ऋतू बदलला की आजूबाजूला बदललेल्या हवामानाचे परिणाम साहजिकच शरीरावर होतात. उन्हाळ्याशी जुळवून घेताना नेमका आहार कसा असावा, तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याची माहिती आपण गेल्या दोन आठवडय़ांत घेतली. यावेळी शरीरातील तसेच बाह्य़ उष्णतेने त्वचेवर येणारे घामोळे, पुरळ, गजकर्ण याविषयी..
उन्हाळा म्हणजे खरं तर खूप धम्माल. एक तर सर्वत्र सुट्टय़ांचं वातावरण असतं. गावी जायच्या किंवा बाहेर फिरायला जायच्या बऱ्याच दिवसांपासूनच्या योजना याच काळात पूर्ण होतात. याशिवाय शाळा-कॉलेजचा त्रास नसल्याने दिवसभराच्या वेळेचे नेमके काय करायचे हेदेखील आपल्याच हातात असते. फक्त एकच त्रास असतो तो म्हणजे असह्य़ उकाडय़ाचा. पंखा, एसी यांच्या संरक्षक आवरणातून जरा बाहेर पडलो की, सूर्य वाटच पाहत असल्याप्रमाणे अंग भाजून काढायला सुरुवात करतो. मुंबई-कोकण या भागात समुद्राची खारी दमट हवा उन्हात मिसळल्याने घामाने डबडबायला होते, तर राज्याच्या अन्य भागात कडक उन्हाने त्वचेची सालपटे निघतात. अर्थात जिथे समस्या असते तिथे उत्तरही असते. अनेक वर्षांपासून पारखून घेतलेले सोपे उपाय आणि आधुनिक वैद्यकीय ज्ञान या दोन्हींच्या मदतीने हा उन्हाळा सुसह्य़ करता येईल.
घाम, घामोळे आणि इतर त्वचाविकार या सगळ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. शक्य असल्यास बाहेरून फिरून आल्यावर आंघोळ करा किंवा किमान हात, काखा, गळा, मान पाण्याने स्वच्छ करा. त्यामुळे घाम व त्यामुळे होणाऱ्या त्वचाविकारांपासून लांब राहू शकाल. बाहेर जाताना सुती, फिकट रंगांचे आणि सलसर कपडे घालण्याचा आई-आजीचा सल्ला मानायला हरकत नाही. आता तर खास उन्हाळ्यासाठी फॅशनेबल कपडय़ांचाही ट्रेण्ड आहे. दुपारच्या वेळेस उन्हात जाऊ नका, मात्र गेलातच तर स्कार्फ, टोपी अवश्य वापरा. टाल्कम पावडर, विशेषत: घामोळ्यांवरील पावडर वापरा म्हणजे त्वचा थंड राहते शिवाय खाज येत नाही. मात्र घामाचा वास लपवण्यासाठी परफ्युम थेट त्वचेवर मारू नका. सूर्यकिरणांची त्याच्याशी रिअ‍ॅक्शन होऊन त्वचेवर कायमचा डाग पडू शकतो, असा सल्ला बीम्स रुग्णालयाच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सदाफ रंगूनी यांनी दिला. सनस्क्रीनचा उपयोगही करू शकता. मात्र तुमची त्वचा तेलकट असेल तर २० एसपीएफपेक्षा जास्त क्षमतेचे सनस्क्रीन लावू नका, कारण त्यामुळे आधीच तेल असलेल्या तुमच्या त्वचेवर अतिरिक्त रसायनांचा मारा होईल. पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला तर बाराही महिने मानायला हरकत नाही. आता तर घामामुळे खूप अधिक तहान लागते. कंठशोष लागेपर्यंत वाट न पाहता थोडय़ा थोडय़ा वेळाने पाणी प्यायला हरकत नाही. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहील, शिवाय त्वचा कोरडी होऊन त्यावर सुरकुत्याही पडणार नाहीत. सध्या भरपूर आलेली किलगडे, ताडगोळे याशिवाय काकडय़ा, गाजर, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.
