रक्तातली ग्लुकोजची मात्रा कमी होणं याला हायपो (हायपोग्लायसेमिया) म्हणतात. रक्तातली नॉर्मल ग्लुकोज जर ७० ते १४० अशी समजली तर ७० पेक्षा कमी ग्लुकोज होणं याला हायपो म्हटलं जायला हवं. पण तसे करता येत नाही. म्हणूनच हा प्रकार नीट समजून घ्यायला हवा.

हायपोची पातळी कशी ठरवली जाते? – रक्तातली ग्लुकोज कमी होते तेव्हा शरीर या ना त्या प्रकारे ग्लुकोज वाढवायचा आटोकाट प्रयत्न करतं. त्यासाठी एक वेगळी यंत्रणा राबवतं. ग्लुकोजच्या ज्या पातळीवर ही यंत्रणा कार्यरत होते ती पातळी ओलांडली गेली, की हायपो झाला असं समजलं जातं. सरासरी ६४ वर हायपो जाणवू लागतो. वेगवेगळ्या माणसांमध्ये ही पातळी बदलू शकते. वर्षांनुर्वष ग्लुकोज खूप अधिक म्हणजे ३०० ते ४०० च्या वर राहिली आहे त्यांना ग्लुकोज थोडीशी कमी झाली, अगदी १५०-२०० वर आली तरी हायपोची लक्षणं दिसू शकतात. याला ‘रिलेटिव्ह हायपोग्लायसेमिया’ म्हणतात.
हायपोच्या व्याख्येत तीन गोष्टी ग्राह्य़ धरल्या जातात. पहिली म्हणजे रुग्णामध्ये हायपोची लक्षणं दिसायला हवीत. दुसरं म्हणजे त्या वेळी जर ग्लुकोज ७० च्या खाली असायला हवी आणि तिसरं म्हणजे तुम्ही जेवलात किंवा साखर खाल्लीत तर ती लक्षणं नाहीशी व्हायला हवीत.
हायपोची लक्षणं काय असतात? – पोट रितं असतं तेव्हा हायपोची लक्षणं दिसतात. कडकडून भूक लागते. छातीत धडधडतं. अंग थरथरतं. काही वेळेला डोकं दुखतं, घाम फुटतो. कधी कधी स्वभाव अचानक बदलतो. एक रुग्ण कामावरून आल्यावर अगदी क्षुल्लक कारणानं आपल्या मुलाला मारायचा. संध्याकाळी सातच्या सुमाराला तो कामावरून यायचा तेव्हा त्याची ग्लुकोज कमी होत असल्याचे नंतर लक्षात आले. दुसरा रुग्ण रात्री उठून थेट घराच्या बाल्कनीत जाऊन लघवी करायचा. वयस्कर माणसांमध्ये असे स्वभावातले बदल अधिक प्रमाणात दिसतात. ग्लुकोज खूपच कमी झालं तर माणसं चक्क बेशुद्धदेखील होतात.
हायपो का होतो? – सामान्यपणे जेवणानंतर रक्तात ग्लुकोज आली की मग शरीर तेवढंच इंश्युलीन बनवतं. मधुमेही माणसांमध्ये मात्र इंश्युलीन बाहेरून दिलं जातं तेव्हा नेमकी उलटी परिस्थिती असते. घेतलेलं इंश्युलीन रक्तात असतं पण त्याला पुरेशा खाण्याची जोड मिळाली नाही तर गडबड होते. रक्तातलं वाढीव इंश्युलीन आपलं ग्लुकोज कमी करायचं काम इमानेइतबारे करत राहतं, मग रक्तातली ग्लुकोज नॉर्मलच्या खाली गेली तरी बेहत्तर. प्रत्यक्ष इंश्युलीन किंवा इंश्युलीन वाढवणारी सल्फोनील युरिया गटातली औषधं असं करू शकतातच, परंतु इतर औषधंही हायपोला कारणीभूत ठरू शकतात. मलेरियाची औषधं यात अग्रेसर आहेत. यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारू प्यायल्यावर हायपो झाला तर एकतर रक्तातलं ग्लुकोज लवकर वर येत नाही आणि माणूस बराच काळपर्यंत पुन्हा पुन्हा हायपोत जात राहतो. यकृत आणि मूत्रिपडात काही आजार असला तरी हायपो होण्याची शक्यता बळावते. कारण ग्लुकोज कमी झाली की प्रथिने किंवा चरबीपासून ग्लुकोज बनवायची क्षमता मुख्यत्वे या दोन इंद्रियांकडे असते.
हायपोमुळं काय नुकसान होतं? – शरीरातली इतर अनेक इंद्रियं ग्लुकोज सोडून इतर इंधनांचा वापर करू शकतात. पण मेंदू फक्त ग्लुकोज वापरू शकतो. त्यामुळं हायपो झाला की सगळ्यात जास्त पंचाईत होते ती मेंदूची. म्हणून हायपोत मेंदूचं जास्त नुकसान होतं. वारंवार हायपो झाला की आणखी एक प्रश्न निर्माण होतो. ‘सदा मरे त्याला कोण रडे’ या म्हणीला जागून वारंवार होणाऱ्या हायपोची नोंद शरीर घेतच नाही. याला ‘हायपोग्लायसेमिया अनअवेअरनेस’ म्हणतात. यात रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.
हायपो झाला की काय करावं? – सगळ्यात आधी खरंच हायपो झाला आहे, याची खात्री करून घ्यावी. त्यासाठी घरी ग्लुकोज तपासायचं मशीन असलेलं उत्तम. ग्लुकोज कमी असली तर ताबडतोब खावं. अगदी साखर खाल्ली तरी चालेल. नंतर १५ चा नियम वापरावा. म्हणजे १५ मिनिटांनी पुन्हा ग्लुकोज तपासावी. ती पातळीत आलेली नसली की १५ ग्रॅम कबरेदके खावीत. पावाची एक कापटी, एक फुलका म्हणजे १५ ग्रॅम कबरेदक होतं. रक्तातली ग्लुकोज नॉर्मल होत नाही तोपर्यंत असं करत राहावं किंवा त्वरित रुग्णालय गाठावं.

itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक