• मधुमेह या विकारांवर आजकाल भरपूर चर्चा होत आहे. जनजागृतीचे अनेक कार्यक्रम नित्यनेमाने होतात. मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृतीच्या क्षेत्रात गेली काही दशके कार्यरत असलेल्या बहुतेक संस्था अत्यंत निष्ठेने आपले कार्य करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर गेल्या १०-१२ वर्षांच्या आकडेवारीकडे पाहिले तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ भयचकित करणारी आहे.
    २०००मध्ये आपल्या देशात ३.१ कोटी मधुमेही होते. जागतिक आरोग्य संस्थेने २०३०पर्यंत ही संस्था ८ कोटीपर्यंत जाईल, असा अंदाज केला होता. प्रत्यक्षात (२०१३मध्ये) आपण सहा कोटींचा आकडा पार केला आहे. २०१३च्या या आकडेवारीत एक अत्यंत भयावह बाब म्हणजे ‘मधुमेहाच्या पूर्वस्थितीत’ (प्रीडायबेटिक) असलेल्यांची संख्या ८ कोटी जवळ पोहोचली आहे. ही आकडेवारीसुद्धा फसवी आहे. या आकडेवारीनुसार ज्यांना आजार जडला आहे हे ठाऊक आहे त्यांचीच माहिती आहे. मधुमेहाची प्राथमिक लक्षणे सर्वामध्ये दिसत नाही त्यामुळे शरीरात आजार असूनही रुग्ण त्याबद्दल संपूर्णपणे अनभिज्ञ असू शकतो.
    मधुमेह हा आजार समूळपणे नष्ट वा निवारण करणारी औषधे उपलब्ध नाहीत. उपलब्ध औषधोपचार रोगनियंत्रणाचं काम करतात. त्यामुळे या रोगाबद्दल ‘जेव्हा होईल तेव्हा बघून घेऊ’ असे म्हणणे म्हणजे आमच्यावर कुणी आक्रमण केले तर आम्ही लगेच सन्यभरतीला सुरुवात करू आणि तोपर्यंत अत्यंत जहाल शब्दात निषेध करत राहू, असे काहीसे होईल. ज्या रोगांचे औषध माहीत नाही ते आजार होणे आम्हाला परवडणारे नाहीत. तसेच रोग झाल्यानंतर किती वर्षांनी त्या रोगांपासून उद्भवणारे इतर विकार सुरू होतील याचे काही कोष्टक नाही आणि ठोकताळेसुद्धा बेभरवशाचे आहेत. मधुमेहाच्या निदानाच्या वेळी शरीराची बरीच हानी झालेली असू शकते. इन्सुलीन निर्माण करणाऱ्या ग्रंथीची कार्यक्षमता बरेचदा ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत कमी झालेली असते. थोडक्यात रोग दृश्यपातळीवर येण्यापूर्वीच शरीराच्या नासाडीला सुरुवात झालेली असते. त्यामुळे आपण कमीत कमी धोक्याचे संकेत मिळाल्यानंतर तरी जागे होऊया.

    मधुमेहाच्या संदर्भात ढोबळमानाने तीन गट केले तर..
     गट १- रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण : उपाशीपोटी १२६ मिलीग्रॅमपेक्षा जास्त आणि जेवणानंतर दोन तासांनी २०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त  किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबीन ६.५ पेक्षा जास्त. हा गट निर्वविादपणे मधुमेहींचा.   
     गट २- रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण : उपाशीपोटी १०० ते १२५ मिलीग्रॅमपर्यंत आणि जेवणानंतर दोन तासांनी १४० ते २०० मिलीग्रॅमपर्यंत किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबीन ६ ते ६.४ पर्यंत. या गटातील मंडळींना पूर्वावस्थेतील मधुमेह आहे.

    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

     गट ३- रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण : उपाशीपोटी १०० मिलीग्रॅमपर्यंत आणि जेवणानंतर दोन तासांनी १४० मिलीग्रॅमपर्यंत किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबीन ६ पेक्षा कमी. हा गट सामान्य लोकांचा.

    पहिल्या दोन गटातील व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे. आपण गट क्रमांक ३च्या लोकांमध्ये रक्तशर्कराच्या प्रमाणाव्यतिरिक्त इतर बाबींवर विचार करायला हवा. एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य असले तरी त्या व्यक्तीस मधुमेह होण्याची शक्यता आहे अथवा नाही हे ठरविण्यासाठी इतर निकषांचा विचार करायला हवा.
    उदाहरणार्थ एखादी व्यक्ती बठे काम करणारी, स्थूल शरीरमान असलेली, व्यायामाची आवड नसणारी, आहाराच्या बाबतीत बेफिकीर असेल तर त्या व्यक्तीला जीवनशैलीशी निगडित आजारांची शक्यता आहे हे सांगण्यासाठी फार विचार करण्याची गरज नाही. मधुमेहाची जीवनशैलीशी संबंध आहे तसाच आनुवंशिकतेशीही आहे. मधुमेहाची जोखीम जाणून घेण्यासाठी मधुमेहतज्ज्ञांनी ‘इंडियन डायबेटिस रिस्क स्कोअर’ तयार केला आहे. यात वय, कमरेचा घेर, दैनंदिन शारीरिक व्यायामाची पातळी आणि आनुवंशिकता या गोष्टींचा विचार होतो.

