कोमल, २७ वष्रे, गृहिणी आहे. कधी- कधी तिला डोळ्यासमोर शौचालय दिसल्यासारखे व्हायचे. हात नक्की स्वच्छ धुतले की नाही असा संशय काहीवेळा वाटे. बाळंतपणानंतर या नकोशा विचारांचे प्रमाण खूपच वाढले. साफसफाई करण्यातच दिवस संपत असे. बाळाचे संगोपन करता येत नव्हते आणि घरच्यांशी वाद होऊ लागले. कोमलला नकोशा विचारांचा आजार झाला होता. साधारण चार ते पाच टक्के जणांना होणाऱ्या या नकोशा आजाराचे नाव ऑब्सेसिव कंपल्सीव डिसॉर्डर (ओसीडी) आहे.
ओसीडी म्हणजे काय?
नकोसे विचार केव्हातरी सर्वानाच येतात. कधी-कधी नकोसे दृश्य डोळ्यांसमोर आल्यासारखे होते. क्वचित काही दुष्कृत्य करावेसे वाटते. या अनुभवांना ऑब्सेशन म्हणतात. आपण या नकोशा अनुभवांकडे दुर्लक्ष करतो. पण जर या अनुभवांचे प्रमाण खूप वाढले तर त्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते आणि त्या विचारांमुळे मानसिक तणाव वाढतो, त्यावेळेला ते आजारपणाचे लक्षण ठरतात. हा तणाव कमी करण्यासाठी माणसे काही कृती किंवा मानसिक विचार सुरू करतात. त्यांना कम्पल्शन म्हणतात. काही व्यक्तींना विशिष्ट कृती केल्या नाहीत तर काही तरी वाईट घडेल असे विचार येतात.
स्वच्छता, सुरक्षितता, धार्मिक आणि लंगिक विषयांचे विचार अधिक प्रमाणात आढळून येतात. आपल्याकडून मुलांचे, जवळील व्यक्तींचे लंगिक शोषण होईल, मारहाण, खून होईल, असे अत्यंत भीतीदायक विचार/ दृश्य येऊ शकतात. डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा शौचालय, शौच यासारखे घाणेरडे, अश्लील किंवा हिंस्र दृश्य येऊ शकतात. डोळे मिटले तरी ते दिसल्यासारखे होते. खरे तर या व्यक्ती अगदी स्वच्छ, प्रेमळ, शांतीप्रिय आणि नितीप्रिय असतात. त्यामुळे या अनुभवांनी त्या पार बिथरून जातात.
हा त्रास का होतो?
मेंदूत सतत विचार निर्माण होत असतात. मेंदूचा पुढील भाग म्हणजे कपाळामागचा भाग (प्रीफ्रंटल लोब) या विचारांचे नियंत्रण करत असतो. हे नियंत्रण बिघडून बिनकामाचे, निर्थक विचार वाढतात. त्यामधील त्रासदायी विचार व्यक्तीच्या तीव्रतेने लक्षात येतात. ते कमी करण्याच्या प्रयत्नांत त्या विचारांकडे जास्त लक्ष दिले जाते. जास्त लक्ष दिल्यामुळे विचारांचा गोंधळ वाढत जातो. हे या आजाराचे सोपे स्पष्टीकरण.
 अनुवंशिकतेने आजार होण्याची शक्यता वाढते, मात्र प्रत्येकाला आजार होतोच असे नाही. मेंदूला बसलेला मार, मेंदूज्वर, आकडी आणि क्वचितप्रसंगी मानसिक आजारावरच्या औषधांमुळे हा आजार होऊ शकतो. हा आजार अगदी लहान, तीन-चार वर्षांच्या मुलांनाही होतो. राष्ट्रीय तांत्रिक आणि मानसिक स्वास्थ्य संस्था, बेंगळुरू  (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड न्युरोसायन्स ) येथे या आजाराचे बरेच संशोधन करण्यात आले. लहान मुलांमधील हा आजार पूर्णपणे बरा होतो, असा शोध लागला. महिलांमध्ये हा आजार बाळंतपणात सुरू होतो किंवा खूप वाढतो.
यावर उपाय-उपचार असतात का?
मुळात हा आजार असल्याने ‘विचार करू नको’ किंवा ‘काही होणार नाही’ असे सांगून विचार जात नाही. औषध देऊन त्यांची भीती, उदासीनता कमी करावी लागते. उदासिनतेवरची औषधे जास्त डोसमध्ये दिल्याने विचार देखील कमी होतात. औषध दिल्यावर साधारण तीन-चार आठवडय़ांनी बरे वाटू लागते आणि तीन-चार महिन्यांनी आजार बऱ्यापकी कमी होतो. आधी काही दिवस औषधांमुळे अस्वस्थता वाटते. मात्र त्यामुळे औषध बंद करू नये कारण नंतर हे दुष्परिणाम निघून जातात.
 ओसीडीमध्ये ‘कॉग्निटीव्ह बिहेवियर’ असे विशिष्ट प्रकारचे समुपदेशन खास परिणामकारक असते. यात रुग्णाला आजाराचे विचार आणि खरे विचार यातील फरक ओळखायला शिकवले जाते. मग आजारांच्या विचारांना हाताळण्यास शिकवले जाते. योग्य नियोजन आणि सातत्याने समुपदेशन केल्याने क्रमाने विचार कमी होतात. एवढेच नाही, मेंदूचे कामही सुरळीत झाल्याचे दिसून येते. आताच्या काळात थेरपीचे काही भाग संगणकावर किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे मोफत मिळू शकतात. ब्रेन लॉक नावाच्या पुस्तकात थेरपी कशी करावी याची नेमकी माहिती दिलेली आहे. आजार बळावलेल्या रुग्णांना उपचारांचा फायदा झाला नाही तर शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबता येतो.  
हा विचित्र लक्षणांचा आजार बहुधा लपवला जातो. पण सतत येणारे विचार नकोसे वाटले, त्यांचा त्रास होत राहिला तर ओसीडी आहे का ते तपासावे. त्यावर उपचार आहेत.
डॉ. वाणी कुल्हळी -vanibk@rediffmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disease of unwanted thoughts
First published on: 11-04-2015 at 01:13 IST