न्याहरी म्हटलं की उपमा, पोहे, साबुदाण्याची खिचडी, घरगुती मऊभात, भाकरी, फळे डोळ्यांसमोर येतात. हॉटेलमधला ‘ब्रेकफास्ट’ असेल तर ब्रेड, पेस्ट्री, दालचिनी रोल, वेगवेगळी ‘सीरिअल्स’, कॉर्नफ्लेक्स, मुसली, ओटस, स्टर फ्राईड मशरूम, अंडय़ांचे विविध प्रकार अशा आकर्षक ‘काँटिनेंटल’ पदार्थाची रेलचेल असते. ‘न्याहरी राजासारखी, दुपारचे जेवण राजपुत्रासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे,’ अशा अर्थाची एक म्हण आहे. (अर्थात आपल्यापैकी कित्येक जण यातला पहिला भाग तंतोतंत पाळतात, पण पुढचा भाग विसरून प्रत्येक खाणे राजासारखेच करतात ही बाब वेगळी!)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ब्रेकफास्ट’ म्हणजेच ‘ब्रेकिंग युवर फास्ट’- अर्थात झोपेपूर्वी अन्न घेतल्यानंतर झालेला ८ ते १० तासांचा उपास मोडणे! सकाळी उठल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण सर्वात कमी असते, शरीराला मेंदूच्या कार्यासाठी आणि पूर्ण दिवसाच्या शरीराच्या हालचालींसाठी ग्लुकोजची नितांत गरज असते. ती भागवली गेली नाही तर चिडचिडेपणा येणे, कामात एकाग्रता न होणे, कामाची क्षमता कमी होणे असे त्रास सुरू होतात. न्याहरी न घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी राहून दिवसभर गोड खाण्याची इच्छा होत राहते ते वेगळेच.
सकाळची न्याहरी समतोल हवी. त्यात कबरेदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे आणि पाणी हे सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात हवेत. कबरेदके व स्निग्ध पदार्थाचे सेवन दिवस सरेल तसे कमी करणे गरजेचे आहे. दुपारच्या जेवणात ते कमी केले नाहीत त्या अतिरिक्त उष्मांकांचा वापर न झाल्यामुळे वजन वाढू शकते. रात्री ‘हाय कॅलरी’ जेवण केल्यास वजन वाढण्याबरोबरच झोपेचाही त्रास होऊ शकतो. शरीराला रात्री हालचाल नसल्यामुळे अन्नही नीट पचत नाही. रात्रीचे जेवण हलके घेतल्यावर सकाळी ताजेतवाने वाटते व दिवसाच्या कामांसाठी उत्साह येतो. शरीरात स्रवणारे ‘ग्रेलिन हॉर्मोन’ भूक वाढवण्याचे काम करते. न्याहरी केल्याने हे हॉर्मोन रक्तात कमी तयार होते आणि दिवसभर खा-खा होत नाही. न्याहरीतील कबरेदके शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतात, तर प्रथिने मेंदूला तरतरी देतात आणि जास्त काळ भूक न लागण्याची सोय करतात. खनिजे व जीवनसत्त्वे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करतात.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article of dr vaishali joshi on breakfast
First published on: 17-10-2015 at 03:46 IST