Ganesh Chaturthi 2023 :उद्या १९ सप्टेंबर रोजी आपल्या ‘लाडक्या गणराया’चे आगमन होणार आहे. उत्साहाला उधाण आणणाऱ्या गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि याच निमित्ताने सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. अशा सणांदरम्यान महाराष्ट्रीयन लूक नेहमीच ट्रेंड होताना दिसतो. या महाराष्ट्रीयन लूकमध्ये स्त्रिया तयार होताना नऊवारी साडी, चंद्रकोर, ठुशी, नथ, बुगडी, बांगड्या आदी अनेक गोष्टींचा उपयोग करतात. सणांदरम्यान या गोष्टींमुळे स्त्रियांचे सौंदर्य तर खुलतेच; पण मेंदीमुळे या सौंदर्यात आणखी भर पडते. तर तुम्ही गणेशोत्सवासाठी हातावर मेंदी काढण्याचा विचार करीत असाल, तर आम्ही तुम्हाला काही खास डिझाईन दाखवणार आहोत; ज्या तुमच्या हाताचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतील.
गणेशोत्सवानिमित्त खालीलप्रमाणे काही मेंदी डिझाइन्स तुम्ही नक्की ट्राय करा :




१. अरेबिक डिझाईन– अनेक स्त्रिया, मुलींना अरेबिक मेंदी डिझाइन हातावर काढायला आवडते. ही रचना अनेक तरुण मंडळींचीही खूप आवडती आहे. त्यासाठी खूप कमी मेहनत घ्यावी लागते. ही अगदी सहजपणे हातावर काढता येते. कामातून वेळ काढूनही तुम्ही ही मेंदी घरी सहज काढू शकता. त्यासाठी या रचनेत मोठी फुले व पाने वापरली जातात. दिसायलाही सुंदर आणि आकर्षक दिसणारी अरेबिक मेंदी या गणेशोत्सवासाठी तुम्ही नक्की ट्राय करा.
२. बॉर्डर डिझाईन– मेंदीतील बॉर्डर डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेते आणि बघणाऱ्यांना आकर्षित करते. या मेंदीमध्ये हातावर अतिशय बारीक व आकर्षक डिझाईन काढण्यात येतात. मेंदीने हातावर कोणत्याही प्रकारचे नक्षीकाम करा आणि डिजाईनच्या सर्व बॉर्डर्स हायलाईट करा.
३. पारंपरिक डिझाईन- मेंदीमधील पारंपरिक डिझाईनसाठी अनेक खास गोष्टी चित्रित केल्या जातात. हातावर डिझाईनमध्ये गोल वर्तुळाकार चक्र, प्राणी, फुले, झुमके आणि खास नक्षीकाम अशा डिजाईन काढण्यात येतात. जर तुम्हाला पारंपरिक मेंदी काढायची असेल, तर तुम्ही नक्की या डिझाईनचा वापर करू शकता.
४. इंडो अरेबिक डिझाईन- भारतीय आणि अरेबिक यांच्या डिजाईनचे मिश्रण म्हणजे इंडो अरेबिक डिझाईन. या डिझाईनमध्ये अनेकदा भारतीय फुलांचे नमुने, शेडिंग असलेले पक्षी आणि अनोख्या नक्षी असतात; ज्या तुमच्या हाताचे सौंदर्य वाढवतात…
५. आधुनिक मेंदी डिझाईन / बॅक साईड मेंदी डिझाईन (Back Hand Mehendi Design)- काही मुलींना फक्त हाताच्या मागच्या साईडला मेंदी काढायला आवडते. त्यांच्यासाठी ही खास डिझाईन आहे. हातावर मागच्या बाजूला अगदी मधोमध वर्तुळाकार मेंदी काढून, त्यात नक्षीकाम करा आणि आजूबाजूची जागा थोडी रिकामी ठेवा. मग फक्त बोटांवर नक्षी काढून हाताचे सौंदर्य वाढवा.
६. तळहातासाठी मेंदी डिझाईन (Front Hand Mehndi Designs) : तुम्हाला फक्त तळहातावर मेंदी काढायची असेल, तर तुम्ही अरेबिक किंवा बारीक नक्षीकाम करून मेंदी काढू शकता. तळहातावर मधोमध एखादं चित्र काढा आणि बोटे व मनगटावर बारीक नक्षीकाम असलेली डिझाईन काढा.
७. काही जणांना कोणताही सण असो; हातभर मेंदी (Full Hand Mehendi Design) काढायला हमखास आवडते. बोटांपासून ते अगदी हाताच्या कोपरापर्यंत मेंदी काढायची असल्यास तुम्ही या डिझाईनचा नक्की उपयोग करू शकता. फुले, बारीक नक्षीकाम आणि बॉर्डरची मदत घेऊन तुम्ही अशी हातभर मेंदी काढू शकता.
८. लहान मुलांसाठी मेंदी डिझाईन : लहान मुले मेंदी काढताना स्थिर बसत नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या हातांवर झटपट मेंदी काढता येईल यासाठी तुम्ही या डिझाईनचा वापर करु शकता. एखादे फूल काढून तुम्ही चिमुकल्यांच्या हाताचे सौंदर्य वाढवू शकता.
मेंदी लावण्यापूर्वी आपले हात व्यवस्थित धुऊन स्वच्छ करा; जेणेकरून तुमच्या हातांवर कोणतेही लोशन किंवा तेल असेल, तर ते निघून जाईल. मेंदी लावण्यापूर्वी वॅक्सिंग किंवा स्क्रबिंग करा. कारण- मेंदी लावल्यानंतर स्क्रबिंग किंवा वॅक्सिंग केल्याने मेंदीचा रंग फिका होऊ शकतो. मेंदी लावताना थेट सूर्यप्रकाशात बसणे टाळा. कारण- त्यामुळे मेंदी लवकर सुकून मेंदीचा रंग फिका पडेल. मेंदी काढल्यानंतर हात पाण्यापासून दूर ठेवा. हाताला रंग देऊन कोरडी मेंदी काढा किंवा त्यासाठी बटर नाइफची मदत घ्या.
या मेंदी डिझाईन @mehendi_artist_harshada_borje_ आणि @mehndi_artists_himanshi_rathod या मेंदी कलाकाराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आल्या आहेत.