12 July 2020

News Flash

Holi 2017 : जाणून घ्या होळी का पेटवली जाते

यामागे एक महत्त्वाचा हेतू पुर्वजांनी योजिला होता

आपल्या देशामधील बहुतांश उत्सव व सण साजरे करण्यामागे सामाजिक हिताचा, त्यातही समाजाच्या शारिरीक व मानसिक आरोग्याचा विचार केलेला दिसतो. एकत्रितपणे साजरे केले जाणारे उत्सव हे समाजात परस्परांशी ओळख होण्या-वाढण्यासाठी, बंधुभावना निर्माण होण्यासाठी; एकंदरच समाजाला संघटित करुन ऐक्य टिकून राहण्यासाठी अत्यावश्यक आहेत, याबद्दल काही शंका नाही, जी परंपरा पुढेही चालू राहायला हवी.

शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने जाळून शेतकरी आपल्या जमिनीला अधिक सुपीक बनवू पाहायचा. होळीच्या निमित्ताने कडूनिंब-एरण्ड यांसारखी औषधी झाडे जाळण्यामागे थंडीनंतर सुरु होणार्‍या उन्हाळ्याच्या या ऋतुसंधिकाळामध्ये फैलावणा-या रोगजंतुंचा व परिसरातल्या त्रासदायक किटकांचा नाश करणे हासुद्धा एक महत्त्वाचा हेतू पुर्वजांनी योजिला होता. या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हा एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा; सर्वत्र गर्द रान व घनदाट जंगल असताना त्या काळाला व पर्यावरणाला अनुरूप असा तो उत्सवाचा विधी होता. मात्र ज्या काळामध्ये एक-एक झाडाचे नितांत महत्व आहे, त्या झाडांसाठी आसुसलेल्या आजच्या २१ व्या शतकाला झाडे जाळण्याचा तो विधी काही लागू होत नाही.

अमेरिकेसारखी पाश्चात्त्य राष्ट्रे किंवा भारतातल्या पाश्चात्त्य कंपन्या प्रदूषण करतात, तेव्हा त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी आम्हांला मोठ्ठा कंठ फुटतो. पण दुस-यांकडे केलेले ते बोट जेव्हा आमच्याकडे वळते, तेव्हा मात्र आम्ही मूग गिळून बसतो. लाखोंच्या संख्येने होळ्या पेटवल्याने निसर्गाचा व वातावरणाचा नाश होत नाही काय?मागच्या वर्षी पाऊस नीट पडला नाही, तसाच तो पुढच्या वर्षीसुद्धा पडला नाही तर, पर्यावरणाच्या नाशामुळे पावसाचे नैसर्गिक चक्रच बिघडले तर,कल्पना सुद्धा भयावह वाटते. हे निसर्गचक्र बिघडायला आपणसुद्धा तेवढेच कारणीभूत आहोत. अनेक लहानसहान चुका आपल्याकडून सुद्धा होत असतात. त्यातलीच लहान म्हणता येणार नाही अशी चूक म्हणजे लाखोंच्या संख्येने पेटणार्‍या होळ्यांमध्ये जाळली जाणारी झाडे. त्यात आजकाल तर झाडांबरोबरच तुटकेफुटके फर्निचर, जुने टायर्स, रबरी पिंपे, नको असलेले सामान सगळेच होळीमध्ये जाळण्यासाठी टाकले जाते…. . .वातावरणाचा सत्यानाश!

होळीनंतर विषाणूजन्य आजार वाढल्याचे अनुभवास येते. या दिवसांत विषाणू-ज्वर(व्हायरल फिवर), श्वसनसंस्थानाच्या सर्दी-खोकला-दम्यासारख्या विविध तक्रारी,कांजिण्या(चिकनपॉक्स), गोवर(मिसल्स), नागीण(हर्पिस झोस्टर)इत्यादी विषाणूजन्य (व्हायरल)आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येतात. या आजारांचे विषाणू बळावण्याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणात होणारा अचानक बदल! त्यातही उष्ण वातावरणात वाढणारे विषाणू विशेषेकरुन या दरम्यान बळावतात आणि एकाच दिवसात वातावरण अति-उष्ण करण्याचे काम करतो आपणच; लाखो होळ्या पेटवून! आदल्या दिवसापर्यंत सहनशील असणारे वातावरण होळीनंतर एकाच दिवसात चांगलेच उष्ण झाल्याचे अनुभवास येते. गावांबद्दल निश्चीत सांगता येणार नाही; मात्र मुंबईसारख्या शहरांमध्ये एकाच दिवसात हवामान एकदम गरम झाल्याचे आपण सगळे अनुभवतो. या दरम्यान घरा-घरामध्ये तुम्हांला श्वसनविकाराने त्रस्त झालेले रुग्ण दिसतील, प्रदूषणाबद्दल तर काही वेगळे सांगायला नको….मग नेमके काय साधतो आपण होळ्या पेटवून ?! समाजाच्या सर्वांगीण हिताचा विचार करुन पुर्वजांनी दूरदृष्टीने योजलेल्या सण-उत्सवांच्या मूळ उद्देशावरच आपण बोळा फिरवतोय!

सण-परंपरांमध्ये काळानुरूप बदल करणे क्रमप्राप्त असते. काळानुरूप समाजाने आवश्यक ते बदल आपल्या रुढी-परंपरांमध्ये केले आहेत. सती,बालविवाह अशा परंपरा समाजाच्या हिताच्या नाहीत , हे ओळखून त्यामध्ये आमूलाग्र बदल करणारा आपला समाज पुरोगामी आहे, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. २१व्या शतकातील एक गंभीर प्रश्न म्हणजे “पर्यावरणाचा होणारा नाश”. पर्यावरणाचा नाश हा केवळ तुमच्या-आमच्या नाही तर येणा-या पिढ्यांसाठीसुद्धा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. म्हणूनच पर्यावरणाचा नाश कमीतकमी व्हावा यादृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करायला हवे. निसर्गाचा आणि पर्यायाने आरोग्याचा होणारा नाश कृपा करुन थांबवा वाचकहो! होळी साजरी करताना झाडे पेटवू नका. प्रतीकात्मक होळी साजरी करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2017 9:37 am

Web Title: how to celebrate safe holi and rang panchami holi dahan 2017 also holi puja timing
Next Stories
1 Healthy Living : एसी कारचा प्रवास म्हणजे आजाराला निमंत्रण
2 Healthy Living : शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा!
3 Healthy Living : तर तारुण्यातच बायपास/ॲन्जिओप्लास्टीचा धोका संभवेल
Just Now!
X