27 May 2020

News Flash

टेन्शन.. टेन्शन!

कामाचा ताण प्रत्येकालाच असतो.. तसा तो असणेही आवश्यक आहे. कारण थोडय़ा ताणामुळे अधिक चांगले काम करण्याची तसेच क्षमता वाढवण्याची प्रेरणा मिळते.

| July 8, 2014 06:22 am

कामाचा ताण प्रत्येकालाच असतो.. तसा तो असणेही आवश्यक आहे. कारण थोडय़ा ताणामुळे अधिक चांगले काम करण्याची तसेच क्षमता वाढवण्याची प्रेरणा मिळते. मात्र हा ताण नेमका किती असावा, हे प्रत्येक व्यक्तिगणिक ठरते. काही जण अगदी थोडय़ा ताणानेही कोलमडून जातात, तर काही जणांच्या आयुष्यात हा ताण उत्साह (एक्साइटमेंट) आणतो.
कामाचा ताण क्षमतेपेक्षा अधिक होत आहे हे कसे ओळखाल?
* रविवारच्या सुट्टीनंतरही सोमवारी कामावर जावेसे न वाटणे.
* कामावरील लक्ष उडणे, विसराळूपणा वाढणे, लक्ष केंद्रित करता न येणे.
* कार्यालयातील सहकाऱ्यांशी बोलावेसे न वाटणे.
* बॉसच्या केबिनमध्ये जायला भीती वाटणे.
* शरीर लवकर थकणे, अवयव- हाडे दुखणे.
* सतत धूम्रपान, मद्य प्यावेसे वाटणे.
* सर्वाशीच लहान लहान गोष्टींवरून भांडण होणे.
तणाव घालवण्याचे उपाय
झोप, आहार व व्यायाम – पुरेशी झोप (स्वप्न पडणारी व गाढ झोप) मिळणे आवश्यक आहे. झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटले, याचा अर्थ तुम्हाला पुरेशी झोप मिळाली आहे. योग्य वेळी व योग्य आहार घ्यायला हवा. हिमोग्लोबिन, जीवनसत्त्व, क्षार जेवणातून योग्य त्या प्रमाणात शरीरात जायला हवेत. त्याचप्रमाणे घरात केलेला १५ मिनिटांचा व्यायामही तणाव निवळण्यास मदत करतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे. घरातल्या घरात एका ठिकाणी केलेले १५ मिनिटांचे जॉिगग किंवा १५ मिनिटांचे चालणे यामुळे तणाव निवळण्यास मदत होते.
संवाद साधा – वरिष्ठांशी आणि ज्युनिअर सहकाऱ्यांशीही कामाबाबत संवाद साधा. तुमच्या त्यांच्याकडून अपेक्षा, त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा जाणून घ्या. बॉसने चारचौघांत अपमान केला असेल, तर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन तुमच्या भावना मांडा. त्यानंतरही बॉसकडून तेच वर्तन होत राहिले, तर मात्र नवी नोकरी शोधा.
शिकत राहा – वरिष्ठ आणि लहान सहकाऱ्यांकडूनही नेहमी शिकता येण्यासारखे असते. कामात सुधारणा करण्यासाठी प्रत्येकाची मदत घेता येते. रागावून, अपमानित करून बोलण्यापेक्षा दयावृत्ती दाखवा. त्यामुळे ताण खूप कमी होईल.
कामातून लहान ब्रेक घ्या – सतत एकाच कामात डोके खुपसून राहण्यापेक्षा लहान लहान ब्रेक घ्या. मित्रांना एखादा विनोद सांगा. व्हॉट्सअ‍ॅपवरून जवळच्या मित्रांना मेसेज करा. दिवसभरात आपल्या जवळच्या मित्रमत्रिणींशी, नातलगांशी एकदा बोला.
धूम्रपान टाळा – तणाव घालवण्यासाठी टॉयलेटमध्ये जाऊन स्मोकिंग करण्यापेक्षा तुमच्या जागेवर शांत बसा व तीन मिनिटे दीर्घ श्वास घ्या.
तटस्थ सल्ला घ्या – कामाचा ताण, तुमचा दृष्टिकोन याबाबत विश्वासू सहकाऱ्याकडून तटस्थपणे सल्ला घ्या. तुमची बाजू मांडा, कामात सुधारणा करता येतील का ते पाहा.
प्रवासात मन मोकळे करा – रोज प्रवास करताना लोकलमध्ये ओळखी होतात. तेव्हा फक्त मोबाइलमध्ये गेम खेळत बसण्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांशी हसून संवाद साधा. त्यांच्याशी सुखदु:खे वाटून घ्या. अनोळखी रिक्षावाल्याशीही पाच-दहा मिनिटांत हसून गप्पा मारता येतात. त्यामुळे दोघांचाही ताण कमी होतो.
घरी ताण नेऊ नका – जोडीदाराशी सुखदु:ख वाटून घ्यायचे असले तरी कंपनीतील रोजची दुखणी घरी नेऊ नका. कार्यालयातील ताण दाराबाहेर ठेवून आत जा. वैयक्तिक आयुष्याचा आनंद घ्या. ते इतर कोणत्याही कामापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक सण-समारंभाला हजेरी लावण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी अधिक वेळ द्या. संध्याकाळी सातनंतर घरात अजिबात भांडू नका. त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.
सर्वात महत्त्वाचे..
व्हिजिटिंग कार्ड तात्पुरते आहे, त्यावरचे तुम्ही कायमचे आहात.. नोकरी ही आयुष्यातील फक्त एक भाग आहे. त्याच्या आहारी जाऊन तुमचे संपूर्ण आयुष्य तणावग्रस्त करू नका. आयुष्य खूप छान आहे, त्याचा आनंद घ्या..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2014 6:22 am

Web Title: tension tension
टॅग Health It
Next Stories
1 घामही फुटला..
2 आयुर्वेब!
3 मल्टिपल मायलोमा
Just Now!
X