घाम
 उन्हाळा म्हटले की त्यासोबत घाम हा आलाच. खरे तर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणे हे आवश्यक आहे. घर्मग्रंथीमधील घाम त्वचेवर येतो, तेथून त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरातील उष्णता वापरली जाते व शरीर थंड राहते. मात्र या घामामुळे चिकचिकीत होणारे अंग व कपडे, कितीही डिओ मारला तरी घामाला येणारा वास तसेच घाम सुकल्याने येणारे रॅशेस मात्र त्रासदायक ठरतात.
घामोळे
घर्मग्रंथीमधील घाम बाहेर येऊ शकला नाही की त्वचेला सूज किंवा रॅशेस येतात त्यालाच घामोळे म्हणतात. मान, काखा, मांडय़ा येथील त्वचा एकमेकीला स्पर्श करत असल्याने तेथे घामोळे येण्याचे प्रमाण अधिक असते. कधी त्वचेच्या रंगाचे, कधी लाल तर अतितीव्र झाल्यास पिवळ्या रंगाचे घामोळे येते. काही काळाने ते आपोआप बरे होऊ शकते. मात्र ते बरे होईपर्यंत तेथे येणारी खाज असह्य़ होते, त्यामुळेच ते होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.
त्वचा काळवंडणे
उन्हात गेल्यावर त्वचा काळी होण्याचा प्रकार आपल्याकडे सदासर्वकाळ असतो. स्कार्फमुळे चेहऱ्याची त्वचा नीट राहिली तरी हात, पावले काळी होतात. उन्हाळ्यात ही समस्या अधिक जाणवते. खरे तर तीव्र किरणांमुळे शरीराचे नुकसान होऊ नये यासाठी त्वचेतून मेलॅनिन हे संरक्षक द्रव्य पाझरत असते. उन्हाळ्यात त्याची तीव्रता साहजिकच वाढते, त्यामुळे त्वचा टॅन दिसू लागते. पाश्चिमात्य देशात त्वचा टॅन करून घेण्याची फॅशन असली, तरी आपल्याकडे मात्र त्वचेचा मूळचा रंग कायम ठेवण्यासाठी धडपड केली जाते. त्वचा जशी एका दिवसात काळवंडत नाही, तशीच एका दिवसात मूळ रंगही परत येत नाही. त्याला आठवडा लागतो, मात्र लग्नाचा सीझन असल्याने काही वेळा ब्लिचिंगसारखे ‘पी हळद, हो गोरी’ प्रकार केले जातात. मात्र त्यामुळे कोरडी त्वचा, अ‍ॅलर्जी होण्यासारखे दुष्परिणामही दिसून येतात.
सन बर्न  
सूर्याचे किरण त्वचेच्या थेट आतील थरापर्यंत जाऊन त्वचेचे नुकसान करतात. दुपारच्या वेळेत पोहोचल्यास, कडक उन्हात राहिल्यास त्वचा लालसर पडून आग होते. काही वेळा पाण्याचे फोडही येतात. करपलेली ही त्वचा आठ ते दहा दिवसांत निघून जाते. काही वेळा मान, गळ्याकडील भाग येथे पुरळही येते. मात्र सन बर्न टाळण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत शक्यतो कडक उन्हात बराच काळ राहू नका.
गजकर्ण
काख, जांघेच्या भागात उष्णतेमुळे गजकर्णासारखे त्वचाविकार होतात. लाल रंगाचे गोलाकार चट्टे येऊन तेथे खाज येते. यासाठी आंघोळ करून तो भाग कोरडा करावा. त्यावर अँटिफंगल क्रीम लावावे. हा त्रास वाढल्यास डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prickly heat acne problem
First published on: 15-04-2014 at 07:01 IST