30 October 2020

News Flash

अनेक रोगांचे निदान अवघ्या दहा मिनिटात

क्षय, मलेरिया, एड्स किंवा कर्करोग या रोगांचे निदान करणारे स्वस्त, सहज हाताळता येईल असे उपकरण इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी तयार केले आहे. त्याच्या मदतीने या सर्व रोगांची

| June 1, 2013 09:51 am

क्षय, मलेरिया, एड्स किंवा कर्करोग या रोगांचे निदान करणारे स्वस्त, सहज हाताळता येईल असे उपकरण इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी तयार केले आहे. त्याच्या मदतीने या सर्व रोगांची चाचणी अवघ्या दहा मिनिटात करता येते. क्यू-पॉक मशीन असे त्याचे नाव असून त्याची किंमत ५०० पौंड आहे. कुठल्याही गाठींचे सूक्ष्म विश्लेषण व कुठल्याही रोगाची जनुकीय कारणे यांचे निदान यात करता येत असल्यामुळे प्रभावी औषध योजना करता येते.पूर्व ससेक्समधील उकफिल्ड येथे गॅरेजमध्ये असलेल्या तात्पुरत्या प्रयोगशाळेत जोनाथन ओ हॅलोरॅन यांना ही कल्पना सुचली. त्यात त्यांनी डीएनए हा सहज दिसेल अशा नमुन्यात सोडून त्याच्या अनेक प्रती तयार करण्याचे तंत्र शोधले, त्यामुळे कर्करोगाची उत्परिवर्तने व इतर रोगांना कारणीभूत ठरणारे सूक्ष्म बदल निश्चित करता येतात. या उपकरणाच्या मदतीने वैद्यकीय चाचण्या चालू आहेत व त्याचा वापर पुढील वर्षी राष्ट्रीय आरोग्यसेवेत केला जाऊ शकेल. या उपकरणाच्या प्रगत चाचण्या सुरू असून तज्ञांच्या मते कर्करोग तसेत इतर संसर्गजन्य रोगांच्या रुग्णांचे आयुष्यमान त्यामुळे वाढू शकेल. या उपकरणाचा वापर डीएनए काढून घेणे, त्याचे विस्तारित रूप घेऊन विश्लेषण करणे या गोष्टी शक्य होतात. त्यामुळे रुग्णाला व्यक्तिगत सेवा मिळते, असे हॅलोरॅन यांनी सांगितले. या उपकरणाच्या मदतीने टीबी (क्षय), मलेरिया (हिवताप), एचआयव्ही एड्स व इतर काही रोगांचे निदानही करता येते. न्यूकासल विद्यापीठ व क्वांटूएमडीएक्स समूह या कंपन्यांनी हे उपकरण तयार करण्यात मोठा वाटा उचलला आहे.

आले अस्थम्यावर गुणकारी

आले हे कुठल्याही अन्नपदार्थाला चव आणण्यात मदत करते, याच आल्यातील काही घटक शुद्ध स्वरूपात वेगळे केले, तर त्याचा अस्थम्याच्या रुग्णांना चांगला फायदा होतो असे संशोधनात दिसून आले आहे. अस्थमा या श्वासविकारात फुफ्फुसाकडे हवा वाहून नेणाऱ्या नलिका आकुंचन पावत असतात. ब्राँकोडायलेटिंग औषधे या विकारावर वापरली जातात. त्यामुळे श्वासनलिकेचे आकुंचन कमी होऊन हवा आत जाण्यास मार्ग मोकळा होतो. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी आल्यातील विशिष्ट घटक ब्राँकोडायलेटरची भूमिका कशी पार पाडू शकतात यावर प्रकाश टाकला आहे. गेल्या काही वर्षांत अस्थम्याचे प्रमाण वाढले आहे, अस्थमा कशामुळे होतो व कसा विकसित होतो याचेही बरेच ज्ञान झालेले आहे. तरीही नवीन प्रकारची औषधे मात्र कमी आहेत, असे एलिझाबेथ टाउनसेंड यांनी सांगितले.
आल्यातील काही घटक शुद्ध स्वरूपात मिळवले, तर त्यांच्या मदतीने श्वासनलिकेचे स्नायू शिथिल होतात व श्वासावाटे हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचते, या घटनकांना बिटा अ‍ॅगनिस्ट असे म्हटले जाते. वैज्ञानिकांनी या प्रयोगात मानवी श्वासनलिकेच्या स्नायूंचे नमुने घेतले व त्यांना अ‍ॅसिटिलकोलिन देऊन आक्रसायला लावले. याच न्यूरोट्रान्समीटरमुळे श्वासनलिका आकुंचन पावत असते. त्यानंतर आल्यातील ६-जिंजरॉल, ८ जिंजरॉल किंवा ६ शोगॉल या घटकांसमवेत आयसोप्रोटेरेनॉलचे मिश्रण केले. या प्रत्येक मिश्रणाचा आकुंचित झालेल्या स्नायूंवर परिणाम तपासण्यात आला. त्यात या मिश्रणाचा परिणाम नुसत्या आयसोप्रोटेरेनॉलपेक्षा जास्त दिसून आला. फॉसफोडिसटेरेस ४ डी (पीडीइ ४ डी) या वितंचकाला निष्प्रभ करण्यात आल्यातील या घटकांनी मोठी भूमिका पार पाडली होती. एफ-अ‍ॅक्टिन या फिलॅमेंट स्वरूपातील प्रोटिनचाही अस्थम्यात मोठा संबंध असतो. त्यावरही आल्यातील या घटकांनी अपेक्षित परिणाम साधल्याचे दिसून आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2013 9:51 am

Web Title: solution on many disease in ten minutes
टॅग Loksatta,Medical
Next Stories
1 जागतिक तंबाखू दिनाच्या निमित्ताने..
2 ‘आयव्हीएफ’ला जोड एम्ब्रियोस्कोपची
3 सूर्यप्रकाशात न्हाऊन निघा..
Just Now!
X