* व्यवसायाने डॉक्टर असलेल्या लताताई देसाईंच्या वडिलांना नोव्हेम्बर २००३ मध्ये अचानक पोटदुखी, उलटय़ा, मळमळ होऊ लागली. औषधांनीही बरे वाटेना म्हणून लताताईंनी सोनोग्राफी व सी.टी. स्कॅन केले. त्यात आमांशयाचा (स्टमक) कॅन्सर यकृतात पसरला आहे असे निदान झाले. स्कोपी व बायॉफ्सीमध्ये चौथ्या स्टेजमधील अॅडिनोकार्सिनोमा असे कॅन्सरचे निदान निश्चित झाल्यावर तात्काळ आधुनिक कॅन्सरतज्ज्ञांचे मत घेतले. केमोथेरपी हा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्याचाही फारसा उपयोग होईल अशी खात्री नाही, असे सांगूनच काकांना केमोथेरपीची सहा सायकल्स दिली. लताताई स्वत: आयुर्वेदिक डॉक्टर असल्याने त्यांनी वडिलांना केमोथेरपी सुरू करण्यापूर्वीच आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा सुरूकेली. केमोथेरपीमुळे आमांशयातील कॅन्सर पूर्णपणे बरा झाला, तसेच केमोथेरपीचे दुष्परिणामही देसाई काकांना जाणवले नाहीत. भूक, पचन, उत्साह यांत लक्षणीय सुधारणा झाली. मात्र यकृतात पसरलेला कॅन्सर सी.टी. स्कॅनमध्ये तीन महिन्यांनंतरही तशाच स्वरूपात होता ही चिंता लताताईंना सतत भेडसावत होती. काकांनी मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नेटाने आयुर्वेदिक औषधे व पथ्यपालन चालू ठेवले. ४ वर्षांनंतर केलेल्या सी.टी. स्कॅनमध्ये यकृतात पसरलेल्या कॅन्सरच्या गाठी आता अजिबात दिसत नसल्याचे आढळून आले. गेली १० वर्षे देसाईकाका चौथ्या स्टेजमधील आमांशयचा कॅन्सर हा दुर्धर आजार होऊनही ७७व्या वर्षी निरामय आयुष्य जगत आहेत ते आयुर्वेदिक चिकित्सा व पथ्यपालन यात खंड न पडू देण्याचे व्रत घेऊनच!
जागतिक आरोग्य संघटनेने २०१२मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार या वर्षी जगात १० लाख रुग्णांना आमांशयाच्या कॅन्सरचे निदान झाले. त्यापकी ७० टक्के रुग्ण प्रगतिशील देशांमध्ये आढळले. त्यापकी भारतात ६३००० रुग्ण होते व ५९००० रुग्णांचा या कॅन्सरने मृत्यू झाला. आमांशयाचा कॅन्सर हा कॅन्सर प्रकारांपकी ५व्या क्रमांकाने आढळणारा कॅन्सर असून ३ऱ्या क्रमांकाचा मृत्यूस कारणीभूत असलेला कॅन्सर आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हा कॅन्सर होण्याची संभावना दुपटीने अधिक आहे.
ल्ल आमांशय हा अन्नपचन करणारा महत्त्वाचा अवयव असल्याने असंतुलित आहार हे आमांशयाच्या सर्व विकारांचे व प्राधान्याने आमांशयाच्या कॅन्सरचे महत्त्वाचे कारण आहे. यात प्राधान्याने अतिशय आंबट, खारट पदार्थ, खारवलेले मासे व मांस, पचनास जड असा मांसाहार, आटवलेले दुग्धजन्य पदार्थ, शिळे अन्नपदार्थ यांचा समावेश होतो. तसेच आयुर्वेदानुसार हिरव्या मिरचीसारखे विदाह निर्माण करणारे तिखट पदार्थ अधिक प्रमाणात व वारंवार सेवन केल्याने आमांशयाचा क्षोभ होतो. या उलट आहारात भरपूर भाज्या, फळे, कांदा-लसूण यांचा वापर आमांशयाचा कॅन्सर टाळण्यास मदत करतो. याशिवाय दीर्घकाळ आम्लपित्त, अपचन, आमांशय व्रण (अल्सर) हे आजार असल्यास व त्यांची योग्य चिकित्सा व पथ्यपालन न केल्यास आमांशयाच्या कॅन्सरला आमंत्रण ठरते. स्थौल्य, मधुमेह व पांडु या आजारांच्या रुग्णात आमांशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. आनुवंशिकता हेही या प्रकारच्या कॅन्सरचे एक महत्त्वाचे कारण विशेषत: पहिल्या पिढीत आढळते.
आयुर्वेद शास्त्रानुसार या सर्व संभाव्य कारणांशिवाय कफज कृमी व पुरीषज कृमी ही आमांशयागत व्याधींची महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. त्यामुळे कृमींची निर्मिती व पोषण करणारी पेढे, बर्फी, बासुंदी, चॉकलेटस्, आईस्क्रीम अशी अतिशय गोड आहारीय द्रव्य; चिंच, व्हिनेगर अशी अतिशय आंबट आहारीय द्रव्य; लोणचे-पापड असे अतिशय खारट पदार्थ; दही-गूळ असे शरीरात स्राव निर्माण करणारे अभिष्यंदी पदार्थ तसेच व्यायाम न करणे, दिवसा जेवणानंतर झोपणे असा आहार व विहार अग्नी मंद करून व आमांशयाचा क्षोभ करून कॅन्सरला हेतूभूत ठरतो.
भूक मंदावणे, उलटी होणे, जेवणानंतर पोट जड होणे, पोट दुखणे, पोटात अस्वस्थता, छातीत जळजळ होणे, घशात अन्न अडकल्यासारखे वाटणे अशी अपचनाची लक्षणे आपल्याला अनेक वेळा चुकीचा आहार-विहार सेवन केल्यावर जाणवत असतात. परंतु लंघनाने किंवा औषधाने ही लक्षणे बरीही होतात. मात्र अशा उपायांनीही ही लक्षणे दीर्घकाळ बरी झाली नाहीत तर आमांशयाच्या कॅन्सरची संभावना असू शकते. तसेच अतिसार किंवा मलाविबंध, अशक्तपणा, पांडुता, वजन झपाटय़ाने कमी होणे, कोळशाच्या रंगाची काळी मलप्रवृत्ती होणे ही सामान्यत: आजार बळावल्यावर दिसणारी लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास लगेचच कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. एन्डोस्कोपी, सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, पेट स्कॅन, बायोप्सी व मलाची तपासणी यांच्याद्वारे आमांशयाच्या कॅन्सरचे निदान निश्चित होते. व्याधी निदानानंतर चिकित्सेचा विचार अनिवार्यच! तो विचार आपण यापुढील लेखात करू.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
आमांशयाचा कर्करोग
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या लताताई देसाईंच्या वडिलांना नोव्हेम्बर २००३ मध्ये अचानक पोटदुखी, उलटय़ा, मळमळ होऊ लागली.
First published on: 11-02-2014 at 06:40 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stomach cancer