नीताजी, वय वर्ष ५७, या एका प्रतिष्ठित शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा एकदम श्वास कोंडला, छातीत दुखू लागले, घाम फुटला आणि प्रचंड भीती वाटली. तातडीने तपासणी केल्यानंतर रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. औषधे, पथ्य, व्यायाम सर्व करूनही अधून- मधून त्यांना असे होतच राहिले. मुंबईतल्या अनेक हृदयविकारतज्ज्ञांकडून सल्ला घेतला. त्यांचे हृदय अगदी दणकट आहे, असे सर्वाचे मत पडले, पण हे झटके येत राहिले. तेव्हा त्यांनी मानासोपाचारतज्ज्ञाना दाखवावे, असे सांगितले गेले. पण त्यांना ते पटले नाहीये. आता परदेशात जाऊन सल्ला- तपासणी करण्याचा त्यांचा निर्णय झाला.
हृदयविकार की मानसिक आजार?
व्यक्तीला चकीत करणारे आणि घाबरवून सोडणाऱ्या भीतीच्या झटक्याची (पॅनिक डिसॉर्डर) सर्व लक्षणे हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणेच असतात. पण हृदयाच्या सर्व तपासण्या केल्यावर कोणताही दोष आढळत नाही. काही वेळा दमा, जुलाब, अतिरक्तदाब, मधुमेहातील अतिसाखरेची स्थिती (हायपरग्लायसीमिया) किंवा चक्कर येण्यासारखी लक्षणे दिसतात. यातही संबंधित अवयव निरोगीच असतात. नमूद केलेल्या आजारांमध्ये आणि पॅनिक आजारातील मुख्य फरक म्हणजे त्या आजाराची सर्व आणि नेमकी लक्षणे रुग्णात आढळत नाहीत आणि उपचारांचा उपयोग होत नाही. व्यक्ती भित्री बनते, उदासीनता निर्माण होते. घराबाहेर पडणे किंवा घरात एकटे राहणे अशक्य होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे कशामुळे घडते?
धोक्याच्या स्थितीपासून स्वतचे संरक्षण करण्यासाठी भीती हा एक संकेत असते. स्वतला वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, रक्तातली साखर वाढते, श्वासगती वाढते आणि पोट गच्च होते. या प्रक्रियेतून मेंदूला तसेच मांसपेशींना अधिक उर्जा मिळते व त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या चांगल्या कल्पना आणि जलद कृती प्राण्यांकडून केली जाते. काही विपरीत घडले किंवा धोका समोर असेल तर असेच होते. मात्र काही वेळा मानसिक आजारांमध्ये भीती वाढते तेव्हाही असे होते.
पॅनिक डिसऑर्डरमध्ये मेंदूची भीतीचे संकेत देणारी प्रक्रिया अतिसंवेदनशील होते. मग हे संकेत वारंवार आणि तीव्रतेने दिले जातात. शरीरात झालेले बदल जाणवल्यामुळे आणि भीती असल्यामुळे रुग्णांना इतर कुठले तरी आजार आहे असे वाटू लागते. ज्या ठिकाणी हा अनुभव पहिल्यांदा येतो, त्या ठिकाणी परत जाण्याची भीती मनात बसते. बहुतेक हे ठिकाण बंद खोली, लिफ्ट, बाजारासारखे गर्दीचे ठिकाण किंवा घरापासून लांब अनोळखी ठिकाण असते. बस किंवा ट्रेनमध्ये हे अनुभव पहिल्यांदा घडलेले मी खुपदा पाहिले आहेत, मात्र त्याचे कारण मला सापडले नाही.
हा आजार स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध – कोणालाही होऊ शकतो. तरी पुरुषांमध्ये अधिकतर तरुण वयात तर स्त्रियांमध्ये मासिक पाळी जाताना सुरू होतो. आधीच्या काळात मध्यवयस्क स्त्रीला असे आजार झाल्यामुळे ती घराबाहेर पडण्याचे सोडून देत असे. तेव्हा ‘भित्री गृहिणी’चे आजार असे याला म्हटले जाई. स्वता:ला जपून, सतत तपासण्या- उपचार करून आयुष्य निभावून नेले जाते. वास्तविक हा मनाचा आजार असू शकतो या सत्यावर व्यक्तीचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास बसत नाही.  

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heat shock
First published on: 23-05-2015 at 09:47 IST