तोतरेपणा या समस्येत मूल बोलताना एकच शब्द पुन:पुन्हा उच्चारते किंवा तो शब्द उच्चारण्यासाठी विराम घेतल्याने त्याच्या बोलण्यात अडथळा येतो. (उदा. म-म- मला.. भ- भ- भूक लागलीय..) मुलाची भाषा कौशल्ये जेव्हा वेगाने विकसित होत असतात त्या वेळी सामान्यपणे ही समस्या उद्भवते. मूल जेव्हा बोलण्यासाठी संघर्ष करीत असते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हालचाली नेहमीपेक्षा वेगळ्या होताना दिसतात. वेगाने डोळे मिचकावणे, ओठ कंप पावणे किंवा थरथरणे अशा हालचाली बोलताना अडखळल्यावर होतात. मूल जेव्हा मानसिक दडपणाखाली किंवा तणावग्रस्त अवस्थेत असते तेव्हा तोतरेपणाची समस्या अधिक गंभीर बनते. पण काही महिन्यांत आजूबाजूची परिस्थिती निवळल्यावर ही समस्याही कमी- कमी होत निघून जाते आणि मूल पुन्हा व्यवस्थित बोलू लागते. पण असे न झाल्यास या समस्येसाठी ‘स्पीच थेरपी’चे उपचार घ्यावे लागतात. नुकतेच बोलू लागलेल्या किंवा शालेयपूर्व वयोगटातील मुलामुलींमध्ये ही समस्या प्रामुख्याने आढळते. याच वयात या मुलांची भाषा कौषल्ये वेगाने विकसित होत असतात. मुलींच्या तुलनेत तोतरेपणाची समस्या मुलांमध्ये अधिक आढळते. त्यातही सामान्यत: २ ते ६ वर्षे या वयोगटातील मुलांत ही समस्या अधिक प्रमाणात दिसते. मोठय़ा माणसांत ही समस्या तुलनेने दुर्मिळ असते. बहुतेक वेळा तोतरेपणा हे एखाद्या गंभीर आजाराचे किंवा एखाद्या मानसिक आजाराचे लक्षण नसते. बऱ्याच मुलांमध्ये ही समस्या काही महिन्यांत नाहिशी होते. क्वचित प्रसंगी काही मुलांत तोतरेपणा दीर्घकाळ टिकतो. अशा वेळी स्पीच थेरपीचे उपचार त्यापासून सुटका होण्यासाठी मदत करतात.