एखादा दमला-भागला माणूस संध्याकाळी बसमध्ये लटकून ऑफिसमधून घरी चालला आहे. दिवसभराच्या कामाने त्याच्या अंगात त्राणच उरलेले नाही. त्याच बसमध्ये त्याच्यासारखाच ऑफिसमध्ये काम करणारा आणखी एक माणूस आहे. हा दुसरा माणूस मात्र संध्याकाळीही सकाळच्या इतकाच उत्साही आणि तरतरीत आहे. त्याच्या तरतरीत असण्याचे रहस्यही तसेच आहे. तो रोज अमुकतमुक ब्रँडच्या जीवनसत्वाच्या (व्हिटॅमिन)च्या गोळ्या घेतो. दिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला ज्या- ज्या म्हणून सत्वाची गरज असते, त्यातला प्रत्येक घटक त्याला या गोळ्यांमधून मिळतोय.. टीव्हीवरच्या अशा जाहिराती बघून झाल्यावर त्या बघणाऱ्याला आपल्यालाही व्हिटॅमिन आणि मिनरल्सची प्रचंड आवश्यकता असल्याचे पुरेपूर पटलेले असते. कित्येकदा बॉलिवुडमधले लाडके तारेही या गोळ्यांची शिफारस करतच असतात की! मग काय, एखादे औषधांचे दुकान गाठून या व्हिटॅमिनच्या गोळ्यांची मागणी केली जाते आणि स्वत:च्या मनानेच बेधडकपणे त्या घ्यायलाही सुरुवात होते..
अशा अनेक व्हिटॅमिन, मिनरल्स एकत्रितपणे देणाऱ्या गोळ्या ‘फूड सप्लिमेंट’ या सदरात बसतात. अर्थातच त्यामुळे त्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज भासत नाही. पण केवळ डॉक्टरांचा सल्ला लागत नाही म्हणजे या गोळ्या प्रत्येकासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात का, किंबहुना त्या घेण्याची नक्की गरज कुणाला हे प्रश्न उपस्थित होतात. शिवाय या गोळ्यांची किंमत कमी निश्चितच नसते. महत्त्वाची गोष्ट अशी की जागतिक पातळीवर या गोळ्यांविषयी झालेल्या सर्व अभ्यासांचे निष्कर्ष मात्र या गोळ्यांच्या उलट बाजूने कौल देतात. कोणताही आजार नसलेल्या आणि योग्य आहार घेणाऱ्या व्यक्तीला अशा फूड सप्लिमेंटच्या गोळ्यांची मुळीच गरज नसते, शिवाय या गोळयांना प्रिस्क्रिप्शन लागत नाही म्हणजे त्या बिनधास्तपणे घ्याव्यात, असे नाही. या गोळ्या घेत असलेली व्यक्ती इतर काही औषधे घेत असेल तर त्यांचा आवश्यक परिणाम या गोळ्यांमुळे कमी होऊ शकतो. या गोळ्यांमधली ‘बी- काँप्लेक्स’ व्हिटॅमिन्स पाण्यात विरघळत असल्याने लघवीवाटे बाहेर टाकली जातात. त्यामुळे कदाचित ती जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते. पण ‘ए’, ‘डी’, ‘ई’ आणि ‘के’ व्हिटॅमिन्स पाण्यात विरघत नसून ती ‘फॅट सोल्युबल’ आहेत. त्यामुळे त्यांची शरीरातील पातळी गरजेपेक्षा वाढल्यास ती शरीरातील चरबीत साठून राहतात व त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात.
 
गरज कुणाला?
फूड सप्लिमेंटची गरज केवळ काही जणांनाच असते. पूर्णत: शाकाहारी असलेल्या आणि दूधही न घेणाऱ्या व्यक्तिंना प्रसंगी ‘बी- १२’, ‘डी’ व्हिटॅमिन आणि कॅल्शियम वरून द्यावे लागते. वयस्कर व प्रतिकारशक्ती कमी झालेल्या मंडळींनाही ही व्हिटॅमिन गरजेची असतात. लहान बाळांना लोह आणि ‘डी’ व्हिटॅमिन दिले जाते. गरोदर स्त्रियांना फॉलिक अ‍ॅसिड आणि इतर व्हिटॅमिनची गरज भासते. दीर्घकाळचे आजार  व उपचार सुरू असलेल्या काही रुग्णांना काही विशिष्ट व्हिटॅमिन दिली जातात. सिगारेटचे व्यसन असलेल्यांना ‘सी’ व्हिटॅमिन तर मद्यप्राशन करणाऱ्यांना ‘बी- १२’ व्हिटॅमिनची गरज असते. अशा ठराविक परिस्थिती सोडल्यास इतर वेळी उगाचच व्हिटॅमिन घेण्याची मुळीच गरज नसते. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्यांना लागणाऱ्या व्हिटॅमिनच्या प्रकारात किंवा त्यांच्या मात्रेत फरक असतो. शरीराला व्हिटॅमिन किंवा मिनरलची किती गरज असते याचे काही डोसेस संशोधनाअंती ठरलेले आहेत. उदा. व्हिटॅमिन ‘डी’ प्रतिदिवशी १०० मायक्रो ग्रॅमपेक्षा अधिक लागत नाही, लोह ४५ मिलीग्रॅमपेक्षा जास्त लागत नाही, कॅल्शियम प्रतिदिन २ हजार मिलिग्रॅमपेक्षा अधिक घेऊ नये. त्यामुळे त्यांचे डोस अधिक झाले तर ते नुकसान करू शकतात. या सर्व बाबी विचारात घेता फूड सप्लिमेंटच्या गोळ्यांना प्रिस्क्रिप्शन लागत नसले तरी तुम्हाला मुळात त्याची गरज आहे का आणि असली तर किती हे डॉक्टरांनाच ठरवू दिलेले बरे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हर्बल’चे त्रांगडे
सध्या बाजारात ‘हर्बल’ फूड सप्लिमेंट उपलब्ध आहेत. या गोळ्या ‘हर्बल’ असल्यामुळे त्यांचे दुष्परिणाम होणारच नाहीत, असा समज होणे साहजिक आहे. पण या गोळ्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे चुकीचेच आहे. ‘हर्बल’ म्हणून जाहिरात करणाऱ्या गोळ्यांमध्ये वापरलेले नेमके घटक कोणते, त्यांच्या उपयुक्ततेचा पूर्ण अभ्यास झाला आहे का याबद्दलची साशंकता कायम राहते. त्यात काही अज्ञात मॉलेक्यूल्स आणि कंपाऊंड असू शकतात. अशा गोळ्यांमध्ये ‘लेड’सारख्या विषारी धातूचा अंशही असू शकतो.  

जितके महाग तितके चांगले?
या गोळ्या चांगल्याच महागडय़ा असतात. गोळी जितकी महाग तितकी चांगली असाही अनेकांचा समज असतो. हे खरे नाही. सकस आणि संतुलित आहार हाच सर्व आवश्यक अन्नघटक पोटात जाण्याचायोग्य मार्ग.

डॉ. चंद्रशेखर फणसळकर -drcshekhar33@hotmail.com
(शब्दांकन : संपदा सोवनी)     

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taking food supplements
First published on: 31-01-2015 at 01:28 IST