गणेशाची स्थापना मोठ्या उत्साहात आणि आनंदात झाली आहे. काही जणांकडे हा बाप्पा अवघ्या दिड दिवसासाठी तर काहींकडे पाच, सात आणि अकरा दिवसासाठी येतो. दिड दिवसांच्या बाप्पाचे उद्या विसर्जनही करण्यात येईल. धार्मिक गोष्टींबाबत आपल्याकडे कायमच मतमतांतरे दिसून येतात. कोणती पद्धत चूक आणि कोणती बरोबर याबाबत एकवाक्यता नसते. त्यामुळेच लोकसत्ता ऑनलाईनने याबाबतची खात्रीशीर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी याबाबतच्या शंकांचे निरसन केले आहे.

१. गणपतीची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी असं सांगण्यात येतं त्यामागे नेमके काही कारण आहे का?

या दिवशी पार्थिव गणेश पूजन सांगितलं आहे म्हणजे मातीच्या गणपतीची पूजा. पूर्वीच्या काळी लोक घराच्या परसातली माती किंवा नदी किनारची माती आणून घरीच मूर्ती तयार करून पूजन करीत. त्यामुळे नदीकाठच्या मातीपासून आलेली मूर्ती नदी अथवा प्रवाहित पाणी जिथे असेल अशा ठिकाणी विसर्जित करावी. तसेच वेदात सर्व देवता पाण्याच्या आश्रयाने असतात असे सांगितले आहे, पाण्यात विसर्जन करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे आता आपल्याला जिथे पाणी उपलब्ध असेल तिथे विसर्जन करावे. अनेक ठिकाणी स्वतंत्र हौद, तलाव केलेले असतात तेथील पाणी वाहते नसले तरीही त्यात विसर्जन करता येते. तसेच घरात मोठ्या बादलीत विसर्जन केले तरीही चालते.

२. सध्या इको-फ्रेंडली गणेश मूर्तीबद्दल बोललं जातं, मग या गणेशमूर्ती घरात विसर्जन करणं कितपत शास्त्राला धरून आहे?

आपले सर्व सण-उत्सव हे निसर्गाशी सांगड घालूनच साजरे होतात. गणेशोत्सवातील गणपतीची मूर्ती मातीची असावी.. POP हे निसर्गासाठी हानिकारकही आहे आणि ती माती देखील नाही. त्यामुळे इको फ्रेंडली गणपती हा निसर्गाच्या आणि मातीच्या अधिक जवळ जाणारा असल्याने POP पेक्षा कधीही अधिक योग्य ठरेल. सर्वोत्तम पर्याय मातीच्या गणपतीचा असेल. मूर्तीचे विसर्जन पाण्यात करणे असे असल्याने घरी देखील मोठ्या बादलीत पाणी घेऊन विसर्जन करता येईल. नंतर ती बादली काही दिवस झाकून ठेवावी व कालांतराने ते पाणी व माती आपल्या घराच्या परसात, कुंड्यांमध्ये, बागेत वापरून टाकावे.

३. POP वापरल्यामुळे मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत मग नंतर त्या जेसीबी ने उचलून इतर ठिकाणी हलवतात तर यामध्ये श्रद्धेला तड़ा जातो असं नाही का वाटत?

अशा पद्धतीने मूर्ती हाताळल्या जाताना पाहून वाईट नक्कीच वाटते पण याच्यातून आपणच मार्ग काढायला हवा. उत्सवप्रियतेमुळे गणेशमूर्तींचे आकार जसेजसे वाढत गेले तशी POP च्या मूर्तीची आवश्यकता निर्माण झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवमूर्ती व पूजनाची मूर्ती अशा वेगवेगळ्या मूर्ती ठेवल्यास काही प्रमाणात ही समस्या कमी होईल. पूजनाकरिता ठेवली जाणारी छोटी मूर्ती मातीची असावी व तिचे विसर्जन करावे. मोठी मूर्ती तशीच ठेवून काही वर्ष वापरावी. घरगुती गणेशमूर्ती मातीच्याच असाव्यात आपणच ही काळजी घेतल्यास असे प्रसंग उद्भवणार नाहीत.

४. घरातील अन्य गणपतींच्या मूर्तीचं विसर्जन न करता केवळ याच दिवशी आणलेल्या मूर्तीचं विसर्जन का करतात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरामध्ये देवघरामध्ये आपण धातूच्या मूर्ती ठेवतो व त्यांची चल प्राणप्रतिष्ठापना केलेली असते. काही लोक घरात इतरत्र शोभेसाठी गणपतीच्या मूर्ति ठेवतात पण त्यांची आपण रोज पूजा करीत नसतो. गणेशचतुर्थीच्या दिवशी आपण गणेशाची जी मूर्ती आणतो ती मातीपासून तयार केलेली असते अशी मूर्ती खूप दिवस ठेवता येत नाही आणि हे पार्थिव गणेशाचं व्रत असल्याने त्याचे पाण्यात विसर्जन करायला सांगितलं आहे.