    ‘प्राथमिक प्रतिबंधक उपाय’ मधुमेहाची जोखीम असलेल्या व्यक्तींना त्यापासून दूर ठेवण्याचे प्रभावी साधन आहे. गेल्या दशकांमध्ये या ‘प्राथमिक प्रतिबंधक उपाय’ योजनेबद्दल फार मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली, पण तरीसुद्धा या विकारांच्या वाढीचा आलेख कमी झाला नाही. जसे एखादे न सुटणारे गणित जेव्हा पुन:पुन्हा त्याच त्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करून सुटत नसेल तर त्या गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असते तसेच काहीसे इथे करणे गरजेचे आहे. आजार झालेला नसल्यामुळे प्रतिबंधक उपाय गांभीर्याने घेतले जात नाही. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, रेल्वे स्थानक, बस थांबे या ठिकाणी जीवनशैलीत बदल करण्याची आठवण करून देणारे कायमस्वरूपी फलक लावायला हवे. समारंभ, लग्न, पार्टी, स्नेहसंमेलन या ठिकाणी आरोग्यदायी पदार्थाचा पर्याय ठेवण्याचा आग्रह धरायला हवा आणि एखाद्या दिवशी ‘चलता है’ ही मानसिकता प्रयत्नपूर्वक बदलायला हवी. आरोग्याबद्दल जागरूकता हा काही जणांसाठी थट्टेचा विषय असतो आणि त्याची ते मनसोक्त खिल्ली उडवितात. या अज्ञानी मंडळींना क्षमा करून जमल्यास त्यांनाही योग्य मार्ग दाखवायला हवा.

    मधुमेहासाठी प्रतिबंधक उपाययोजना
    * वजन कमी करा  (आहारावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम)
    * आहार समतोल असावा
    * आहारात चोथा योग्य प्रमाणात आहे याची खातरजमा करा.
    * रोजच्या जेवणात भरपूर भाज्या, हिरव्या  पालेभाज्या, सॅलड, (काकडी, गाजर, टोमॅटो, कोबी इत्यादी) कडधान्य, जवस, काऱ्हाळयाची चटणी आणि फळांचा समावेश असावा.
    * साखर, गूळ, मदा, मक्याचे पांढरे पीठ, पॉलिश केलेले तांदूळ व त्याचे पीठ या गोष्टींचा वापर अत्यल्प असावा (खरे तर आपल्या रोजच्या आहारात या पदार्थाचा सहभाग अजिबात नसावा, परंतु आपण सवयीचे गुलाम आणि गुलामाचे स्वातंत्र्य मर्यादितच असते म्हणून अत्यल्प).
    * जेवणाच्या वेळेच्या बाबतीत शिस्त पाळा. रोज न्याहारी अत्यावश्यक आहे. मधल्या वेळेत अरबटचरबट खाणे कटाक्षाने टाळा.
    * व्यायाम हा दिनचर्येचा अविभाज्य भाग करा. चालणे हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. यांत्रिक युगात शारीरिक व्यायामाची जागा यंत्रांनी घेतली. त्यामुळे शारीरिक निष्क्रियता निर्माण झाली आहे. त्यामुळे दररोज व्यायाम करणे, मदानी खेळ खेळणे याकडे लक्ष दिले पाहिजे.
    * जमेल तेवढे पायी चालावे. एक दोन बसथांब्यांएवढे अंतर असेल तर पायी जावे. अशा प्रकारच्या सवयी हट्टाने लावून घ्यावात.
    * संस्कारक्षम वयात आहार आणि व्यायाम या गोष्टींचे संस्कार व्हायलाच हवे.
    * ताणतणावावर नियंत्रण ठेवा (कठीण असले तरी अशक्य नाही).
    * निवांत झोप सर्वागीण आरोग्यासाठी आवश्यक आहे.

     डॉ. राजेंद्र आगरकर,
    अध्यक्ष, सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ हायपरटेन्शन अ‍ॅण्ड डायबेटीस,
     ryagarkar@gmail.com  (www.sphdindia.org)

     

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes in india
First published on: 11-11-2014 at 04:27 IST