केसांत कोंडा होणे ही अगदी सर्रास दिसणारी तक्रार. ८-१० वर्षांच्या मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत कुणाच्याही डोक्यात कोंडा होऊ शकतो. हा कोंडा होतो कसा आणि डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी त्यावर घरच्या घरी काही उपाय करता येईल का याविषयी माहिती.. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केसातला कोंडा म्हणजे काय?
डोक्यावरची त्वचा सतत नवीन पेशींची निर्मिती करत असते. जुन्या पेशी मृत होऊन गळून पडतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात. तापमानात वाढ होते तशी या पुर्ननिर्माण प्रक्रियेची गती वाढते. अधिक प्रमाणात आणि सतत पेशींचे गळून पडणे सुरू होते. त्यामुळे केसांमध्ये काही वेळा पांढऱ्या छोटय़ा आकाराचे किंवा कधी खपल्यांसारखे निघालेले त्वचेचे थर दिसतात. केसातले हे त्वचेचे थर म्हणजेच कोंडा. केस कोरडे असतील तर हा कोंडा केस विचरताना पडतो. तेलकट केसांमध्ये डोके खाजवल्यावर तो सुटा होऊन दिसू लागतो.
केसात कोंडा झाल्यानंतर-
केसांच्या मुळाशी त्वचेचे थर अडकल्यामुळे तिथली त्वचा आणि केसही तेलकट होतात.
सतत डोक्याला खाज येते. डोक्यात मुंग्या चालताहेत अशी संवेदना होते.  डोक्याच्या त्वचेवर लालसर चट्टे दिसू शकतात. केस गळू लागतात.
कोंडा होण्याची इतर कारणे-
१) बुरशीचा संसर्ग – डोक्यावरची त्वचा सतत ओलसर राहिली तर त्वचेला बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे केसांत कोंडा होतो.
२) अ‍ॅलर्जी – तेल, साबण, शँपू यामुळे किंवा अगदी प्रदूषणातील काही घटकांमुळे होणाऱ्या अ‍ॅलर्जीनेही कोंडा होऊ शकतो.
३) केसांमधील उवा – केसांत उवा झाल्या असतील तरी कोंडा होऊ शकतो. उवांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे डोक्यावरच्या त्वचेचे आरोग्य धोक्यात येते.
४) इतर त्वचाविकार – इसब (एक्झेमा), सोरायसिस अशा काही त्वचाविकारांमुळेही डोक्यात कोंडा होऊ शकतो.

घरच्या घरी उपाय काय
मेथीच्या दाण्यांची पेस्ट करून केसांच्या मुळांशी लावावी व धुऊन टाकावी
सिताफळाच्या बियांचे चूर्ण विकत मिळते. त्याची पेस्ट करून रोज अर्धा तास केसांच्या मुळांशी लावून ठेवावी व धुवून टाकावी.
गरम केलेल्या खोबरेल तेलात भीमसेनी कापूर घालावा आणि हे तेल गार करून त्याने केसांना मालिश करावी.
तमालपत्राची (तेजपान) ७-८ पाने एक कप पाण्यात उकळून घेऊन त्या पाण्याने केस धुवावेत.

 

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem of hair dandruff
First published on: 08-04-2014 at 01:01 IST