कुटुंबाच्या पालनपोषणाची, आर्थिक स्तर उंचावण्याची, कुटुंबीयांच्या गरजा भागवण्याची जबाबदारी आपलीच आहे आणि आपण त्यात कमी पडत आहोत, असे वाटत राहिल्याने अनेक पुरुष मानसिक तणावाखाली राहतात. आर्थिक उन्नतीचा पुरुषार्थाशी संबंध जोडल्याने पुरुषांना या मानसिक ताणातून बाहेर येणे कठीण होते.
माझे अनेक मित्र माझ्यापुढे निघून गेले आहेत.. मानसोपचारतज्ज्ञांकडे येणाऱ्या ३० ते ४० वयोगातील अनेक पुरुषांचे हे अगदी ठरलेलं वाक्य असतं. माझ्या मित्रांना माझ्यापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न आहे, असे सांगणारे तिशीच्या आतले तरुणही हल्ली येऊ लागले आहेत. बरं, या पुरुषांची आर्थिक स्थिती अजिबातच कमकुवत नसते. स्वत:चं घर, गाडी, चांगला बँक बॅलन्स असूनही ते चिंताग्रस्त असतात आणि त्यांची चिंता त्यांच्यापुरती अगदी खरी असते. आपण आयुष्यात कुठेच पोहोचू शकलेलो नाही. मुलांच्या, पत्नीच्या गरजा नीट भागवता येत नाहीत.. याचा त्यांच्यावर प्रचंड तणाव असतो. स्त्री-पुरुष समानतेबाबत चर्चा होत असली तरी अजूनही आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदारीचे ओझे मुख्यत्वे पुरुषांवर असल्याने पुरुषार्थाचा चुकीचा ताण ते शीरावर घेऊन जगत असतात.
आर्थिक सुबत्ता आली असली तरी समाजात पगाराबाबत प्रचंड दरी दिसते. एकाच प्रकारचे शिक्षण घेऊनही पन्नास हजारांपासून काही लाख रुपये मासिक वेतन देणाऱ्या नोकऱ्या आहेत. व्यवसायात तर ही दरी अधिकच रुंदावलेली असते. त्यामुळे प्रयत्न करूनही आपण मित्रांपेक्षा मागे राहिलो, ही स्थिती डाचत राहते. फक्त पैसेच नाही तर गाडी, घर आता तर मोबाइल, घडय़ाळ अशा वस्तूंची, त्यांच्या ब्रॅण्डचीही तुलना होत राहते. या सगळ्याचा ताण असह्य़ झाला की मग उपचारासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे येतात. अर्थात आपल्याला या मानसिक ताणावर उपाय करता येईल, याबाबत जागृती झाली आहे, हेदेखील तेवढेच खरे.
व्यापक विचार करा
कोणालाही स्वत:कडील पैसा हा पुरेसा वाटत नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या शंभरमध्ये असलेल्या लोकांनाही तसे वाटत नाही. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती योग्य आहे, काळजी करू नका, हे या पुरुषांना सांगण्यात अर्थ नसतो. त्याऐवजी थोडा व्यापक विचार करण्यासाठी मदत करता येते. स्वत:च्या आत डोकावायला लावून संपर्क साधता येतो. पैसे हे शाश्वत सुखाचे साधन नाही याकडे लक्ष वेधावे लागते. पैशाने सुखाची साधने विकत घेता येत असली तरी मनाचा आनंद हा स्वत:तच शोधावा लागतो. एखादी वस्तू मिळाली की आपण आनंदी होऊ असे वाटते. मात्र ती वस्तू हातात आली की आकांक्षा अधिक वाढते. अर्थात महत्त्वाकांक्षा असणे जगण्यासाठी आवश्यकच असते. मात्र ती कोणत्या स्वरूपात आहे, ते महत्त्वाचे. महत्त्वाकांक्षेला जर अपराधीपणाची भावना जोडली गेली तर वेदना हाती येतात. तेच महत्त्वाकांक्षेला स्वतंत्र मनाची जोड असेल तर शांती मिळते. पैसे मिळवण्याच्या इच्छेपायी महत्त्वाकांक्षेला खतपाणी मिळाले तर त्यातून आनंद हाती लागत नाही.
पैसे कमाविणे सवय झालीय?
इच्छा असणे आणि व्याधी जडणे यातही फरक आहे. पैसे कमावणे ही इच्छा असू शकते, स्वप्न असू शकते. पण कालांतराने ती सवय झालेली नाही ना.. पैशांचा उपभोग घेण्याऐवजी तो केवळ वाढवण्यातच वेळ जात नाहीये ना. त्याचाही विचार करा. कुटुंबाला आर्थिक आधार देणे ही पुरुषाची तर भावनिक आधार देणे ही स्त्रीची जबाबदारी मानली गेली आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत काही चुकल्यास, कमीपणा आल्यास त्याची जबाबदारी पुरुषावर येते. मात्र कुटुंबाच्या गरजा कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. गिरगावऐवजी अंधेरीत, अंधेरीऐवजी डोंबिवलीत घर घेणे म्हणजे गरजा भागवता येत नाहीत, असे होऊ शकत नाही.