पुण्यातील माळीण गावात जुलै महिन्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण महाराष्ट्र दु:खाच्या खाईत लोटला. या दुर्घटनेनंतर अनेक सामाजिक संघटनांनी माळीण येथील ग्रामस्थांना मदतीचा हात दिला. माळीणच्या या घटनेची छबी यंदाच्या गणेशोत्सवात पाहावयास मिळाली. नवी मुंबईतील गणेश मंडळांनी माळण घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत या घटनेची पुनरावृत्ती होऊ देऊ नको, असे साकडे भाविकांनी बाप्पाला घातले आहे.
शहरातील मंडळांनी विविध सामाजिक विषयांचा जागर करीत प्रबोधनात्मक देखावे उभारले आहेत. एक महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावात डोंगर कडा कोसळून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मानवाच्या चुकांमुळे निसर्गदेखील त्याला कधी माफ करत नाही. हे जणू सध्याच्या वाढत्या काँक्रीटच्या जंगल उभारणाऱ्याला निसर्गाने दिलेले उत्तरच आहे.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र गहिवरल्यानंतर त्यांचे चित्रण यंदाच्या गणेशोत्सवातही पाहावयास मिळाले. दिद्या रामनगर येथील शिवस्मृती मित्र मंडळ, विष्णुनगर येथील शिवगणेश मित्र मंडळ, श्रमिक मित्र मंडळ, ऐरोली सेक्टर १५ परिसरातील गणेश रहिवासी सेवा मंडळ, करण मित्र मंडळ, रबाले येथील प्रेरणा मित्र मंडळ, वाशी येथील एमपीएमसी बाजारपेठ गणेश मंडळ, सानपाडा परिसरातील सानपाडय़ाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी मंडळांनी देखाव्यातून तसेच चित्र रूपांतून माळीणच्या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. अनेक मंडळांनी माळीणसारख्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे, याचे प्रबोधन केले आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास, सामाजिक एकात्मतेचे संदेश देणारे देखावे साकारून भक्तांमध्ये जनजागृती केली जात आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord ganesha devotees pray for not again malin village landslide
First published on: 06-09-2014 at 01:19 IST