‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा एकदा सर्वाना घाबरवून सोडले आहे. बरोबरीने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजारही थोडय़ा अधिक प्रमाणात वर्षभर दिसताहेत. नेमका कोणता ताप कशाचा हे ओळखणे सामान्यांना गोंधळात टाकणारे आहे शिवाय ताप आला की ताबडतोब तज्ज्ञांना गाठावे की थोडा काळ वाट पाहून डॉक्टरांकडे जावे हे प्रश्नही आहेतच. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न..
मलेरिया
* एखादी व्यक्ती विशिष्ट गावाला जाऊन आली आणि आल्यानंतर मलेरिया झाला असे अनेकदा घडते.  
* सुवातीला हा ताप इतर तापांसारखाच वाटतो. रुग्णाला १००- १०१ पर्यंत हळूहळू ताप येऊ लागतो. तीन-चार दिवसांनंतर ‘एका दिवसाआड एक’ अशा ‘पॅटर्न’ने ताप येऊ लागतो.
* या तापाचे ठरलेले तीन टप्पे आहेत. यातल्या पहिल्या टप्प्यात रुग्णाला प्रचंड थंडी वाजते, हुडहुडीच भरते. त्यानंतर ताप जोरात चढतो आणि ताप उतरताना खूप घाम येतो.
* योग्य उपचार मिळाले नाहीत तर ८ दिवस, १५ दिवस अगदी महिनाभरही मलेरियाचा ताप येऊ शकतो. उपचारांअभावी काही रुग्णांना पोटात दुखणे, थोडेसे अंतर चालल्यावर दम लागणे, डोळ्यांत कावीळ दिसू लागणे आणि डोळे पिवळे पडणे अशी लक्षणे दिसू शकतात.
* मलेरियावर उपचार न झाल्यास मूत्रपिंडावर वाईट परिणाम होऊन लघवी कमी होणे, लघवी लाल रंगाची होणे असे परिणाम दिसू शकतात किंवा मलेरियाचा मेंदूवर परिणाम होऊन रुग्ण बेशुद्धावस्थेत किंवा कोमात जाऊ शकतो.
डेंग्यू
* डेंग्यू हा खास शहरी आजार आहे.
* व्यक्ती रोजच्यासारखी नोकरीला गेली आणि अचानक खूप ताप येऊन घरीच यावे लागले, हे लक्षण डेंग्यूत प्रामुख्याने दिसते.
* तीव्र ताप आणि त्याबरोबर थंडी वाजणे हे लक्षण या तापातही दिसते. मलेरियातही थंडी वाजत असल्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया ओळखणे थोडे अवघड जाते.
* डेंग्यूच्या रुग्णाचे अंग तापाच्या अगदी पहिल्या दिवसापासून प्रचंड दुखते. पाठ कुणी मोडून काढावी किंवा अक्षरश: हाडे मोडल्यावर जसे दुखेल तसे या रुग्णाचे अंग दुखते.
* सांधेदुखी, डोकेदुखी आणि डोळे गोल फिरवल्यावर ते दुखणे ही देखील लक्षणे डेंग्यूत दिसतात.
* डेंग्यूचा ताप आल्यावर चार- पाच दिवसांनंतर शरीरावर लाल रंगाचे बारीक- बारीक पुरळ दिसू लागते.
* डेंग्यूत सर्व रुग्णांना घसा दुखण्याचे लक्षण दिसत नाही. पण काही रुग्णांना घसादुखी आणि सर्दी- खोकला होऊ शकतो. स्वाइन फ्लू आणि डेंग्यू ओळखणे यामुळे काही वेळा अवघड जाते.
* डेंग्यूच्या तापात ६ व्या- ७ व्या दिवशी हृदयाचे ठोके कमी होणे, रक्तदाब कमी होणे, उठल्यावर चक्कर येणे, नाकातून किंवा गुदद्वारातून रक्त जाणे, अशी लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिकुनगुनिया
* चिकुनगुनियामध्येही डेंग्यूसारखाच ताप, अंगदुखी, सांधेदुखी होते. पण यातली सांधेदुखी इतकी तीव्र असते की रुग्णांना चालताही येत नाही. विशेष म्हणजे ही तीव्र सांधेदुखी अचानक म्हणजे अगदी २-३ तासांत होऊ शकते. पाय आणि हातातल्या लहान सांध्यांमध्ये प्रचंड दुखते. अनेकांना मूठ वळल्यावर ती उघडता येत नाही. सकाळी उठल्यावर शरीर ताठरते आणि नंतर तो ताठरपणा कमी होतो.
* सांध्यांना सूज येणे हे मात्र चिकुनगुनियाचे वैशिष्टय़ आहे. डेंग्यूत सांधे दुखतात पण सुजत नाहीत. चिकुनगुनियात सांध्यांना सूज दिसून येते. पाऊलही टेकवता येणार नाही इतके सांधे सुजतात.
* चिकुनगुनियाचा ताप आठवडाभर राहतो. या आजाराच्या सहाव्या- सातव्या दिवशीही काही रुग्णांच्या अंगावर पुरळ येऊ शकते.
* चिकुनगुनियाची सांधेदुखी मात्र वेगवेगळ्या काळापर्यंत राहू शकते. काहींची सांधेदुखी १-२ महिने, काहींची ६ महिने तर काहींची सांधेदुखी अगदी दोन-तीन वर्षेही टिकते.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu
First published on: 14-02-2015 at 07:23 IST