माणूस कधीच सुखी-समाधानी नसतो. पण आजच्या काळातील आधुनिक यंत्रांनी हे सुखसमाधान आणखी हिरावून घेतले आहे. मानवी सुखाच्या विषयातील एका तज्ज्ञाने असा दावा केला आहे की, मोबाईल फोन स्वीच ऑफ केला तर तुम्ही नक्की सुखी व्हाल. टेक्स्ट मेसेज पाठवणे, इमेल पाठवणे यापेक्षा जर तुम्ही प्रत्यक्ष तुमचे मित्र व कुटुंब यावर लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला जे सुख व आनंद मिळेल तो आभासी जगातील संवादापेक्षा निश्चितच वेगळा असेल. मानवी सुखाविषयीचे तज्ज्ञ मानले जाणारे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक पॉल डोलान यांच्या मते स्मार्ट फोनमुळे लोकांचे लक्ष्य त्यांच्या कुटुंबीयांवर, आप्तेष्टांवर राहत नाही. लोकांनी त्यांचे हे वर्तन बदलले नाही तर त्यांना मानसिक आजारांना तोंड द्यावे लागू शकते. संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी विषयावर लंडनमधील एका महोत्सवात त्यांनी सांगितले की, आपण इंटरनेट व्यसनी झालो आहोत. तसेच फॅटम व्हायब्रेशन सिंड्रोम हा रोगही जडला आहे. यात तुमच्या खिशात मोबाईल असतो व उगाचच तुम्हाला असे वाटत राहते की, आपल्याला कुणाचा तरी मेसेज आला असावा; म्हणून आपण उगाच मोबाईल काढून बघतो पण काहीच संदेश आलेला नसतो. आपले लक्ष सतत मोबाईलमुळे चाळवले जाते. इ-मेल बघणे किंवा मेसेज बघणे यापेक्षा मित्रांशी गप्पागोष्टीत रमलात तर त्यात आनंद आहे, सुखही आहे. जे लोक विवाहित असतात,अध्यात्मिक वृत्तीचे असतात ते एकटय़ा राहणाऱ्या व नास्तिक लोकांपेक्षा जास्त सुखी असतात, असे संशोधनात दिसून आल्याचे डोलान यांनी सांगितले. घटस्फोटापेक्षाही एकमेकांपासून दुरावण्याची भावना खूप वाईट असते. मनाने खचत जाण्यापेक्षा घटस्फोटाचा निर्णय चटकन घेतल्याने तुमचा कोंडमारा कमी होतो. वयाच्या चाळिशीत माणसे दु:खी, असमाधानी असतात. पण पन्नाशीनंतर त्यांचे सुखसमाधान वाढू लागते, असे संशोधनात स्पष्ट झाले असल्याचे ते सांगतात.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2013 रोजी प्रकाशित
सुखी जीवनाचा मूलमंत्र
माणूस कधीच सुखी-समाधानी नसतो. पण आजच्या काळातील आधुनिक यंत्रांनी हे सुखसमाधान आणखी हिरावून घेतले आहे. मानवी सुखाच्या विषयातील एका तज्ज्ञाने असा दावा केला आहे की, मोबाईल फोन स्वीच ऑफ केला तर तुम्ही नक्की सुखी व्हाल.
First published on: 02-02-2013 at 06:00 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Basics of peaceful life