघ्या २४ तासांमध्ये घरोघरी वाजतगाजत येणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असतानाच गणपतीच्या भोवतालच्या सजावटीच्या कामांनीही वेग घेतला आहे. अनेक जण यासाठी बाजारातून तयार मखरे खरेदी करीत असल्याने सजावटीच्या बाजारांत सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणाचे भान राखून प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक साहित्यांनी बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करणारे सुज्ञ भाविकांना यंदा थर्माकोल मखरांऐवजी कापडांच्या मखरांचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. यासोबतच विविधरंगी, आकाराचे, नक्षीकाम असलेल्या आकर्षक मखरांनी बाजारपेठा सजल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात मखरांच्या खरेदीसाठी दादर व लालबागमध्ये मोठी गर्दी असते. या ठिकाणी आकर्षक मखरे स्थानिक बाजारापेक्षा कमी दरांत उपलब्ध होत असतात. यंदा मखरांमध्ये आकर्षकतेसोबत तंत्राचीही जोड देण्यात आल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या धबधब्यासारखा देखावा असलेले मखर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर यंदा शिवाजी महाराजांचे किल्ले, ढाल, भाला अशा महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण करून देणाऱ्या गोष्टीही मखरांच्या सजावटीत दिसून येत आहेत. याखेरीज ‘बाहुबली’ चित्रपटातील माहिष्मतीचा महालासारखे घडवण्यात आलेले मखरही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. ही सगळी मखरे थर्माकोलची असली तरी, पर्यावरणाचे भान राखणाऱ्या ग्राहकांसाठी कापडापासून बनवलेली आकर्षक मखरेही बाजारात आली आहेत. पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच कमी खर्चात उपलब्ध असलेली ही मखरे घेण्यासाठी अनेक जण गर्दी करीत आहेत.

शीव येथे राहणारे संतोष शिर्के यांनी गौरी-गणपतीसाठी कापडी मखर तयार केले असून हे अगदी वाजवी दरात दिले जात आहे.

त्याशिवाय सोनेरी काठ असलेले कापडी मखर सुबक दिसते. पाच फुटांच्या या मखरासाठी १ हजार रुपये आकारले जात आहे. लालबाग या परिसरातही अनेक ठिकाणी कापडी मखर विकले जात असून पर्यावरणस्नेही या मखरांकडे वळत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

पाच हजार मखरांची विक्री

दादरच्या छबिलदास गल्लीत गेले दोन महिन्यांपासून मखरांचा बाजार सुरू आहे. या दोन महिन्यांत सुमारे चार ते पाच हजार मखरांचा खप झाल्याचे या हरदेव आर्ट्सच्या रुना दबडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारगिराने तयार केलेल्या मखराला साधारण एक दिवस जातो. तेच यंत्राच्या साहाय्याने एका वेळेस ४०, ५० असे मखर तयार होत असल्याने लवकर होतात, असेही दबडे हिने सांगितले. दादरला अनेक ठिकाणी १२ ते १४ फुटांची अवाढव्य मखरेही तयार करण्यात आली असून त्यांच्या किमती सुमारे ३० ते ३५ हजारांपर्यंत आहे.