आपल्याला हृदयविकार असल्याचे समजताच बहुतेकांच्या हृदयाची धडधड वाढते! हृदयविकाराचा झटका येण्याची भीती या व्यक्तींच्या मनात सतत असते. पण हृदयविकार होण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक कोणते, कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब, व्यक्तीचे वजन या इतर गोष्टींचा हृदयविकाराशी संबंध कसा आहे, हे या पुस्तकात लहान प्रकरणांमध्ये उलगडून दाखवली आहे. हृदयाचे कार्य कसे चालते, हृदयविकाराचा झटका येताना नेमके काय घडते, त्यातील गुंतागुंती कोणकोणत्या याचाही धांडोळा हे पुस्तक घेते. डॉक्टरांना स्वत:लाच हृदयविकाराला सामोरे जावे लागते तेव्हा काय घडते याच्या रंजक गोष्टीसह या पुस्तकात हृदयविकारासंबंधी नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचा आणि काही ‘हार्ट फ्रेंडली’ अन्नपदार्थाच्या पाककृतींचाही समावेश करण्यात आला आहे.

संधीवाताचे दुखणे म्हणजे नेमके काय, इथपासून या दुखण्याचे विविध प्रकार आणि त्यांवर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती या पुस्तकात विस्ताराने देण्यात आली आहे. हाडांची झीज होऊन झालेला संधीवात, मानदुखी, कंबरदुखी, अंगदुखी
या नेहमी चर्चिल्या जाणाऱ्या विषयांसह सोरियासिस आणि संधीवात, चिकुगुन्यामुळे होणारा संधीवात, गाऊट, ऑस्टिओपोरोसिस या आजारांविषयीही हे पुस्तक बोलते.
या दुखण्यांवर सुचवले जाणारे व्यायाम, औषधे, या औषधांचे संभाव्य दुष्परिणाम यांच्याविषयीच्या माहितीचा समावेशही पुस्तकात आहे. संधीवातासाठीचे काही सोपे व्यायाम कसे करावेत याविषयीही पुस्तक सचित्र मार्गदर्शन करते. याव्यतिरिक्त लहान मुलांना होणाऱ्या संधीवाताविषयीचे एक सविस्तर प्रकरण या पुस्तकात आहे.   

या आठवडय़ापासून ‘आरोग्य परिचय’ हे नवीन पाक्षिक सदर सुरू करत आहोत. या सदरात आरोग्याशी संबंधित निवडक पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून दिला जाईल. लेखक/ प्रकाशक या सदरासाठी पुस्तक पाठवू शकतात. आलेल्या सर्व पुस्तकांचा परिचय करून देणे जागेअभावी शक्य न झाल्यास पुस्तकाची नोंद घेतली जाईल. पुस्तक पाठवण्याचा पत्ता- ‘संपादक, एक्सप्रेस हाऊस, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे- ४११००५’. पाकिटावर ‘हेल्थ इटसाठी’ असा उल्लेख करावा.        

पुस्तकाचे नाव- सहृदय
लेखक- डॉ. गुरूनाथ परळे
प्रकाशन- नंदिनी पब्लिशिंग हाऊस
किंमत- १६० रुपये

पुस्तकाचे नाव- संधीवाताचे दुखणे
लेखक- डॉ. श्रीकांत वाघ
प्रकाशन- ‘क्या’ फाऊंडेशन
वितरण व्यवस्था- राजहंस प्रकाशन
किंमत- २५० रुपये