जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात १ हजार ३६३ मंडळांची गणेशाची स्थापना केली. पैकी ३२४ गावांमधून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवण्यात आली. त्यामुळे मंडळांवर होणारा खर्च टाळून सामाजिक उपक्रमांना पूरक वातावरण तयार होत आहे.
सन २००१पासून सुरू झालेल्या ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात या वर्षी नोंदणीकृत १ हजार ३६३ मंडळांनी संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत नोंदणी केली. पकी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना ३२४ गावांमध्ये राबविण्यात आली. या उपक्रमामुळे गावातील मंडळांमध्ये असलेले स्पध्रेचे वातावरण संपुष्टात आले, तसेच गावात एकोपा निर्माण होत आहे. अनेक मंडळांना वर्गणी देण्यास नागरिक नाखूश असतात, परंतु एकाच ठिकाणी वर्गणी देण्यास त्यांची हरकत नसते. जबरदस्तीने वर्गणी घेण्याच्या प्रकारांनाही आळा बसला. ग्रामस्थांना एकाच ठिकाणी उत्साहात सहभागी होता येऊ लागले. खर्चात मोठी बचत झाली. बचत झालेल्या पशातून गावात विधायक कामे करण्यास निधी उपलब्ध होणार आहे. सध्या सुरू असलेल्या गाव तंटामुक्त मोहिमेसाठी हा उपक्रम पूरक ठरत आहे. या उपक्रमामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.