शरीराचे कार्य नीट चालण्यासाठी असंख्य घटक कारणीभूत असतात. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरीत्या. हाडांसाठी कॅल्शिअम आवश्यक असते हे अनेकांना माहिती असते आणि त्यामुळे दूध आवश्यकही ठरते. मात्र या कॅल्शिअमचा उपयोग करण्यासाठी ‘ड’  जीवनसत्त्वाची गरज असते. ‘ड’  जीवनसत्त्वाची कमतरता ही खरे तर लहानपणापासूनच सुरू होते, पण आपल्याकडे साधारण पन्नाशीनंतर त्याचे परिणाम जाणवू लागतात. हाडे दुखणे, ठिसूळ होणे, घसरून पडल्याने हाड फ्रॅक्चर होऊन अंथरुणाला खिळणे अशा अनेक दुखण्यांचे कारण ‘ड’ जीवनसत्त्वात असते. महत्त्वाचे म्हणजे या दोन्हीसोबत हार्मोन्सही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे हाडे दुखतात तेव्हा फक्त कॅल्शिअमची नाही तर या तिन्ही घटकांचा मेळ चुकलेला असतो.
हाडे दुखत असल्याची तक्रार घेऊन अनेकजण येतात. साधारणत: पन्नाशीनंतर हा त्रास सुरू होतो आणि त्यातही विशेषत्वाने स्त्रियांना अधिक होतो. हाडे मजबूत करण्यासाठी दूध आवश्यक आहे हे तर शाळेपासून शिकवले जाते. मात्र दुधातील कॅल्शिअम हाडांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच हाडे मजबूत करण्यासाठी इतरही काही घटक महत्त्वाचे ठरतात. हाडांच्या समस्या सुरू झाल्या की खरे तर कॅल्शिअमचे शरीरातील प्रमाण मोजायला हवे. मात्र हे प्रमाण मोजून फायदा नसतो. कारण शरीरातील प्रत्येक पेशीसाठी कॅल्शिअम आवश्यक असते. अगदी मेंदूपासून हृदयापर्यंत. हे कॅल्शिअम रक्तावाटेच सर्व पेशींपर्यंत पोहोचते. त्यामुळे जेव्हा शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा मेंदू प्राधान्यक्रम ठरवतो. सर्वात जास्त आवश्यकता असलेल्या पेशींपर्यंत कॅल्शिअम पोहोचवणे गरजेचे असल्याने मग हाडांमध्ये साठवून ठेवलेले कॅल्शिअम रक्तात पुन्हा घेतले जाते व त्याद्वारे संबंधित अवयवाकडे पोहोचवले जाते. त्यामुळे रक्ताच्या चाचणीत कॅल्शिअमचे प्रमाण सामान्य दिसते, मात्र प्रत्यक्षात शरीरात कॅल्शिअमची अत्यंत कमतरता असू शकते. मग कॅल्शिअमची नेमकी किती कमतरता आहे हे तपासण्यासाठी हाडांची घनता आणि ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण तपासले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ड’ जीवनसत्त्वाचा कॅल्शिअमशी संबंध
‘ड’ जीवनसत्त्व हे कॅल्शिअमचा पोलीस आहे. संरक्षणकर्ता. हाडांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी कॅल्शिअम आवश्यक आहे. कॅल्शिअमचा मुख्य स्रोत म्हणजे दूध. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आदीमधून ते शरीरात जात असते. मात्र रक्तात असलेल्या कॅल्शिअमचा हाडांना फारसा उपयोग नसतो.  कारण हे कॅल्शिअम हाडांमध्ये शोषले जात नाही. हे कॅल्शिअम हाडांना योग्य त्या प्रकारे शोषता यावे यासाठी जो घटक महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे ‘ड’ जीवनसत्त्व. दूध किंवा तत्सम पदार्थामधून मोठय़ा प्रमाणावर कॅल्शिअम शरीरात गेले आणि शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असेल तर मग या कॅल्शिअमचा म्हणावा तेवढा उपयोग होत नाही. त्यातच कॅल्शिअमसाठी किमान दुधासारखा महत्त्वाचा स्रोत आहे मात्र ‘ड’ जीवनसत्त्वासाठी सकाळच्या साधारण आठ ते नऊ वाजताच्या कोवळ्या उन्हाव्यतिरिक्त इतर चांगला स्रोत नाही. नाही म्हणायला काही मासे,  कॉर्डलिव्हर ऑइल, अंडी यातून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते, मात्र अत्यल्प प्रमाणात. त्यामुळे सर्व भार सकाळच्या उन्हावरच. त्यामुळे शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळली की त्याच्या सप्लीमेंट्स घ्याव्या लागतात.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of vitamin d
First published on: 22-08-2015 at 12:34 IST