रमेश पाटील

वडिलांच्या आकस्मित निधनाने खचून न जाता आईच्या मदतीने स्नेहल व निवेदिता या दोन कन्येने गणपती बनविण्याचा व्यवसाय सुरूच ठेवला आहे. संपूर्ण वर्षभर आईसह स्वत:ला या व्यवसायात गुंतवून या मायलेकींनी आपला संसाराचा गाडा व्यवस्थित चालविला आहे.

गेल्या वर्षी याच वेळी पाली, ता. वाडा येथील स्नेहल कला केंद्राचे मालक व मूर्तीकार वासुदेव ठाकरे यांचा गणपतींचे रंगकाम करीत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. कुटुंबावर अचानक कोसळलेल्या संकटावर मात करून  वासुदेव ठाकरे यांची पत्नी कल्पना, मोठी मुलगी स्नेहल व छोटी मुलगी निवेदिता या मायलेकींनी हा व्यवसाय व्यवस्थित सांभाळला आहे.

सन १९९१ मध्ये सुरू केलेला हा व्यवसाय गेल्या अठ्ठावीस वर्षांत चांगलाच बहरला आहे. प्रत्येक वर्षी गणेशमूर्तीची मागणी वाढत आहे. वाडा, पालघर व विक्रमगड या तीन तालुक्यांतून स्नेहल कला केंद्रातील दोन हजाराहून अधिक गणेशमूर्ती विकल्या जात आहेत.

स्नेहल कला केंद्रामध्ये पाच इंचांपासून ते सात फूट उंचीचे गणपती बनविले जातात. यासाठी शाडूची माती व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मातीचा वापर केला जातो. येथील कारखान्यामध्ये गणपतींच्या मूर्तीबरोबर गौरी, दुर्गादेवी यासह विविध देव-देवतांच्या मूर्ती व विविध पुतळे घडविले जातात.सर्व मूर्ती घडविणे, त्यांना  योग्य रंग देणे यासाठी वेळ अपुरा पडत असल्याने व कामाचा ताण अधिक पडत असल्याने गणपतीच्या हंगामात अन्य चार कारागिरांची मदत घ्यावी लागते. असे या कारखान्याच्या मालक कल्पना ठाकरे यांनी सांगितले. तर डोळ्यांची आखणी व अन्य कलाकसुरीचे काम करण्यासाठी वडिलांची उणीव जाणवते असे निवेदिता ठाकरे हिने सांगितले.

व्यावसायात पारंगत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण वर्षभर या एकाच व्यवसायात स्वत:ला झोकून दिलेल्या या दोन लेकींमधील स्नेहल ही डॉक्टर आहे. तिने गेल्या वर्षीच बी.ए.एम.एस. ही पदवी घेऊन तिच्या गणपती कारखान्यापासून काही अंतरावरच असलेल्या वसुरी गावात स्व:ताचे लहानसे क्लीनिक सुरू केले आहे. क्लीनिक सांभाळून ती आपला बराचसा वेळ गणपती कारखान्यात देत आहे. निवेदता जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समधून कमर्शियल आर्टचे शिक्षण घेऊन वडिलांचा वारसा यशस्वीपणे चालवीत आहे. तर या दोघींची आई कल्पना हीसुद्धा या व्यवसायात पारंगत असल्याने वर्षभर या एकाच व्यवसायात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे.

वडिलांचा निधनानंतर त्यांच्याकडून मिळालेला वारसा  जोपासण्याचे काम करायचे आहे, त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारीही पार पाडायची आहे.

– डॉ. स्नेहल वासुदेव ठाकरे , मूर्तिकार